प्रबोधन चळवळीतील शिलेदार कवी ,गायक शंकर रामजी सोनकांबळे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday, 27 July 2024

प्रबोधन चळवळीतील शिलेदार कवी ,गायक शंकर रामजी सोनकांबळे


     प्रबोधन चळवळीतील शिलेदार कवी ,गायक, पेटी वादक शंकर रामजी सोनकांबळे यांचा जन्म आई गंगाबाई व पिता रामजी सोनकांबळे यांच्या पोटी शिंगारवाडी तालुका किनवट जिल्हा नांदेड येथे झाला .सध्या ते बोधडी येथे राहतात .

बालपणी अर्धाच दिवस शाळा शिकली अन् पाचचा आकडा गिरवला नंतर शाळेचे तोंडच पाहिले नाही .आई वडिलांचे चांगले संस्कार मिळाले.वडिलांनीच शंकरला घरीच उजळणी व बाराखडी शिकवली . लिहायला वाचायला शिकविले. खऱ्या अर्थाने अक्षर ज्ञान देणारे त्यांचे वडीलच त्यांचे  गुरु झाले. त्यानी दिलेल्या ज्ञानाच्या जोरावर शंकर रामजी सोनकांबळे यांनी शंभर सव्वाशे गीते लिहिली . लिहिलेली गीते प्रसिद्ध साहित्यिक ॲड.के.के.साबळे, प्रा. डॉ.पंजाब शेरे,साहेबराव डोंगरे सर, सखाराम घुलेसर, मुख्याध्यापक मोहन जाधव, गझलकार मधु बावलकर, कवी महेंद्र नरवाडे यांना दाखविली असता त्यांनी  गीत संग्रह छापण्यासाठी प्रोत्साहित केले.त्यानंतर प्रबोधन गितांची डायरी तज्ञ मार्गदर्शक उत्तम कानिंदे सर यांना दाखविली .त्यात त्यांनी सुधारणा केली."निवेदक मीडिया पब्लिकेशन", गोकुंदा (किनवट) च्या प्रकाशिका स्मिता उत्तम कानिंदे यांनी त्यातिल निवडक छप्पन गीतांचा  अत्यंत सुबक व आकर्षक "महामानव वाणी प्रबोधन गाणी" हा गीत संग्रह दि.६ डिसेबर २०२२रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित "गाणे निळ्या नभाचे "या अभिवादन कार्यक्रमात भारतीय बौध्द महासभेचे तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके यांच्या हस्ते प्रकाशित केला. याप्रसंगी  वामनदादा कर्डक संगीत अकादमीचे प्राचार्य गायक सुरेश पाटील आणि त्यांच्या संचासह असंख्य उपासक उपासिका व नागरिक उपस्थित होते."निवेदक न्युज" ' युट्यूब' च्यानल वरुन संपादक निवेदक कानिंदे यांनी सदर प्रकाशन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपन केले.'कवी, गायक म्हणून आज त्यांनी   लौकिक मिळवलेला आहे.  

         कवी शंकर रामजी सोनकांबळे यांच्याशी भेट घेऊन संवाद साधला असता त्यांनी अगदी मनमोकळेपणाने गतजीवनातील अनेक आठवणींना उजाळा दिला.जीवनातील काही बोलक्या प्रसंगाचे व घटनांचे वर्णन करतांना त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते प्रसंग त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारे  ठरल्याचे म्हटले .  दि.१४ऑक्टोबर १९५६साली नागपूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भंते चंद्रमणी यांच्या हस्ते स्वतः बुद्ध धम्माची दीक्षा घेतली नंतर उपस्थित लाखो अनुयायांना  त्यांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली ही वार्ता त्यांच्या नवव्या वर्षी कानावर पडली .या घटनेच्या परिणाम असा झाला की त्यांची सहचारिणी विजुबाई  यांचे  आजोबा   माधवराव एडके नांदेडकर यांनी भिक्खू च्या हस्ते प्रथम दीक्षा घेऊन बौद्ध उपासक या नात्याने  दरेकांनी दरेकांना दिक्षा द्यावी या बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदेशाचे स्मरण करून त्यांनी दहा ते वीस गावी जाऊन असंख्य बांधवांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. सोनकांबळे व वाघमारे परिवारालाही त्यांनी प्रथम दीक्षा दिली. 

