किनवट,दि.६ : अतिवृष्टीने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी शिवसेनेतर्फे "ढोल बजाओ आंदोलन" करण्याची घोषणा करण्यात आली आहे. हे आंदोलन बुधवारी (दि.८) सकाळी ११ वाजता जिजामाता चौक, किनवट येथे होणार आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना उपनेते बबनराव थोरात ,संपर्क प्रमुख, नांदेड आणि शिवसेना जिल्हा प्रमुख जोतिबा दादा खराटे हे करणार आहेत.
शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीकडे शासनाचे दुर्लक्ष होत असताना, "देवाभाऊच्या बेडसाठी २१ लाख रुपये खर्च केले जातात; पण शेतकऱ्यांना मदत देताना शासन मुकाट का?" असा सवाल शिवसैनिकांनी उपस्थित केला आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी हेक्टरी रुपये ५०,००० इतकी मदत त्वरित जाहीर करावी, नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ करून त्यांना दिलासा द्यावा,कठीण प्रक्रिया व पंचनामे बाजूला ठेवून विमा लाभ त्वरित खात्यात जमा करावेत,अतिवृष्टीत नुकसान झालेल्यांना जुने निकष न लावता योग्य भरपाई देण्यात यावी,या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
शिवसेनेने इशारा दिला आहे की, जर शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्या तात्काळ मान्य केल्या नाहीत, तर येत्या काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर किनवट शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे.
No comments:
Post a Comment