बुद्धाची करुणामय नैतिकताच बाबासाहेबांच्या रिपब्लिकन विचारांचा पाया : डॉ. सुखदेव थोरात
नांदेड,ता.१२(प्रतिनिधी) : “बुद्धाची करुणामय, मानवतावादी व विवेकाधिष्ठित नैतिकताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रिपब्लिकन व्हिजनचा कणा आहे,” असे ठाम मत सुप्रसिद्ध विचारवंत व विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी व्यक्त केले.
कल्चरल असोसिएशनतर्फे आयोजित फुले–शाहू–आंबेडकर–अण्णाभाऊ साठे व्याख्यानमालेतील “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातील रिपब्लिकन व्हिजन” या विषयावरील पहिल्या पुष्पाचे गुंफण करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विठ्ठल खाडे होते.
डॉ. थोरात म्हणाले, बाबासाहेबांच्या विचारांवर चालणाऱ्या पक्ष व संघटना जर त्यांचे विचार प्रमाण मानत असतील, तर एकाच विचारधारेवर आधारित इतक्या वेगवेगळ्या संघटना का निर्माण झाल्या, हा प्रश्न गंभीर आहे. बाबासाहेबांच्या विचारांचे भिन्न आकलन व मांडणी यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. जात ही केवळ सामाजिक रचना नसून ती एक सुसंगत विचारधारा असून भेद, श्रेणीक्रम व वर्चस्वावर आधारित आहे. त्यामुळेच इतिहासकाळापासून विषमता, शोषण व अन्यायाविरुद्ध संघर्ष सुरू आहे.
या विषमतेच्या मुळावर घाव घालण्यासाठी बाबासाहेबांनी सामाजिक, राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक अशा सर्व पातळ्यांवर समतेची रचना उभी करण्याचा विचार मांडला. सामाजिक जीवनात स्वातंत्र्य, समता, बंधुता, राजकीय व्यवस्थेत संसदीय लोकशाही, आर्थिक पातळीवर राज्य समाजवाद आणि सांस्कृतिक जीवनात बुद्धाची करुणामय नैतिकता—या चार आधारांवर बाबासाहेबांचा रिपब्लिकन व्हिजन उभा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भारताच्या बहुविध सामाजिक वास्तवाची जाणीव बाबासाहेबांना होती. म्हणूनच इंग्लंडसारख्या राजकीय बहुसंख्याकतेपेक्षा भारतात कम्युनल किंवा जातीय बहुसंख्याकतेचा धोका अधिक असल्याचा इशारा त्यांनी दिला होता. अशा बहुसंख्याकवादात अल्पसंख्याकांचे हक्क दडपले जाण्याची भीती त्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे संसदेतून निवडून आलेल्या प्रतिनिधींनी पंतप्रधानाची निवड करावी आणि मंत्रिमंडळात अल्पसंख्याकांना व्यापक प्रतिनिधित्व मिळावे, असे उपाय त्यांनी सुचविले होते.
आज संविधानातील समतावादी मूल्यांनाच विरोध होत असल्याचे चित्र दिसत असले, तरी समता विरुद्ध विषमता हा संघर्ष जुना असून अखेरीस समतेचाच विजय होतो, असा विश्वास डॉ. थोरात यांनी व्यक्त केला. धर्मराष्ट्राची भाषा प्रत्यक्षात विषमतेवर आधारित संकल्पना पुढे नेत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. विठ्ठल खाडे म्हणाले, बाबासाहेबांची सामाजिक लोकशाही अजून समाजात पुरेशी रुजलेली नाही. वैचारिक पातळीवर व्यापक प्रबोधन करूनच चळवळींना नवसंजीवनी देता येईल.
कार्यक्रमाची सुरुवात बोधी वृक्षाच्या रोपट्यास मान्यवरांच्या हस्ते पाणी देऊन करण्यात आली. प्रास्ताविक डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी केले. पंकज शिरभाते व सुरेश दादा तळवटकर यांनी स्वागतगीत सादर केले. सूत्रसंचालन डॉ. विजयकुमार माहुरे यांनी केले, तर आभार डॉ. पंडित सोनाळे यांनी मानले.



No comments:
Post a Comment