छत्रपती संभाजीनगर, दि.२८ : 'मनावर ब्रेक हाच उत्तम ब्रेक असतो’ याची जाणीव ठेऊन प्रत्येक वाहन धारकाने वाहतुकीचे सर्व नियम पाळून नियंत्रितपणे गाडी चालवावी, असा सूर रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यशाळेत निघाला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम मंगळवारी (दि.२८) आयोजित करण्यात आला. पीएम उषा मेरु अंतर्गत महात्मा फुले सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक संदीप शेलार, सविता पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमास विद्यर्थी विकास संचालक डॉ.कैलास अंभुरे, समनव्यक डॉ.जी.डी.खेडकर, वाहनकक्ष प्रमुख प्रा विनय लोमटे यांची मंचावर उपस्थिती होती. या कार्यशाळेत प्रारंभी सहायक मोटार वाहन निरीक्षक संदीप शेलार यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, गेल्या काही वषात उत्तम रस्ते निर्माण झाले असून वाहनांची संख्या खूप वाढली आहे. सोबतच रस्ते अपघातांचे प्रमाणही वाढले असून वाहतुकीचे नियम पाळण्याकडे काही जन जाणीवपूर्वक तर काहीजण नकळत दुर्लक्ष करतात. तर सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सविता पवार यांनी पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन तसेच विविध ध्वनीचिफिती दाखवून वाहतूक सुरक्षेबद्दल मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, या अभियान अंतर्गत परिवहन विभागाकडून आजपर्यंत महिनाभरात दहा ते बारा हजार युवकांपर्यत वाहतूक नियमनाबाबत संदेश दिला आहे. अपघात होऊन नये म्हणून सर्वांनी नियम पाळने गरजेचे आहे. कारचालकाने सीट बेल्ट तर दुचाकी स्वाराने हेलमेट वापरणे गरजेचे आहे. बेदरकार डायव्हिंग, वाहनांचे टायर योग्य नसने, हेडलाईट नसणे, चुकीच्या पध्दतीने ओव्हरटेक करणे टाळले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. तर प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काढोळे म्हणाले, जिल्हयात गेल्या वर्षात जिल्हयात रस्ते अपघातात ६७२ जणांचा बळी गेला. दिवसाला दोन जण अपघातात मृत्यूमूखी पडत असून अपघात रोखण्यासाठी वाहनधारकांनी नियम पाळणे गरजेचे आहे. विभागाच्यावतीने महिनाभर विविध कार्यक्रम घेण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. रस्ते सुरक्षा संदर्भात विद्यापीठ स्तरावर देखील उपाययोजना करण्यात येतील, असे प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे म्हणाले. डॉ.गुलाब खेडकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विद्यार्थ्यांशी प्रश्न उत्तरे द्वारे संवाद साधण्यात आला. रेडिओ जॉकी, श्वेता पाटील, आर जे रसिका व अक्षय चव्हाण यांनी यात सहभाग नोंदविला. डॉ.दैवत सावंत यांनी सूत्रसंचालन तर प्रा.विनय लोमटे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी हरिश्चंद्र साठे, गजानन पालकर,, बाळासाहेब जाधव, हनुमान गिरी आदींनी प्रयत्न केले.
No comments:
Post a Comment