नवी दिल्ली :- दिल्लीतील लाल किल्ला कारस्फोटामध्ये आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २५ जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. स्फोटाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवला आहे. त्यामुळे आता NIA या प्रकरणाचा पुढील तपास करेल.तसेच देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज त्यांच्या निवासस्थानी या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावली. सकाळी ११ वाजता बैठक सुरू झाली. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. बैठकीनंतरच कार स्फोटाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला. तसेच देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन, गुप्तचर विभागाचे (आयबी) संचालक, दिल्ली पोलीस आयुक्त आणि एनआयएचे महासंचालक यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. याच दरम्यान, जम्मू-काश्मीरचे डीजीपी व्हर्चुअली या बैठकीत सहभागी झाले.
कारस्फोटाची तीव्रता इतकी होती की जवळपासच्या अनेक वाहनांची जळून राख झाली, ज्यामुळे रस्त्यावर मोठा गोंधळ उडाला. प्रत्यक्षदर्शींच्या मते, परिसर आगीने वेढला गेला आणि जखमी मदतीसाठी ओरडत होते. जखमींमध्ये गौरी शंकर मंदिरातून परतणारे अंकुश शर्मा (२८) आणि राहुल कौशिक (२०) यांचा समावेश आहे. स्फोटात अंकुशचे शरीर सुमारे ८० टक्के भाजले आहे आणि त्याची प्रकृती गंभीर आहे.
दिल्ली पोलिसांच्या प्राथमिक तपासात हा स्फोट आत्मघाती हल्ला असण्याची शक्यता आहे. फरिदाबाद मॉड्यूलच्या अटकेची माहिती मिळताच संशयिताने आत्मघाती हल्ल्याची योजना आखल्याचं तपासात उघड झालं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटामागील हेतू निश्चित करण्यासाठी सर्व संबंधित एजन्सी प्रत्येक पैलूचा तपास करत आहेत.

No comments:
Post a Comment