किनवट,ता.६(बातमीदार): अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशभरातील ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी आज(ता.६ )रोजी पायाभरणी समारंभ सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे संपन्न झाले. राज्यातील ४४ रेल्वे स्थानकांचा यात समावेश करण्यात आला आहे. या योजनेत किनवट रेल्वेस्थानकाचाही समावेश आहे. किनवट स्थानकाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात आमदार भीमराव केराम यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी व्यासपीठावर तहसीलदार डॉ. मृणाल जाधव, रेल्वेचे अधिकारी श्यामलाल दसमाना, परममित्र नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी केले. रेल्वे स्थानकाचे काम डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.
या योजनेच्या माध्यमातून दीर्घकालीन दृष्टीकोनातून स्थानकांचा शाश्वत विकास करणे अपेक्षित आहे. यामध्ये स्थानकांवरील सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करणे आणि त्यांची टप्याटप्याने अंमलबजावणी करणे, स्थानकावरील सुविधा सुधारणे, फिरणारे क्षेत्र, वेटिंग हॉल, स्वच्छतागृहे, आवश्यकतेनुसार लिफ्ट, एस्केलेटर, स्वच्छता, मोफत वाय-फाय, स्थानिक उत्पादनांसाठी किऑस्क. प्रत्येक स्थानकावरील गरज लक्षात घेऊन 'एक स्टेशन एक उत्पादन' योजनांद्वारे उत्तम प्रवासी माहिती प्रणाली, एक्झिक्युटिव्ह लाउंज, व्यवसाय बैठकीसाठी नामांकित जागा, लँडस्केपिंग, इमारतीत सुधारणा, शहराच्या दोन्ही बाजूंनी स्थानकाचे एकत्रीकरण, मल्टीमॉडल इंटिग्रेशन, दिव्यांगजनांसाठी सुविधा, शाश्वत आणि पर्यावरणपूरक उपाय, बॅलेस्टलेस ट्रॅकची तरतूद, रूफ प्लाझा आवश्यकतेनुसार, टप्याटप्याने व्यवहार्यता आणि स्टेशनवर दीर्घकालीन सिटी सेन्टर्स निर्माण करणे अशा सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत . नांदेड जिल्ह्यातील व हिंगोली लोकसभा मतदार संघातील किनवट हा आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखला जातो. याभागातील अधिकाधिक लोक वाडी, वस्ती आणि तांड्यावर राहतात. विशेष म्हणजे किनवट तालुका जिल्ह्यापासून चार तासाच्या अंतरावर आहे. याकडे आत्तापर्यंत दुर्लक्ष करण्यात आले आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या पुढाकाराने देशभरातील रेल्वे स्थानकांचा विकास करण्यासाठी - 'अमृत भारत स्टेशन' ही अभिनव योजना हाती घेतली यात किनवटच्या रेल्वे स्थानकाचा समावेश करण्यात आला, ही किनवटच्या रहिवाशांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. या निमित्ताने का होईना किनवटच्या रेल्वे स्थानकाचा विकास झाल्यास प्रवाशांना - हायटेक सुविधा मिळतील आणि दळण वळणाच्या सुविधा गतीमान होतील.
No comments:
Post a Comment