             सिंगारवाडी गावात भजन पार्टी  असावी या उद्देशाने शंकर रामजी सोनकांबळे  यांचे वडील रामजी सोनकांबळे बाबा, किसन सोनकांबळे,  यांनी भजन पार्टीसाठी तबला ,पेटी घेऊन दिली . शंकर सोनकांबळे, महादु,,गंगाधर, शेषेराव  किसन ,लक्ष्मण, पांडुरंग, भीमराव, नागोराव या सोनकांबळे परिवाराला व खंडुजी,दशरथ,लालबाजी, या  वाघमारे  परिवाराला सोबत घेऊन भीम गर्जना गायन पार्टी स्थापन केली. किसनराव सोनकांबळे यांच्या अध्यक्षतेखाली वीस वर्षे गावोगावी जाऊन गायन पार्टी गाजवली.त्यांच्याच प्रेरणेने शंकर सोनकांबळे यांनी गीत गायन करीत प्रबोधन करण्याचे काम केले. 

           धम्मदीक्षेचा दुसरा परिणाम असा झाला की आजोबा माधवराव एडके, मामा माणिकराव एडके यांनी कवी शंकर सोनकांबळे यांचा विवाह विजुबाई  सोबत १९६४साली बौद्ध पद्धतीने शिंगारवाडी या गावी त्रिशरण व पंचशील घेऊन प्रथमच लावला. बौद्ध पद्धतीने होणारा हा विवाह  शिंगारवाडी ता.किनवट जि.नांदेड येथील  हा पहिला विवाह ठरला. 

           परिसरातील वेगवेगळ्या गावात भजन पार्टीचे कार्यक्रम होत असतं.वामनदादा कर्डक , शाहीर हनवते यांच्या सह अनेक कवींचे गीतं त्या भजन पार्टीमध्ये गायले जात.शंकर सोनकांबळे यांना ही नंतर बुद्ध भीम गीताच्या प्रबोधन कार्याची आवड निर्माण झाली. शंकर सोनकांबळे हे जेथे जेथे कार्यक्रम असतील तेथे तेथे आपल्या नातेवाईकासोबत कार्यक्रमाला व सभेला जात असत नांदेडला ही अशीच एक सभा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर आदरणीय मुकुंदराव आंबेडकर यांची  झाली त्यांच्या आजोबा सोबत त्या सभेला त्यांनी हजेरी लावली. पुढे सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांचीही नांदेडला धम्म परिषद झाली. त्याही ठिकाणी त्यांनी उपस्थिती लावली. आंबेडकरी चळवळीने प्रभावित झालेले शंकर सोनकांबळे नामांतर लढ्यातही सहभागी झाले मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मिळावे म्हणून सत्याग्रह आंदोलने झाली, मोर्चे निघाले तेंव्हा मोर्चातील ३०५ सत्याग्रहींना मुंबईला जाताना अटक झाली . औरंगाबाद येथील सेंट्रल जेलमध्ये त्या ३०५ सत्याग्रहींना ठेवण्यात आले . त्यात शंकर सोनकांबळे ही होते .जेलमध्येही त्या सत्याग्रही सोबत गायक शंकर सोनकांबळे यांनी बुद्ध भीम गीते गायली जेलमधून सुटल्यावर विद्यापीठाच्या कमानीवरचा बोर्ड पाहिला तसेच मिलिंद कॉलेज पाहिले तिथेच लोककवी वामनदादा कर्डक यांच्या भीम गीताचा कार्यक्रम चालू होता त्यांनी गायलेल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या गीतावर खुश होऊन त्यांनी आपल्या खिशातील दोन रुपये काढले  वामनदादांना  ते धम्मदान म्हणून दिले त्यानंतर लोकांनीही कोणी एकेवीस रुपये ,कोणी पन्नास रुपये द्यायला सुरुवात केली. 

