सहा महिन्यांपासून कमिशन थकीत; स्वस्त धान्य दुकानदारांचा आंदोलनाचा इशारा
किनवट, ता. २३ : शासन आणि शिधापत्रिकाधारक यांच्यातील महत्त्वाचा दुवा मानल्या जाणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारांवर सध्या गंभीर आर्थिक संकट ओढवले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून कमिशनची रक्कम न मिळाल्याने अनेक दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली असून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही कठीण झाले आहे. प्रलंबित कमिशन तातडीने अदा करण्यात यावे, अन्यथा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकाने बंद ठेवून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा किनवट तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय गड्डमवाड यांनी जिल्हाधिकारी डॉ. राहुल कर्डिले यांना नुकत्याच दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
कोरोना महामारीच्या कठीण काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वस्त धान्य दुकानदारांनी शासनाच्या आदेशाचे काटेकोर पालन करत प्रत्येक शिधापत्रिकाधारकापर्यंत अन्नधान्य पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. लॉकडाऊनच्या काळातही अनेक अडचणींवर मात करत त्यांनी धान्य वितरणाची सेवा अखंडित ठेवली. मात्र, जनतेचे पोट भरणाऱ्या याच दुकानदारांना आज स्वतःच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची चिंता सतावत आहे.
संघटनेच्या निवेदनानुसार, स्वस्त धान्य दुकान हे अनेक दुकानदारांच्या कुटुंबाचे एकमेव उत्पन्नाचे साधन आहे. शासनाकडून मिळणाऱ्या तुटपुंज्या कमिशनवरच त्यांचा संसार चालतो. जानेवारी महिन्यापासून कमिशनची रक्कम थकीत असल्याने घरखर्च, वीजबिल, मुलांचे शिक्षण, आरोग्यविषयक खर्च आणि दैनंदिन गरजा भागविताना मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत.
यंदाच्या खरीप हंगामासाठी बियाणे व खतांच्या वाढत्या खर्चामुळे तसेच वाढत्या महागाईमुळे दुकानदारांची आर्थिक कोंडी आणखी वाढली आहे. वेळेवर कमिशन न मिळाल्याने अनेकांना कर्जाचा आधार घ्यावा लागत असून काहींची परिस्थिती अत्यंत बिकट झाली असल्याचे संघटनेने नमूद केले आहे.
शासनाच्या अन्नसुरक्षा योजनेची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारांना त्यांच्या हक्काच्या कमिशनसाठी वारंवार पाठपुरावा करावा लागत असल्याबद्दल संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे.
प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून सर्व दुकानदारांची थकीत कमिशनची रक्कम अदा करावी, अन्यथा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकाने बंद ठेवून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अध्यक्ष दत्तात्रेय गड्डमवाड यांनी दिला आहे. त्यामुळे प्रशासन या मागणीची कितपत दखल घेते, याकडे तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांचे लक्ष लागले आहे.

No comments:
Post a Comment