मुंबई :
आंबेडकरी चळवळीतील ख्यातनाम गीतकार, संगीतकार, प्रबोधनकार, गायक, भीमशाहिर प्रभाकरदादा पोखरीकर यांच २४ फेब्रुवारी २०२५ रोजी पहाटे पाच वाजता कळवा येथील रुग्णालयात दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. प्रभाकरदादा पोखरीकर यांनी आपल्या गीतांच्या माध्यमातून मनोरंजनाबरोबरच जनजागृतीचे आणि प्रबोधनाचे अत्यंत महत्त्वाचे महान कार्य केले. आंबेडकरी चळवळीत त्यांचे फार मोठे योगदान आहे. त्यांनी अविवाहित राहून, आंबेडकरी चळवळीला आपले आयुष्य समर्पित केले. बाबासाहेबांचा अनमोल संदेश गीतांच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रात घराघरात पोहचवून, आंबेडकरी चळवळ बुलंद करण्याचा, गतीमान करण्याचा प्रयत्न केला, चळवळीला जीवाचं दान दिले. अशा महान परिवर्तनवादी लाडक्या, आदर्शवत महान लोककलावंताला भावपुर्ण आदरांजली !
प्रभाकरदादा पोखरीकर मध्यंतरी अर्धांगवायूच्या आजाराने त्रस्त होते. पण, त्यांनी उपचाराअंती आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर त्या आजारावरही मात करुन, हे परिवर्तनवादी, पुरोगामी चळवळीचे शिलेदार पुन्हा चळवळीत कार्यरत झाले होते. २४ मार्च २०१६ रोजी, दामोदर हॉल, परेल, मुंबई येथे त्यांच्या मदतीसाठी सम्यक कलामंचने, 'जीवाला जीवाचं दान' ( हिट्स ऑफ, प्रभाकरदादा पोखरीकर ) संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी महाराष्ट्रातील आघाडीच्या अनेक पार्श्वगायक, पार्श्वगायीकांनी त्यांची गीते सादर केली. त्या कार्यक्रमाची 'कोकणरत्नभूमी सामाजिक संघटन'च्या माध्यमातून काही तिकीटांची विक्री करुन, आर्थिक निधी उभा करण्यात हातभार लावण्याचा प्रयत्न केला होता.
जीवाला जीवाचं दान, छाती ठोक हे सांगू जगाला, हे पाणी आणीले मी, श्रम माझे बाळांनो आठवूनी, वाट किती मी पाहू, तुझ्या विना रमा, भिमाई याद तुझी, हे नाणं दिसतंय शोभूनी, मातीच सोन झाले भीमा तुझ्यामुळे अशा एकापेक्षा अनेक दर्जेदार, लोकप्रिय गीतांनी प्रभाकरदादांनी महाराष्ट्राला वेडं लावले होते. अजरामर गीतांचा बादशहा हरपल्याने आंबेडकरी चळवळीची कधीही भरुन निघणार नाही अशी अपरिमित हानी झाली आहे. पुनश्च त्यांच्या पवित्र स्मृतींना भावपुर्ण आदरांजली !
No comments:
Post a Comment