          या प्रसंगाबरोबरच आंबेडकर घराण्यातील               डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र भैयासाहेब आंबेडकर जेंव्हा बोधडी येथे बुद्ध मुर्ती प्रतिष्ठापणा व भूमिपूजन  समारंभासाठी आले तेंव्हा ते त्यांच्या जवळ गेले असता भैय्यासाहेबांच्या हाताचा व शरीराचा स्पर्श झाला तेंव्हा त्यांना  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भेटल्याचा आनंद    झाला.‌     

             आदरणीय महाउपासिका मिराताई आंबेडकर जेंव्हा  बुद्धजयंती निमित्ताने किनवट येथे  रेल्वे स्टेशन ला आल्या असता विजुबाई शंकर सोनकांबळे यांनी त्यांचा मोठा मुलगा यशवंत च्या हाताने पाच रुपये धम्मदान आदरणीय  मिराताई आंबेडकर यांना दिले.  यशवंत बाळाला जवळ घेऊन आदरणीय मिराताई आंबेडकर यांनी आशिर्वाद दिला. तसेच श्रद्धेय बाळासाहेब ऊर्फ प्रकाश आंबेडकर  किनवटला सभेसाठी आले असता सभा आटोपून नांदेड कडे जातांना बोधडी बस स्थानकावर  त्यांची कार उभी राहिली तेंव्हा त्यांनी आद.बाळासाहेबांना जयभीम करुन हाथात हात मिळवला. अशा या कर्तुत्ववान आंबेडकरी घराण्यातील व्यक्ती भेटल्याचा आनंद ते व्यक्त करतांना भारावून जाऊन व त्यांच्या प्रति असलेली श्रद्धा व्यक्त करतात.

            कवी ,गायक शंकर सोनकांबळे यांनी २०१९ला जिथं बाबासाहेबाचा जन्म झाला त्या महु गावी जाऊन तेथे एक दृढ संकल्प केला होता की,बाबा तुमची भीम जयंती मी एप्रिल महिन्यात १४ ते ३० तारखेपर्यंत विविध गावात जाऊन साजरी करीन. तसेच केलेही.त्यांनी सतरा दिवस  सतरा गावी जाऊन  बुद्ध विहारात व गावात जाऊन बुद्ध भीम गीते व महापुरुषांच्या जीवनावरील गीतं गाऊन त्यांनी आपला संकल्प पुर्ण केला.  आपल्या गायन कलेद्वारे फुले शाहू आंबेडकरांच्या समतावादी विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कवी गायक पेटी वादक शंकर सोनकांबळे यांनी  ठरवीले. आपल्या आई वडिलांनी व काकांनी दिलेला संगीत कलेचा वारसा चालूच ठेवला. सोबत त्यांची पत्नी विजुबाई शंकर सोनकांबळे व परिवारातील मुलं -यशवंत , विलास, सुना- वंदना, अर्चना, मुली -संगमबाईदेविदास भालेराव , सुकेशना सागर हनवते,नातु- रोहित, बादल, आकाश, पृथ्वीराज, शुभम, शिदन, नाती- ऐश्वर्या अमोल मुळे,, सोनाली, भुमिका, पुजा साईनाथ मदनुरे, शुभांगी, रानुबाई जयकराम जाधव, बंटुबाई रवी कदम यांचे त्यांना गायणात सहकार्य लाभले.

