मंत्रमुग्ध सादरीकरणाने महसूलच्या राज्यस्तरीय महसूल क्रीडा , सांस्कृतिक सोहळ्याची सांगता - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday, 23 February 2025

मंत्रमुग्ध सादरीकरणाने महसूलच्या राज्यस्तरीय महसूल क्रीडा , सांस्कृतिक सोहळ्याची सांगता


नांदेड दि. २३ : महसूल विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमध्ये काल शनिवारी दुसऱ्या व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अखेरच्या दिवशी अमरावती छत्रपती संभाजी नगर व पुणे विभागाने अप्रतिम सादरीकरणाने शेकडो प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्व विभागाच्या या सादरीकरणाचे कौतुक करीत अत्युउत्कृष्ट शेरा दिला.


        नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून तयार करण्यात आलेले सादरीकरण लक्षवेधी होते. कार्यक्रम बघताना हा कार्यक्रम महसूल कर्मचाऱ्यांचाच आहे यावर विश्वासच बसू नये, इतके भव्य दिव्य सादरीकरण प्रत्येक विभागाने सादर केले.


      अमरावती विभागाने वंदन गीत, समूहगीत, वादन, मूकनाटिका, नक्कल,युगल गायन, एकपात्री प्रयोग, नाटक या सर्व गटामध्ये अतिशय उत्तम असे सादरीकरण केले. संभाजीनगर विभागाने महाभारतातील कृष्ण अर्जुन संवादासाठी थेट रथच मंचावर आणला. तेव्हा संपूर्ण सभागृहाने उभे राहून या सादरीकरणाला सलामी दिली. ऐतिहासिक पार्श्वभूमीच्या या संवादात सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी अतिशय व्यावसायिक पद्धतीने अभिनय केला. सहाय्यक जिल्हाधिकारी अनुष्का शर्मा यांचे कथ्थक नृत्य आणि जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सादर केलेले सोचेंगे तुम्हे प्यार करे के नही हे गीत संपूर्ण प्रेक्षागृह डोक्यावर घेणारे ठरले. छत्रपती संभाजी नगर या चमूमध्ये स्थानिक अधिकारी कर्मचारी कलाकार मोठ्या संख्येने असल्यामुळे अधिकच माहौल झाला.

     मात्र,या सर्वसादरीकरणावर कळस चढवला तो नरवीर तानाजी मालुसरे यांच्या कोंढाणा स्वारीने. पुणे विभागाने हे अप्रतिम सादरीकरण केले. वंदन गीतापासून,वादन,गायन ,नृत्य, सर्व स्पर्धेचे प्रकार त्यांनी या नाट्यछटेमध्ये घेतले. तानाजी मालुसरे यांचा पराक्रम नाट्य स्वरूपात सादर करताना निवडलेले प्रसंग अप्रतिम होते. छत्रपती शिवरायांना कठीण प्रसंगी मावळे का साथ देतात आणि छत्रपतींसाठी एक एक मावळा हा किती महत्त्वाचा होता याचे अप्रतिम सादरीकरण पुणे विभागाने केले. पुणे विभागाच्या या सादरीकरणाने उपस्थित सर्व मान्यवरांना रसिक श्रोतांना मंत्रमुग्ध केले.


     जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी या दोन दिवसांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या समारोपाला सर्व विभागाच्या उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल त्यांचे कौतुक केले. 24 तास सामान्य जनतेसाठी काम करणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांनी वेळ मिळेल तेव्हा आपल्या कलागुणांना जिवंत ठेवून त्याचे सादरीकरण करण्यास अशा संधीचा उपयोग करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.सर्व विभागाच्या सादरीकरणाला त्यांनी अत्युत्कृष्ट शेरा दिला. सर्वांचे कौतुक करून आभार मानले.

No comments:

Post a Comment

Pages