बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी संपूर्ण आंबेडकरी बौद्ध समाजाची एकजूट ; 14 ऑक्टोबर रोजी मुंबईत राणीबाग ते आझाद मैदान विराट रॅली चे आयोजन ~ केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 16 September 2025

बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी संपूर्ण आंबेडकरी बौद्ध समाजाची एकजूट ; 14 ऑक्टोबर रोजी मुंबईत राणीबाग ते आझाद मैदान विराट रॅली चे आयोजन ~ केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले


मुंबई 16 - बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांचे सर्वोच्च जागतिक श्रद्धास्थान आहे. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांना जिथे ज्ञानप्राप्ती झाली ते बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या पूर्णपणे ताब्यात नाही. ज्या कर्मकांड पिंडदानाला अंधश्रद्धेला भगवान बुद्धांनी विरोध केला ते प्रकार महाबोधी महाविहार परिसरात होत असल्याने जगभरातील बौद्धांच्या भावना दुखावल्या जात आहेत.महाबोधी महाविहार व्यवस्थापन ट्रस्ट मध्ये चार हिंदू चार बौद्ध आणि एक कलेक्टर असे सदस्य असतात..कलेक्टर जर हिंदू असेल तर ते चेअरमन असतात.


महाबोधी महाविहार पूर्णतः बौद्धांच्या ताब्यात नाही.त्यामुळे महाबोधी महाविहार व्यवस्थापन कायदा 1949 ज्याला बिटी ऍक्ट म्हटले जाते तो बी टी ऍक्ट रद्द झाला पाहिजे. भारताचे संविधान 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले असून त्यापूर्वीचा 1949 चा बिहार विधानसभेचा बिटी ऍक्ट रद्द झाला पाहिजे.महाबोधी महाविहार ट्रस्ट मधील सर्व 9 सदस्य आणि चेअरमन हे बौद्ध असले पाहिजेत.प्रत्येक धर्माचे धार्मिकस्थळ त्या त्या धर्माच्या ट्रस्ट कडे असतात.हिंदू मंदिरात हिंदू ट्रस्टी; मुस्लिमांच्या दर्गा ~ मशीद मध्ये मुस्लिम ट्रस्टी;  शिखांच्या गुरुद्वारात शीख ट्रस्टी मग बौद्धांचे बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात का नाही? बौद्धांच्या बुद्धविहार  ट्रस्ट मध्ये बौद्ध ट्रस्टी का नको? महाबोधी महाविहार  बौद्धांचे असून त्याचे व्यवस्थापन पूर्णपणे बौद्धांचे असले पाहिजे.महाबोधी महाविहार इतरांच्या ताब्यातून मुक्त करून बौद्धांच्या ताब्यात द्यावे.या मागणीसाठी महाराष्ट्रातील सर्व रिपब्लिकन गट सर्व बौद्ध आंबेडकरी संघटना;  सर्व पक्षीय बौद्ध नेते  एकत्र आले  असुन  येत्या 14 ऑक्टोबर 2025  रोजी दुपारी  12 वाजता महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी  भायखळा राणीबाग ते आझाद मैदान अशी मुंबईत शांततापूर्ण विराट रॅली आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीत प्रचंड संख्येने सर्व बौद्ध आंबेडकरी जनतेने ताकदीने सहभागी व्हावे असे आवाहन महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या एकजुटीचे निमंत्रक रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.या पत्रकार परिषदेस महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी एकत्रित आलेले  विविध पक्षांचे अनेक  बौद्ध नेते ; विविध रिपब्लिकन गटांचे नेते  उपस्थित होते. 


मुंबईत गरवारे क्लब  येथे महाबोधी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी मुंबईत आयोजित  करण्यात येणाऱ्या विराट रॅली चे नियोजन करण्यासाठी सर्व रिपब्लिकन गटांची सर्व बौद्ध आंबेडकरी संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत महाबोधी महाविहार मुक्ती साठी मुंबईत सर्व बौद्धांच्या एकजुटीची रॅली 14 ऑक्टोबर ला भायखळा राणी बाग ते आझाद मैदान अशी आयोजित करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. यावेळी बैठकीचे  निमंत्रक ना.रामदास आठवले; प्रा.जोगेंद्र कवाडे; डॉ राजेंद्र गवई; नाना इंदिसे; खासदार चंद्रकांत हंडोरे; खासदार वर्षाताई गायकवाड; अर्जुन डांगळे;  अक्षय आंबेडकर; राजू वाघमारे; जयदेव गायकवाड; अविनाश महातेकर; राम पंडागळे;भाई गिरकर ; दैनिक सम्राट चे संपादक कुणाल बबन कांबळे; तानसेन ननावरे; काकासाहेब खंबाळकर; सागर संसारे; दिलीप जगताप; सुनील निर्भवने; सुरेश केदारे; नितीन मोरे;  मिलिंद सुर्वे; विलास  रूपवते ; रवी गरुड; महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक आकाश लामा; पूज्य भदंत राहुल बोधी महाथेरो; भदंत विरत्न थेरो;  भदंत आयुपाल; भदंत शांतिरत्न; भदंत लामा; आदी अनेक मान्यवर सर्व बौद्ध संघटना आणि रिपब्लिकन गटांचे नेते उपस्थित होते.


महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी 14 ऑक्टोबर ही तारीख सर्वानुमते ठरवण्यात आली आहे.महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी  बौद्ध धम्माची धम्मदीक्षा घेऊन या देशात धम्मचक्र प्रवर्तित केले.त्यामुळे 14 ऑक्टोबर ही तारीख धम्मासाठी योगदान देण्याची तारीख असून येत्या 14 ऑक्टोबर रोजी महाबोधी महाविहार मुक्ती साठी भायखळा राणीबाग ते आझाद मैदान अशी शांततापूर्ण विराट रॅली आयोजित करण्यात आली आहे.एक दिवस धम्मासाठी देऊया आणि महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी यंदा 14 ऑक्टोबर मुंबईत जाऊया असा निर्धार करून मुंबई ठाणे रायगड नाशिक पालघर सह राज्यभरातील बौद्ध आंबेडकरी जनतेने या रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन आणि  सर्व आंबेडकरी बौद्ध नेत्यांनी केले आहे.


 महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या रॅलीला ॲड.प्रकाश आंबेडकर; भीमराव आंबेडकर; आनंदराज आंबेडकर यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे असे संयोजकांनी सांगितले.



No comments:

Post a Comment

Pages