नांदेड :- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचा प्रशासकीय कार्यकाळातील तिसरा अर्थसंकल्प दिनांक 21.03.2025 रोजी सकाळी 11.30 वाजता महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील कै.शंकरराव चव्हाण सभागृहात अंदाजपत्रकीय विशेष प्रशासकीय सर्वसाधारण सभेत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी मंजुर केला.
नांदेड महापालिकेचा प्रशासकीय कार्यकाळातील सन 2025-26 चे मुळ अंदाजपत्रक असलेला 1523.29 कोटीचा अर्थसंकल्प विशेष प्रशासकीय सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला. कोणतीही कर वाढ न करता नांदेड शहरवासीयांना दिलासा देणारा अर्थसंकल्प आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी मंजुर केला. याच वेळी सन 2024-25 च्या सुधारीत अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली. यावेळी अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉ.जनार्दन पक्वान्ने, उपआयुक्त तथा नगरसचिव स.अजितपालसिंघ संधु यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच उपआयुक्त सुप्रिया टवलारे, लेखाधिकारी श्रीनिवास चन्नावार, शहर अभियंता सुमंत पाटील, जेष्ठ नागरीक, समाजसेवक, सर्व माध्यम प्रतिनिधी तथा पत्रकार व महापालिकेतील इतर अधिकारी व कर्मचारी यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
महानगरपालिकेचा सन 2024-25 चा मुळ अर्थसंकल्प रु.1712.29 कोटीचा होता. त्यात विविध विभागांनी सुचविल्यानुसार 207.13 कोटींची कपात करुन सुधारित अर्थसंकल्प रु.1505.16 कोटीचा सादर करण्यात आला. तर सन 2025-26 करिता मनपाने प्रस्तावित उत्पन्न रु.1523.27 कोटी असुन त्यात विविध विभागाने प्रस्तावित केलेला खर्च रु.1517.42 कोटी होत आहे. यामध्ये महापालिकेचे सन 2025-26 चे महसुली जमा रु.665.04 कोटी असुन एकूण महसुली उत्पन्नामधून होणारा खर्च रु.664.98 कोटी आहे. महसुली आणि भांडवली लेखाशीर्ष यांच्या जमा/खर्चाच्या रक्कमांच्या तपशीलासह रु.5.85 लक्ष शिल्लकीचा अर्थसंकल्प यावेळी मुख्य लेखाधिकारी डॉ.जनार्दन पक्वान्ने यांनी आयुक्तांकडे सादर केला.या दोनही अर्थसंकल्पाचे वाचन करुन महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 492 नुसार आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी अर्थसंकल्पास मंजुरी दिली.
आयुक्तांनी अर्थसंकल्पीय मनोगत व्यक्त करतांना सन 2024-25 च्या अर्थसंकल्पीय अंदाज मध्ये आम्ही निश्चित केलेले लक्षांक-उद्दिष्टे साध्य करण्याचा आणि उत्पन्नाच्या उपलब्ध मर्यादित साधनांच्या सहाय्याने नांदेड-वाघाळा शहरातील नागरिकांना अत्यावश्यक सेवा पुरविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. परंतु सातव्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने मा.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व्याजासह द्यावी लागणारी थकबाकी, 15 व्या वित्त आयोगाचे अद्याप प्राप्त न झालेले अनुदान, वाढते विद्युत देयके, जलसंपदा विभागाचे थकीत शुल्क, भूसंपादनाच्या न्यायालयीन प्रकरणामुळे द्यावा लागणारा अतिरिक्त मावेजा इत्यादी कारणांमुळे आकस्मिक होणारा वाढीव खर्चामुळे उत्पन्नाच्या स्त्रोतांवर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे महानगरपालिकेला थोडी तडजोड करावी लागत आहे. तथापि अत्यावश्यक सेवा जसे पाणी पुरवठा, दिवाबत्ती यांच्या सेवा सुरळीत राहण्याच्या दृष्टीने उचित पावले टाकत महानगरपालिकेच्या उत्पन्नात भर घालण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे प्रतिपादन यावेळी आयुक्तांनी केले.
तसेच आयुक्तांनी मागील वर्षाचा धावता आढावा घेतांना सन 2024-25 मध्ये नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने आपल्या अर्थसंकल्पीय अंदाज बैठकीत नांदेड शहरातील नागरीकांसाठी निश्चित केलेल्या विविध सोयी सुविधा सक्षमपणे पुरविणे जसे सौर ऊर्जा प्रकल्पासारखे अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत निर्माण करणे, हरित-नांदेड निर्माणाच्या दृष्टीकोनातून वृक्षारोपण व वृक्षसंगोपण करणे, पर्यावरण संरक्षणासाठी गोदावरी स्वच्छता, शहरातील प्रलंबित विविध विकास कामे पूर्णत्वास नेणे, शासनाच्या विकासाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे यासारखी उद्दीष्टे निर्धारित केली होती. संगणकीकरण व मोबाइल टेक्नॉलॉजीच्या युगात महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत येणाऱ्या 74 विविध सेवा - जसे - मालमत्ता नाव परिवर्तन, नवीन नळ जोडणी, ना देय प्रमाणपत्र, होर्डिंग आरक्षण यासारख्या बहुतांश सेवा या मोबाइल ॲप आणि संकेतस्थळाच्या माध्यमातून पुरविण्यावर भर देण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते.सन 2024-25 अंदाजपत्रकातील उत्पन्नाच्या आणि खर्चाच्या महत्वाच्या आणि वैशिष्ट्यपूर्ण बाबी तसेच महानगरपालिकेच्या विविध विभागांसाठी निर्धारित केलेली महत्वाची लक्षांके-उद्दिष्टे साध्य करण्यात महानगरपालिका यशस्वी झाली असल्याचे यावेळी आयुक्तांनी कथन केले.
मनपा आयुक्तांनी सन 2024-25 चे सिंहावलोकन करतांना महानगरपालिकेने बंजारा हॉस्टेल व महानगरपालिकेच्यार इतर जागांवर गाळ्यांचे बांधकाम करुन उत्पन्नात वाढ केली, डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नूतनीकरण, काबरा नगर, जल शुध्दीकरण केंद्र परिसरातील महानगरपालिकेच्या जागेवरील पहिल्या टप्प्यातील 31 गाळ्यांचे बांधकाम पूर्ण करुन उत्पन्नात वाढ केली, अृमत 2.0 योजने अंतर्गत River Pollution Control Structure प्रकल्प उभारणे, महानगरपालिकेच्या इमारतींवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारणी, सुंदर नांदेड-हरित नांदेड उपक्रम राबवुन शहरात वृक्षलागवड, वृक्ष गणना व वृक्ष पुनर्रोपण कार्यक्रम राबविणे, भुजल पुनर्भरण, नविन अग्निशमन वाहने घेऊन अग्निशमन सेवांचे सक्षमीकरण, यांत्रिकी विभागाच्या ताफ्यात नवीन वाहनांचा समावेश, राज्य व केंद्र शासनाच्या अमृत 2.0 व महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान योजना कार्यान्वित असुन पेमेंट गेट वे, मोबाईल ॲप आणि ब्ल्यु टुथ प्रिंटर व्दारे कर संकलन, प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजना, त्याचप्रमाणे महानगरपालिका अधिकारी/कर्मचारी यांना लागू केलेले विविध लाभ जसे की, वैद्यकीय तपासणी योजना, गुणवंत पाल्यांसाठी प्रोत्साहनपर बक्षीस योजना, जुनी निवृत्ती योजना, लाड-पागे समितीच्या शिफारशी नुसार आणि अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या, पदोन्नती, आश्वासित प्रगती योजना, सातवा वेतन आयोग, आकृतिबंध आणि सेवा प्रवेश नियमांची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्याचे आयुक्तांनी सांगितले.
