मुंबई : - महाराष्ट्र आणि देशाच्या वेगवेगळ्या भागात पावसाचा जोर अजूनही कायम आहे. परतीच्या वाटेवर असलेल्या मान्सूनचा अनेक ठिकाणी फटका बसला असून, पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पण, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये धो धो बरसलेला मान्सून कधीपर्यंत भारतात मुक्कामी असणार आहे? यावर्षीची दिवाळी पावसातच साजरी करावी लागणार आहे? याचं अखेर हवामान विभागाने उत्तर दिलं आहे. हवामान विभागाने देशाच्या कोणत्या भागातून मान्सून कधी परत जाणार याचा अंदाज मांडला आहे.
ठरलेल्या वेळेआधीच भारतात दाखल झालेल्या मान्सूनने निर्धारित तारखेआधीच परतीचा रस्ता धरला आहे. १४-१५ सप्टेंबरपासून मान्सून परतीचा प्रवास सुरू झाला असून, हळूहळू तो पुढे सरकत आहे. २१ सप्टेंबरपर्यंत मान्सूनने गुजरात मध्य प्रदेश गाठले आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे मान्सून १५ ऑक्टोबरपर्यंत भारतातून जाईल. त्यामुळे यंदा दिवाळीपर्यंत मान्सूनचा मुक्काम नसणार आहे. महाराष्ट्रातून मान्सून १० ऑक्टोबर पर्यंत जाण्याचा अंदाज आहे. १५ ऑक्टोबरपर्यंत मान्सून कर्नाटकपर्यंत पोहोचेल.
२३-२७ सप्टेंबर या कालावधीत मान्सून ओडिशामध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. २४ ते २७ सप्टेंबर दरम्यान झारखंड आणि आंध्र प्रदेश किनारपट्टी भागातही मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार परतीच्या मार्गावर असलेला मान्सून अनेक भागांना झोपडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे.
राज्यातील अनेक भागात पुढील काही दिवस मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांत हवामान ढगाळ राहण्याचा अंदाज असून, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment