नांदेड :
स्वातंत्र्य पूर्व काळात सामाजिक राजकीय विषय पत्रकारितेच्या केंद्रस्थानी होते. स्वातंत्र्यानंतर पत्रकारितेवर विकासाचे गारुड निर्माण झाले. नव्वदच्या दशकात पत्रकारितेचे व्यापारीकरण होण्यास सुरुवात झाली.अलीकडच्या काळात नव माध्यमांचा झपाट्याने झालेला विकास आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यामुळे जीवनाच्या विविध अंगात आमुलाग्र बदल झाले. यातून समाजात अस्थैर्य आले. पण जेव्हा जेव्हा सामाजिक – राजकीय अस्थैर्य येते त्या काळातच पत्रकारितेचे महत्व अधिक असते , असे प्रतिपादन ज्येष्ठ माध्यम तज्ञ डॉ. विश्राम ढोले यांनी व्यक्त केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील माध्यमशास्त्र संकुलाच्या वतीने मराठी पत्रकार दिनानिमित्त “ डिजिटल युगात पत्रकारितेचे बदलते संदर्भ “ या विषयावर आयोजित विशेष व्याख्यान कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक श्री हुशारसिंग साबळे होते. तर याप्रसंगी मंचावर दैनिक प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम , श्री वसंत मैया, श्री उमाकांत जोशी, डॉ. संगीता माकोने, संकुलाचे संचालक डॉ. राजेंद्र गोणारकर , डॉ. सुहास पाठक आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. विश्राम ढोले आपल्या भाषणात म्हणाले की, बदलत्या तंत्रज्ञानामुळे उभे राहिलेल्या आव्हानाचा सामना करत करत पत्रकारिता बदलत राहिली. पत्रकारितेत बदल जरी होत असले तरी त्यात चिरंतन असे तत्व देखील आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ते म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता आशय उत्पन्न करू शकते पण पण त्या आशयाशी बांधिलकी मात्र मनुष्यच दाखवू शकतो. संवेदनशील वृत्तीने समाज समजून घेण्याच्या मानवी प्रवृत्तीला पर्याय नाही. हे पत्रकारितेतील न बदलणारे तत्त्व आहे, असेही ते म्हणाले.
दैनिक प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे यांनी कृत्रिम बुद्धिमत्तमुळे पत्रकारितेत होणारे बदल विद्यार्थ्यांनी आत्मसात करावेत असे आवाहन केले. विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकारितेचे पैलू आपल्या मनोगत उलगडून दाखविले.
अध्यक्षीय समारोप करताना विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक श्री हुशारसिंग साबळे म्हणाले, पत्रकाराने निष्पक्षपणे काम केले पाहिजे. वस्तुस्थिती नीट समजून घेऊन लोकांपुढे मांडली पाहिजे.आणि ती मांडण्यासाठी पत्रकाराकडे निर्भीडपणा असला पाहिजे. तरच लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता काम करू शकेल.
प्रारंभी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्र्यात आले. या वेळी उपस्थित पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संकुलाचे संचालक डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी केले तर सूत्रसंचालन बालाजी मोरे यांनी केले तर कान्हा खानसोडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. सचिन नरंगले ,डॉ. कैलाश यादव , प्रा. गिरीश जोंधळे, प्रा. प्रज्ञाकीरण जमदाडे, प्रीतम लोणेकर, साहेब गजभारे, हर्षा गोदणे, , व्यंकट गीनगीने आदींनी परिश्रम घेतले.
स्वारातीम विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र संकुलात मराठी पत्रकार दिनानिमित्त आयोजित व्याख्यान कार्यक्रम प्रसंगी बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करतांना ज्येष्ठ माध्यम तज्ञ डॉ. विश्राम ढोले, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्र. संचालक श्री. हुशारसिंग साबळे, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम , संचालक डॉ. राजेंद्र गोणारकर, डॉ. सुहास पाठक, डॉ. सचिन नरंगले .
स्वारातीम विद्यापीठाच्या माध्यमशास्त्र संकुलात मराठी पत्रकार दिनानिमित्त आयोजित व्याख्यान कार्यक्रम बोलतांना ज्येष्ठ माध्यम तज्ञ डॉ. विश्राम ढोले मंचावर संचालक डॉ. राजेंद्र गोणारकर, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, प्रजावाणी चे संपादक शंतनू डोईफोडे .
No comments:
Post a Comment