नांदेड : हजारो वर्षापासून प्रस्थापित व्यवस्थेने लादलेली गुलामगिरी, विषमता ,दारिद्र्य ,अज्ञान, अंधश्रद्धा, सर्वंकष शोषण व माणुसकीचे झालेले दमन याच्या विरोधात एल्गार पुकारणारा महामानव म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या उत्तुंग प्रज्ञा- प्रतिभेचा व मानवमुक्तीच्या कार्याचा सर्जनशील अविष्कार म्हणजे राजेंद्र गोणारकरांच्या "नवी लिपी"तील कविता होय" असे मत डॉ. अशोक नारनवरे यांनी व्यक्त केले .
डॉ .नारनवरे हे महाराष्ट्र शासन आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने "मराठी भाषा संवर्धन पंधरवडा"या उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या कवी राजेंद्र गोणारकर यांच्या "नवीन लिपी" या कवितासंग्रहावर आयोजित मुक्त चर्चा कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष भाषा संकुलाचे संचालक डॉ. दिलीप चव्हाण हे होते.
गोणारकर यांच्या "नवी लिपी" या काव्यसंग्रहातील विचार सौंदर्य विशद करताना नारनवरे म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वावर १९२८ पासून आजतागायत असंख्य कवींनी कविता लिहिल्या आहेत. परंतु कवी राजेंद्र गोणारकर यांनी "नवी लिपी"तून नवीन भाषिक शब्दकळा, जीव ओवाळून टाकणाऱ्या उत्तुंग आशयाच्या व खोलवर काळजाला भिडणाऱ्या नव्या प्रतिमा यामुळे ही कविता श्रेष्ठ दर्जाची वैश्विक व चिरंतन झाली आहे.या मूल्यगर्भ कवितेतून बाबासाहेबांचे बहुआयामी ,धीरोदत्त क्रांतिकारी व्यक्तिमत्व साकार झाले आहे.
कोणत्याही कवीची नवीन कविता ही नव्या प्रतिमा घेऊन जन्माला येते. कवी गोणारकर यांच्या या संग्रहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महान व्यक्तिमत्त्वाच्या अत्यंत उत्तुंग आणि वाचकांना सुखद धक्का देणाऱ्या अनेक प्रतिमा आलेल्या आहेत. या सर्व प्रतिमा अभ्यासनीय आहेत. यावर सखोल संशोधन होणे आवश्यक आहे; असेही नारनवरे म्हणाले.
या कार्यक्रमाची प्रास्ताविक डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राचे संचालक डॉ. पी. विठ्ठल यांनी केले. तर सूत्रसंचालन डॉ.वैजनाथ अनमुलवाड यांनी केले.
त्यावेळी कवी राजेंद्र गोणारकर यांनी आपल्या कविता शैलीदारपणे सादर केल्या. कवितांना श्रोत्यांनी खूप भरभरून दाद दिली. डॉ.दिलीप चव्हाण यांनी अध्यक्षीय समारोप केला.
या कार्यक्रमास डॉ. रमेश ढगे, डॉ. शैलजा वाडीकर, कवयित्री सारिका उबाळे, अविनाश कदम इत्यादी मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment