दिल्लीच्या मराठी संमेलनाविरोधात विद्रोहीचा आवाज घुमणार छ.संभाजीनगरात अध्यक्ष,उद्घाटक व तीन दिवसांची भरगच्च कार्यक्रम पत्रिका जाहीर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday, 20 February 2025

दिल्लीच्या मराठी संमेलनाविरोधात विद्रोहीचा आवाज घुमणार छ.संभाजीनगरात अध्यक्ष,उद्घाटक व तीन दिवसांची भरगच्च कार्यक्रम पत्रिका जाहीर



संभाजीनगर , प्रतिनिधी :

          दिल्लीचे मराठी साहित्य संमेलन हे भाजप सरकारचे  आश्रीत असल्याचा आरोप विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी यांनी मुंबई व छत्रपती संभाजीनगर येथे १८ फेब्रुवारी रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला. त्या अखिल मराठी साहित्य संमेलनाच्या प्रक्रियेबाबत बोलतांना पुढे बोलताना पुढे म्हणाल्या की, आधी राजकीय बनलेल्या अखिल भारतीय संमेलनाचे आता शासकीय आणि पक्षीय संमेलनात रूपांतर झाले आहे तो जनतेच्या हिताचा नाही, असा विद्रोही घणाघाती आरोप या पत्रकार परिषदेत केला.

                   विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने १९९९ पासून अखिल भारतीय ब्राह्मणी भांडवली पुरुषसत्ताक मराठी साहित्य संमेलनाच्या विरोधात विद्रोही मराठी साहित्य संमेलने आयोजित करण्यात येतात. महात्मा फुले यांच्या साहित्य संस्कृतीविषयक भूमिकेवर आधारित या विद्रोही साहित्य संमेलनाचे आयोजन अखिल भारतीय ब्राह्मणी मराठी साहित्य संमेलनाच्या समोर  त्याच दिवशी त्याच तारखांना व अनेकदा समोरासमोर करण्यातआले आहे. नाशिक, उदगीर, वर्धा व अमळनेर या ठिकाणी तर कोट्यावधींचा खर्च करूनही मंडपातील रिकाम्या खुर्च्यांमुळे खजील झालेले अखिल भारतीय ब्राह्मणी मराठी साहित्य संमेलन आता दिल्लीश्वरांच्या आश्रयाला गेले आहे. विद्रोही साहित्य संमेलन मात्र मराठी मातीत पाय रोवून विषमतावादी, शोषक संस्कृतीच्या विरोधात फुले, शाहू, आंबेडकरी भूमिका घेऊन खंबीरपणे लढत आहे;  म्हणूनच १९ वे अ.भा. विद्रोही मराठी साहित्य संमेलन छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ) येथील आमखास मैदानात मलिकअंबर नगरीत २१,२२ व २३ फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे. त्या संदर्भाची भूमिका,  संमेलनाची कार्यक्रम पत्रिका ,अध्यक्ष व उद्घाटक इत्यादी दि.१८ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आल्या. सत्यशोधक समाजाचे १५१ वे वर्ष, भारतीय प्रजासत्ताकाचे ७५ वे वर्ष यानिमित्ताने होणाऱ्या एकोणिसाव्या विद्रोही मराठी  संमेलनाच्या अध्यक्षपदी मराठीतील लोकसाहित्य ,संस्कृती व प्राच्यविद्या अभ्यासक,इतिहास संशोधक,भाषा तज्ञ,विचारवंत डॉ.अशोक राणा यांची निवड तर उद्घाटक म्हणून ख्यातनाम आंबेडकरवादी हिंदी साहित्यिक, समीक्षक, अनुवादक, विचारवंत  कंवल भारती (दिल्ली) यांची निवड करण्यात आली असून छत्रपती संभाजीनगरात होणाऱ्या १९ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनात तीन दिवस भरगच्च कार्यक्रम होणार असल्याचे या पत्रकार परिषदेत प्रा.प्रतिमा परदेशी व १९ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष इंजि. सतीश चकोर व मुख्य निमंत्रक एडवोकेट धनंजय बोरडे यांनी घोषित केली.

                छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद)येथील आमखास मैदानावर उभारलेल्या मलिकअंबर साहित्यनगरीत २ भव्य सभामंडप असून ३ दालनांमध्ये बालमंच, युवा मंच यासह एकूण ४ विचार मंचावर विद्रोहीचे विविध कार्यक्रम होणार आहेत. "शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला"  व  "बिस्मिल्ला" या दोन नाटकांसह पुढील  दोन दिवसांमध्ये विद्रोहीत ६ परिसंवाद , १४ गटचर्चा,१ विशेष व्याख्यान होईल.  काव्य पहाट मैफिल, गझल संमेलन, अशी ४ कविसंमेलने व काही सत्रात साहित्यिक, विचारवंत, पत्रकारांशी साहित्य  संवाद होईल. सांस्कृतिक व कला प्रकारात आदिवासी गाणी, कला दर्शन, लोककलांचे सादरीकरण व महाराष्ट्र दर्शन इत्यादी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे. कथाकथनांच्या कार्यक्रमासह  २ नाट्यवाचन , ३  एकपात्री प्रयोगासह २ एकांकिकेचे सादरीकरण या मंचावर होणार आहे. युवा कलाकारांचे रॅप गीतांचे सादरीकरण लक्षवेधी ठरणार आहे. 