तसेच आयुक्तांनी मनोगतामध्ये सन 2025-26 च्या अर्थसंकल्पातील ठळक बाबी नमुद करतांना सन 2025-26 या वर्षात कोणत्याही प्रकारची कर वाढ प्रस्तावित करण्यात आलेली नाही.परंतु करवाढीशिवाय उत्पन्नवाढीचे विविध उपाय आणि खर्चातील बचत यामुळे नागरिकांसाठीच्या सोई-सुविधांवर कोणताही परिणाम होणार नाही. नागरिकांच्या आणि शहराच्या विकासासाठी महापालिका सदैव तत्पर असुन नागरिकांना पारदर्शक, तत्पर आणि उत्तरदायी सेवा पुरविण्यासाठी महानगरपालिका सतत प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून गतवर्षी महापालिकेने नागरिकांच्या सेवेसाठी MyNWCMC या ॲप च्या माध्यमातून नागरी तक्रार निवारण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्याचा शहरातील सुमारे 872 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्यापैकी 650 तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. सन 2025-26 मध्ये महानगरपालिका कॉल सेंटरची उभारणी करून त्याद्वारे नागरिकांच्या समस्या जाणून घेवून त्यांचे तातडीने निराकरण करण्यात येईल. सन 2025-26 मध्ये नागरिकांच्या उत्तम आरोग्याच्या दृष्टीने वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. त्याचप्रमाणे नागरिकांसाठी क्रीडा, पर्यटन आणि मनोरंजनाचे साधने निर्माण करण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे सांगुन यावेळी आयुक्तांनी आपल्या मनोगतात सन 2025-26 या पुढील वर्षात महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत येणाऱ्या विविध 74 सेवांपैकी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या 28 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून दिनांक 26 मार्च,2025 रोजी किमान 28 सेवा नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे नमुद केले.
येत्या वर्षात कर महसुल वाढीसाठी शासनाच्या निर्देशाप्रमाणे मालमत्तांचे सर्वेक्षण करुन महापालिकेच्या उत्पन्नात भर टाकण्याचा मनसही आयुक्तांनी याप्रसंगी व्यक्त केला. तसेच मालमत्ता करातील सवलती देतांना गतवर्षी प्रमाणेच याही वर्षी माहे एप्रिल 2025 पूर्वी कर भरणा केल्यास 7% , माहे मे 2025 पूर्वी कर भारणा केल्यास चालु मालमत्ता करात 6% आणि माहे जून 2025 पूर्वी भरणा केल्यास चालु मलामत्ता करात 5% सवलत देण्याचे आयुक्तांनी जाहीर केले. याशिवाय महिलांना देय सामान्य कराच्या 10%, दिव्यांगांना 10%, जल पुर्नरभरण व सौजर ऊर्जा निर्मीती बसविलेल्या मालमत्ता धारकांना 5%, इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन उभारल्यास 2%, स्व.बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक किंवा त्यांच्या पत्नीस आणि स्वातंत्र्य सैनिक किंवा त्यांच्या पत्नी यांच्या निवासी मालमत्तेच्या सामान्य करात 100% सुट आयुक्तांनी जाहीर केली आहे. तसेच शहरातील करदात्यांकडे मालमत्ता कर व पाणीपट्टी/पाणी शुल्क याची शास्तीसह मोठ्या प्रमाणावर थकबाकी असून दिनांक 20 मार्च 2025 अखेर थकबाकीची एकूण रक्कम सुमारे ₹479.01 कोटी (पाणी पट्टी ₹265.82 कोटी आणि एकूण मालमत्ता कर ₹ 213.19 कोटी ) आहे. सन 2025-26 करिता कर निर्धारण व कर मूल्यांकन विभागाला एकत्रित मालमत्ता कराचे ₹150.87 कोटी व पाणीपट्टीचे ₹61.70 कोटींचे महसुली जमेचे लक्ष्य निर्धारित करण्यात आल्याचे यावेळी आयुक्तांनी सांगितले.