            महाराष्ट्रातील प्रसिद्ध प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी  कवी शंकर सोनकांबळे यांचा त्रिरत्न कुमार भवरे आयोजित सोनारी फाटा येथील धम्मपरिषदेत विचारलेल्या प्रश्नोत्तराबद्ल  अभिनंदन करुन सत्कार केला तसेच  पुस्तक भेट दिल्यानंतर गीत लेखनाबद्दल कौतुकाची थाप मारली.यावेळी असंख्य लोककलावंत उपस्थित होते.

         अनेक  शाहीर, गायक यांच्या बरोबर गाण्यासाठी त्यांना संधी मिळाली.शाहीर बळीराम हनवते यांनीही आपल्या सोबत गीत गावं म्हणून त्यांना संधी दिली, शाहीर क्षिरसागर हटकर , साहेबराव डोंगरे सर, शिंदे सर यांनीही गीत गाण्यासाठी प्रोत्साहन दिले .शाहीर नरेंद्र दोराटे यांच्यासह अनेक सहकारी गायक यांनीही गीत गाण्यासाठी प्रेरणा देत राहिले . आपल्या सहकाऱ्यांना घेऊन त्यांनी खेडोपाडी जाऊन संत महापुरुषांच्या विचारांची पेरणी प्रबोधनाच्या माध्यमातून केली.

शिंगारवाडी ,थारा, चंद्रपूर, बोधडी ,येंदा,पेंदा,पार्डी, कोपरा,सावरी,  धानोरा, जलधरा, चिखली,किनवट, घोटी, रीठा ,नागझरी,वंजारवाडी दाभाडी, ईस्लापूर ,मुरझळा, मुरझळा वाडी ,पांगरी, कोसमेट, करंजी ,फुलेनगर  , हदगाव,हरडफ, डोरली, आष्टी , जवळगाव , सरसम, धानोरा ,कारला, देवरंग, हिमायतनगर तसेच तत्कालीन आंध्र प्रदेश व आताचे तेलंगणातील आदिलाबाद,इंदरवेली,कुबेर, बेलगाव ,चोंडी ,भैसा अशा अनेक ठिकाणी जाऊन बुद्ध फुले शाहू व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार जनमानसात रुजवण्याचा प्रयत्न शंकर सोनकांबळे यांनी केला.  परिसरातील जयंती असो  की पुण्यतिथी असो. तेरवी असो की जागरण असो ,कुणाचे वाढदिवस असो की नामकरण असो किंवा लग्न समारंभ असो त्याही ठिकाणी शंकर सोनकांबळे यांनी गीत गायन केले . 



  आवडीचे गीते-

   जरी संकटाची काळरात होती तरी भीमराया तुझी साथ होती  हे वामनदादा कर्डक यांचे प्रसिद्ध गीत  नेहमीच  गातात.

 त्यांचे नवीन गीत 

१)बुद्ध झाले गौतम जगाला कळाले 

अशोका नंतर भीमाला मिळाले.

२)रमा भिमाची कमाई, जगी अंत लागत नाही 

भारत देशाची केली खरी सेवा

 बहुजनांचा जन्म नवा, 


३)चला हो चला जाऊ महू गावाला

 बाळ भीमाईचे पाहु चला 


४)सावित्री फुले महात्मा फुले शाळा मुलीची पुण्यात काढली पहिले, 


५)गाडगे बाबा तुमचे सत्य विचार  

हाती झाडू घेऊन गेले गाव सुंदर.

