‘सेक्युलर आर्ट मुव्हमेंट’ तर्फे चैत्यभूमी परिसरात अभिवादन चित्र प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday, 7 December 2025

‘सेक्युलर आर्ट मुव्हमेंट’ तर्फे चैत्यभूमी परिसरात अभिवादन चित्र प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

 ‘सेक्युलर आर्ट मुव्हमेंट’ तर्फे चैत्यभूमी परिसरात अभिवादन चित्र प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद



मुंबई : दादर येथील चैत्यभूमी परिसरातील शिवाजी पार्कमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सालाबाद प्रमाणे यावर्षीही चित्रकला प्रदर्शनाद्वारे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सेक्युलर मुव्हमेंट आणि सेक्युलर आर्ट मुव्हमेंट यांच्या संयुक्त वतीने झालेल्या या उपक्रमाचे नेतृत्व संस्थापक अध्यक्ष प्रा. गौतमीपुत्र कांबळे यांनी केले, तर निवृत्त पोलिस उपमहासंचालक तथा कार्याध्यक्ष भरत अण्णा शेळके हे या प्रदर्शनाचे मुख्य संयोजक होते.


या वर्षी प्रदर्शनाची गॅलरी नेहमीच्या ठिकाणाऐवजी पुस्तक विक्री मंडपासमोरच, म्हणजेच मुख्य रस्त्यालगत उभारण्यात आली होती. त्यामुळे प्रदर्शन पाहण्यास येणाऱ्या नागरिकांची व मान्यवरांची संख्याही लक्षणीयरीत्या वाढली. देश-विदेशातून आलेले साहित्यिक, प्राध्यापक, वरिष्ठ पोलिस अधिकारी, शासकीय अधिकारी तसेच परदेशी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे अनेक परदेशी तरुणांनी भारतातील सामाजिक चळवळी, संविधान मूल्ये आणि आंबेडकरी विचारसरणी या विषयांवर कलाकारांशी संवाद साधला.


प्रदर्शनामध्ये बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित विविध विषयांना हात घातला गेला होता. “मानवाधिकार”, “समता”, “संविधान”, “भारताचा सामाजिक संघर्ष”, दलित चळवळीचा इतिहास यांसारख्या संकल्पनांवर साकारलेली चित्रे सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. काही मान्यवरांनी प्रदर्शनातील चित्रांच्या अभ्यासासाठी विशेष वेळ देऊन कलाकारांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले.


सामान्य नागरिकांसोबतच मोठ्या प्रमाणात तरुण कलाकार व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून या उपक्रमात सहभाग नोंदवला. सामाजिक बांधिलकीची जाण, अभिवादनाची नवीन कलात्मक पद्धत आणि आंबेडकरी विचारांची अभ्यासपूर्ण मांडणी यामुळे या प्रदर्शनाने चैत्यभूमी परिसराला एक वेगळी कलात्मक ओळख मिळवून दिली आहे, असे मत अनेकांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

Pages