            खास मंडपातील  ८  कला दालनात चित्रकाव्य, शिल्पकला, सुलेखन, चित्रकला, कलात्मक फलकलेखन, रांगोळी, व्यंगचित्र  अशा ८ कला प्रकारांचे लाईव्ह सादरीकरण व प्रदर्शन होईल. "संविधान आणि स्वातंत्र्य आंदोलनातील मुसलमान " या विषयावरील २ पोस्टर प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.

                महाराष्ट्रातील  कथा, कविता, नाटक, ललित इत्यादी साहित्य प्रकारातील २०० हून अधिक  निमंत्रित साहित्यिक  उपस्थित राहणार असून २१ जिल्ह्यातील ७५ लोकशाहीवादी विचारवंत , अभ्यासक, तसेच १० कथाकथनकार आणि ४ इतिहासकार, १५ गजलकार, यांच्यासह ३५ नाट्य व सिनेमालिका अभिनेते , एकपात्री नाटककार, एकांकिका नाट्यछटाकार, १२३ निमंत्रित कवी, अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती साहित्यप्रेमींसाठी वैचारिक मेजवानी ठरणार आहेत.

               महाराष्ट्रातील  वारकरी, महानुभाव, लिंगायत, बौद्ध, आदिधर्म इत्यादी पाच धर्मपीठांचे प्रमुख प्रतिनिधी, तसेच २७० लोककलाकारांसह १५ गायक, शाहीर ,भीमगीतकार , रॅप कलाप्रकारातील ७ युवा कलाकार, बोलीभाषांचे २० अभ्यासक, ७ नामवंत पत्रकार आणि  विद्रोहाच्या लेखणीची तोफ तयार करणारे चित्रकार राजानंद सुरडकर व शिल्पकार विकास सरवदे या कलाकारासह ७ शिल्पकार, १ व्यंगचित्रकार, यांसह २ चित्रकाव्यकर्ते , ५ चित्रकार, ४ पोस्टर प्रदर्शनकार,२ सुलेखनकार, २ फलकलेखनकार आपले योगदान देवून विद्रोही साहित्य चळवळीचा जागर यशस्वी करणार आहे.

     या संमेलनात माजी संमेलनाध्यक्ष डॉ. प्रतिभा अहिरे, डॉ.प्रल्हाद लुलेकर, डॉ.वासुदेव मुलाटे, गणेश विसपुते हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच १) भारतीय जाती व पुरुषप्रधान विषमतेला धर्म आणि संस्कृतीच्या आधारे दूर करता येणे शक्य आहे,२) बोलीभाषा, प्रमाणभाषा, अभिजात भाषा आणि सांस्कृतिक वर्चस्वाचे राजकारण,  ३) सोशल मीडिया अन्यायाविरुद्ध लढण्याचे साधन?  ४)अंधकारमय काळात नवे विषय- नवी आव्हाने - नवे लेखन साहित्यिकांशी संवाद. ५) इतिहासाचे विकृतीकरणाविरुद्ध सत्य इतिहासकथन या पाच विषयांवरील परिसंवाद होणार आहेत. अरविंद सुरवाडे ,प्रा.मोहन बाबुळगावकर,प्रभू राजगडकर धर्मकीर्ती महाराज परभणीकर,कोर्णेश्वर आप्पाजी, डॉ वंदना महाजन, डॉ देवेंद्र इंगळे,डॉ. दिलीप चव्हाण, डॉ,लीलाधर पाटील, डॉ.पी.टी.गायकवाड, डॉ.अशोक नारनवरे, डॉ. शिवाजी हुसे, संध्या नरे-पवार, ॲड.वैशाली डोळस, प्राचार्य डॉ.संजय मून, प्रा.कोंडबा हटकर, सुनीता भोसले, शाहू पाटोळे, छाया बेले, डॉ. मारोती कसाब, आशा डांगे, डॉ.नवनाथ गोरे हे मान्यवर सहभागी होणार आहेत.

               १९ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनात मराठी साहित्यिक, नाट्यकलावंत, लोककलावंत, कवी ,नाटककार, ललित लेखक , १०,००० दहा हजाराहून अधिक रसिक  फुले, शाहू, आंबेडकरी , अंधश्रद्धा निर्मूलन, शेतकरी, कामगार व विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्ते तसेच आदिवासी क्षेत्रात काम करणारे संविधानिक मूल्यांसाठी लढणारे कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्षा प्रा.प्रतिमा परदेशी, स्वागताध्यक्ष इंजि. सतीश चकोर व मुख्यनिमंत्रक ॲड.धनंजय बोर्डे यांनी जाहीर केले.

        यावेळी विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे राज्यसंघटक  किशोर ढमाले, कार्याध्यक्ष खलील अहमद, खजीनदार ॲड.के.ई.हरिदास, अनिलकुमार बस्ते,भाऊसाहेब जाधव, समन्वयक प्रा.भारत सिरसाठ, ॲड.वैशाली डोळस, अनंत भवरे, डॉ.धोंडोपंत मानवतकर, वजीर शेख, जितेंद्र भवरे, मधुकर खिल्लारे, सविताताई अभ्यंकर, डॉ विनय हतोले,रामदास अभ्यंकर, भीमराव गाडेकर, वैभव सोनवणे, सुधाकर निसर्ग, कबीर बोर्डे, रतनकुमार साळवे, उपस्थित होते.



No comments:

Post a Comment

Pages