     याबरोबरच त्यांनी पंडित वसंत सिरभाते सर विठ्ठलाच्या पायी झालो भाग्यवंत हे  नेहमीच गीत गात असत याच चालीवर त्यांनी लिहिलेले पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावरचे गीत  पंकज  शिरभाते यांनी अनेकदा गायले .    छत्रपती शाहू महाराज यांच्यावरही आधारित जीव तुझा जळाला या चालीवर लिहिलेले गायक देविदास भालेराव यांनी  गायले होते त्याच चालीवर वरील गीत गायले वसंतराव नाईक यांच्या वर आधारित गालावरची खळी तुझ्या या चालीवर एक गीत स्वतः शंकर सोनकांबळे यांनी गायले. तुकाराम भाऊराव साठे (अण्णाभाऊ) यांच्यावरही त्यांनी चाल जरी संकटाची काळरात होती या  चालीवर गीत रचना करून गायले .अशी अनेक महापुरुषांच्या जीवन व कार्यावरील गीतं लिहून त्यांनी सादर केलीत.त्यानी लिहिलेल्या आपल्या "महामानव वाणी प्रबोधन गाणी " या ५६ गीत संग्रहातील   सरळ व सोप्या चालीवरील गीत रचनेत महापुरुषांसह, अंधश्रद्धा, व्यसनमुक्ती, आरोग्य शिक्षण , शाळेची गोडी, संविधान,लेक,कारभारीन, मायलेकी,आई-वडील  इत्यादी विषयांचा अंतर्भाव केलेला आहे.

   कवी गायक  शंकर रामजी सोनकांबळे यांच्या प्रबोधन कार्याची राजश्री शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन योजनेसाठी  राज्यस्तरीय निवड समितीने दखल घेतल्या मुळे दि. १५.१२.२०२३ रोजी  लोककलावंताच्या यादीतील ३०व्या क्रमांकावर त्यांची निवड झाली . सध्या त्यांना शासनाकडून पाच हजार रुपये मानधन सुरू झाले आहे . लोक कलावंत सांस्कृतिक मंचनेही त्यांची उपाध्यक्षपदी  निवड  करुन त्यांचा सन्मान वाढविला आहे . प्रदेशाध्यक्ष प्रसिद्ध कवी गायक विष्णु शिंदे यांच्या आदेशाने व महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष माननीय माधव दादा जमदाडे यांच्या स्वाक्षरीने दिनांक १५/१२/ २०२३ रोजी त्यांना निवड  झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले . तसेच त्यांच्या जीवनातील अतिशय  महत्त्वाचा क्षण म्हणजे परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती नागपूर यांच्या वतीने आयोजित नागपूर येथील धम्मचक्रप्रवर्तन दिनी दिक्षा भुमीवर २४/१०/ २०२३ रोजी  अध्यक्ष पुज्य भदंत सुरई ससाई  यांच्या  हस्ते बौद्ध धम्माची  स्वतः दिक्षा घेतल्याचा क्षण .दिक्षा घेतल्याचे प्रमाणपत्र ही त्यांना मिळाले आहे. त्याप्रसंगी सचिव डॉ. सुधीर एस.फुलझेले उपस्थित होते.


संदेश-

आज कालच्या गायक कलावंतांना व  तरुण मुला- मुलींना आपल्या गीताच्या माध्यमातून बाबासाहेबांचा विचार "शिका, संघटित व्हा, संघर्ष करा" व २२प्रतिज्ञाचे तंतोतंत पालन करा असे ते संदेश देतात समाजातील प्रत्येक स्त्री-पुरुषांनी महापुरुषाचे विचार पुस्तकाच्या माध्यमातून हे वाचन करावे आणि त्याच विचाराने चालावे अंधश्रद्धेपासून दूर राहून कष्टाचे ,नीतीचे, शिलसदाचाराचे व शांतीचे पालन करावे सर्वांनी व्यसनमुक्त राहावे, आई-वडिलांची सेवा करावी, देशसेवा करावी आपल्या हातून कोणतेही अशोभनीय कृत्य होऊ नये यासाठी सदा दक्ष रहावे, निस्वार्थ भावनेने जनसेवा करावी हेच ध्येय उराशी बाळवावे असे ते आपल्या प्रबोधनातून सांगतात.


   लेखक :   महेंद्रनरवाडे (किनवट )

    मो.न.९४२१७६८६५०

No comments:

Post a Comment

Pages