तसेच येत्या वर्षात शहरवासीयांना दररोज पाणी पुरवठा, प्रायोगिक त्तवावर 24x7 पाणी पुरवठा, किंवळा साठवण तलावावर तरंगते पंप हाऊस, मलनिस्सारण व्यवस्थेत OCEMS प्रणाली, शहरातील वाहतुक कोंडीवर उपाय योजनेचा भाग म्हणुन स्वतंत्र वाहतूक कक्ष नियोजन कक्ष, फ्रि लेफ्ट साठी आवश्यक पूर्ताता, नवीन सिंग्नल यंत्रणेसह नांदेड शहराच्या प्रवेश मार्गावर स्वागत कमान उभारण्याचा मानस यावेळी आयुक्तांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे नांदेड शहरात इतर नागरी सुविधा निर्माण करण्याच्या हेतुने संविधान भवन उभारणे, डिजिटल लायब्ररी उभारणे, डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नुतनीकरण, किवळा तलावाजवळील महानगरपालिकेच्या जागेवर थीम पार्क, वॉटर स्पोर्टस आणि अम्युजमेंट पार्क उभारणी करणे, नंदीग्राम मार्केट येथील जागेवर बहुस्तरीय वाहनतळ निर्माण करणे, महिला वर्ग व मुलींसाठी स्वतंत्र शौचालय व्यवस्था, नांदेड शहराच्या सिडको-हुडको भागातील साई मंगल कार्यालयाच्या नूतणीकरणासह क्रिडा संकुल उभारणे, सिडको भागात जल-तरणिका व नवीन उद्यान विकसित करणे, स्टेडीयम पसिरात क्रिकेट प्रबोधिनी, रणजी सामन्यांचे आयोजन, विमानतळ परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहाय्याने उद्यान विकसीत करणे, जुना मोंढा टॉवर परिसराचे सुशोभीकरणासह नुतनीकरण, प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात स्वतंत्र उद्याने, असदवन येथील टेकडीवर वनोद्यान तयार करणे, माता गुजारिजी विसावा उद्यान नूतनीकरण, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकाची उभारणी, 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतुन नविन 19 दवाखाने, हैदरबाग व शिवाजी नगर मनपा दवाखान्यांच्या बाह्यरुग्ण विभागातील तपासणी मोफत करणे, उत्तर नांदेडसाठी स्वतंत्र घनकचरा प्रकल्प,घंटागाड्यांच्या संख्येत व क्षमतेत वाढ रोड स्वीपर यंत्राचा वापर, महानगरपालिकेसाठी e-Office प्रकल्प इत्यादी प्रकल्प येत्या वर्षात पूर्णत्वास नेऊन यासंह महानगरपिालकेच्या प्रशासनासाठी पायाभूत सुविधेंचे सक्षमीकरण आणि अधुनिकीकरण करण्याचा मानस यावेळी आयुक्तांनी व्यक्त केला आहे.
अर्थसंकल्पीय सभेनंतर मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधुन पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर सभेचे कामकाज संपल्यानंतर सर्व माध्यम प्रतिनिधी तथा पत्रकार मनपा अधिकारी व कर्मचारी यांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला.
अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्टे :-
1) कोणतीही कर वाढ न करता शहरवासीयांना दिलासा.
2) नांदेड शहरात संविधान भवनाची उभारणी.
3) मालमत्ता करामध्ये सवलती.
4) स्वतंत्र वाहतुक नियोजन कक्षाची उभारणी.
5) दक्षिण नांदेड शहरासाठी किवळा साठवन तलाव येथुन पाणी पुरवठ्याचे नियोजन.
6) सेवा हक्क कायद्यानुसार 74 सेवा ऑनलाइन करणे.
7) स्टेडीयम परिसरात क्रिकेट प्रबोधिनी व रणजी सामान्यांचे आयोजन.
8) नविन उद्याने विकसित करणे.
9) पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मारकाची उभारणी.
10) महापालिका कार्यालयासाठी e-Office प्रकल्प.
No comments:
Post a Comment