किनवट बाजार समितीची निवडणूक जाहीर सोमवारपासून सुरू झाले घमासान; 11 ऑक्टोबरला मतदान, दुसरे दिवशी मतमोजणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 8 September 2023

किनवट बाजार समितीची निवडणूक जाहीर सोमवारपासून सुरू झाले घमासान; 11 ऑक्टोबरला मतदान, दुसरे दिवशी मतमोजणी

किनवट,दि.08(प्रतिनिधी): मतदार यादीच्या गुऱ्हाळानंतर  किनवट बाजार समितीची निवडणूक राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केली आहे. बाजार समितीच्या 18 संचालकपदाच्या निवडीसाठी 11 ऑक्टोबर रोजी मतदान तर लगेच दुसरे दिवशी अर्थात 12 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.


     यासाठी सोमवार दि.04 पासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात  येत असून, शुक्रवार 08 सप्टेंबर हा शेवटचा दिवस आहे. 11 सप्टेंबर रोजी  निवडणूक अर्जांची छाननी होणार असून, दि. 12 ते 26 सप्टेंबर या मुदतीत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. दि.27 सप्टेंबरला निवडणूक  लढविण्याऱ्या उमेदवारांना निशानी(निवडणूक चिन्ह) वाटप केल्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार असल्याची  माहिती  निवडणूक निर्णय अधिकारी सी.एस.मगर यांनी दिली.


     किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शेती सेवा सहकारी संस्था, ग्रामपंचायत सदस्य,   अडते- व्यापारी व हमाल-मापाडी कामगार यांचे मतदान ग्राह्य मानले जाते.  सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघासाठी एकूण 11 जागा असून, सर्वसाधारण गटासाठी-7, महिलांसाठी राखीव-2, इतर मागासवर्गीयांसाठी-1 व भटक्या विमुक्त जाती/भटक्या जमातीसाठी-1 अशी त्यांची विभागणी आहे. ग्रामपंचायत मतदार संघासाठी एकूण 4 जागा असून, सर्वसाधारण गटासाठी -2, अनु.जाती/जमातीसाठी-1 आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी-1 अशी त्यांची विभागणी आहे. अडते व व्यापारी मतदारसंघासाठी-2 तर हमाल व मापारी मतदारसंघासाठी-1 मिळून एकूण 18 संचालक मंडळासाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सी.एस.मगर तर  सहायक निवडणूक अधिकारी म्हणून एन.बी. जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


    उमेदवारी अर्जाची किंमत 200 रुपये आहे. खुल्या प्रवर्गातून अर्ज दाखल करण्यासाठी 5 हजार तर राखीव जागेतून अर्ज दाखल करताना 1 हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. उमेदवारी अर्ज भरताना चार जणांनाच निवडणूक अधिकार्‍यांच्या कक्षात प्रवेश दिला जाईल. यामध्ये इच्छुक उमेदवार, सूचक, अनुमोदक व उमेदवार प्रतिनिधी यांचा समावेश असणार आहे. राखीव जागेवरील उमेदवारांनी सक्षम अधिकाऱ्यांचे जात प्रमाणपत्र आणि जातवैधतेचे हमीपत्र तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी सक्षम प्रमाणपत्राची स्व-साक्षांकित प्रत सादर करणे अनिवार्य आहे.


    कृषी उत्पन्न बाजार समिती किनवटची पंचवार्षिक संचालक मंडळाची मुदत 31 डिेसेंबर 2021 रोजी संपलेली होती. संचालक मंडळाच्या मागणीनुसार पुढे एक वर्षाची मुदतवाढ नियमानुसार शासनाकडून मिळाली. सदरील मुदत संपूनही निधी अभावी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होत नसल्यामुळे, जिल्हा उपनिबंधकांमार्फत निवडणूक कामी येथील सहायक निबंधक सी.एस.मगर यांची चार-पाच महिन्यापूर्वी प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यानंतरच त्यांनी निधी वसुलीसाठी कठोर पावले उचलून बाजार समितीची थकीत येणे असलेल्या बाजार शुल्कापैकी सुमारे दोन लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम वसूल करून, ती रक्कम निवडणूक वेळेत व्हावी म्हणून, निवडणूक प्राधिकरणाच्या खात्यात जमा केल्यानंतरच  निवडणुकीची प्रक्रिया गतिमान होऊन, ग्रामीण राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या किनवट कृउबा समितीच्या निवडणुकीचा मुहूर्त अखेर लागला.


    “किनवट बाजार  समिती ही  आतपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होती. नुकत्याच झालेल्या झालेल्या तालुक्यातील इस्लापूर बाजार  समिती निवडणुकीमध्ये माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना उध्दव ठाकरे गटाशी  युती केल्यामुळे आठ जागा रा.काँ.ला तर सात जागा भाजपाला आणि शिवसेनेला(उबाठा)दोन जागा मिळाल्या होत्या, तर केवळ एक जागा काँग्रेसला मिळाली होती. इस्लापूरचीच पुनरावृत्ती किनवट आणि माहूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होईल की, रा.काँ. व भाजपा  स्वतंत्रपणे निवडणूक लढवतील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.”

No comments:

Post a Comment

Pages