"नागसेन फेस्टिव्हलच्या दशकपूर्तीच्या जल्लोषात भव्य भीमजयंती सोहळा"
दशकपूर्ती वर्षानिमित्त बौद्धिक, सांस्कृतिक, कलात्मक उपक्रमांची पर्वणी
छ. संभाजीनगर, दि. २३ :
पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या काही मोजक्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी १२५ व्या भीमजयंतीनिमित्त एकत्र येऊन सुरू केलेला नागसेन फेस्टिव्हल हा महोत्सव यंदा दहाव्या वर्षात पदार्पण करत आहे. दशकपूर्तीच्या निमित्ताने या महोत्सवाचा जल्लोष आणि भीमजयंतीचा दिमाखदार सोहळा दि. २९, ३० व ३१ मार्च रोजी नागसेनवनातील लुम्बिनी उद्यान, मिलिंद महाविद्यालय येथे दररोज सायं. ६ ते १० या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.
दि. २९ मार्च रोजी कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, लेखक व सामाजिक कार्यकर्ते चेतन कुमार (अहिंसा) यांच्या हस्ते या फेस्टिव्हलचे उद्घाटन होणार आहे. दिल्ली येथील ज्येष्ठ पत्रकार उर्मिलेश हे ‘बहुजनांच्या शैक्षणिक नाकेबंदीचे राष्ट्रीय षडयंत्र’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. तर ‘मार्मिक’ या व्यंगचित्र मासिकाचे व्यंगचित्रकार गौरव सर्जेराव यांची उपस्थिती असणार आहे.
तसेच नितीन गायकवाड प्रस्तुत ‘भीमस्मरण’ हा शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम सादर होणार असून मुरलीधर ताकवाले क्लॅरिनेट या वाद्यावर भीमगीतांचे सादरीकरण करतील.
दि. ३० मार्च रोजी ‘आडवी आर्ट (ADAVI Art), बंगलोर’ यांच्या वतीने दक्षिण भारतात, विशेषतः तामिळनाडूमध्ये दलितांच्या सामाजिक समता आणि सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक मानले जाणारे ‘पाराई’ हे वाद्य १२ कलावंतांच्या समूहाद्वारे सादर करण्यात येणार आहे.
त्यानंतर डिजिटल मीडिया अर्थात यूट्यूब, वेब पोर्टल, पॉडकास्ट यांच्या माध्यमातून देशातील शैक्षणिक व सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करणाऱ्या युवा पत्रकारांचा ‘नव माध्यमातील आंबेडकरी पत्रकारितेचे वर्तमान आणि भविष्य’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या परिसंवादात सुमित चौहान (दिल्ली), साहिल वाल्मिकी (नोएडा), हितेश कुमार (दिल्ली), राज असरोडकर (उल्हासनगर), राहुल डोंगरे (नागपूर) आणि मनीष सागर (मनाली) सहभागी होणार आहेत.
त्यानंतर ‘एल्गार समतेचा’ हे कवी संमेलन पार पडणार आहे. यासाठी विशेष अतिथी म्हणून ‘कौन जात हो भाई’ या प्रसिद्ध कवितेचे रचनाकार युवा कवी बच्चालाल उन्मेष (बनारस), डॉ. अनिकेत खांडकर (मुंबई), गिरीश खोब्रागडे (यवतमाळ) आणि रमेश बुरबुरे (गडचिरोली) उपस्थित राहणार आहेत.
फेस्टिव्हलच्या समारोप प्रसंगी दि. ३१ रोजी रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्राप्त सफाई कर्मचारी आंदोलनाचे राष्ट्रीय संयोजक बेजवाडा विल्सन हे ‘तंत्रज्ञानाचा बुरखा, मॅन्युअल स्कॅव्हेंजिंगचा चेहरा : भारताचं जात वास्तव’ या विषयावर भाष्य करतील. या सत्राचे अध्यक्ष म्हणून सिने अभिनेते व लेखक मिलिंद शिंदे हे असणार आहेत.
त्यानंतर ‘जल्लोष भीमजयंतीचा’ या विशेष सत्रात प्रांजल सुरडकर, रिदम रिव्होल्यूशन संघाचा फ्लॅश मॉब, विपीन तातड आणि टीम यांचे रॅप सादरीकरण होईल. तसेच VIP श्रावस्ती आणि हरीश कांबळे हे देखील रॅप सादर करतील. तर लिटिल स्टार अरहं वाळके हा बाल कलाकार भीमगित सादर करणार आहे.
स्वाक्षरी मोहीम
फेस्टिव्हलच्या तिन्ही दिवसांत महाबोधी बुद्धविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ तसेच शैक्षणिक क्षेत्रातील भेदभावाच्या विरोधात ‘रोहित ॲक्ट’च्या धर्तीवर कडक कायदा करावा, तसेच अनुसूचित जातींच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची शिफारस करणारा बदर समितीचा अहवाल फेटाळून उपवर्गीकरण रद्द करावे, या मागण्यांसाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे. संकलित स्वाक्षऱ्यांचे निवेदन शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
व्यंगचित्र प्रदर्शन
नागसेन फेस्टिव्हल अंतर्गत मिलिंद नागसेनवन स्टुडंट्स वेल्फेअर असोसिएशन आणि ‘कंबाईन कार्टूनिस्ट’ या व्यंगचित्रकार संस्थेच्या संयुक्त विद्यमाने लोकशाही, संविधान, शैक्षणिक क्षेत्रातील भेदभाव, हुकूमशाही अशा विविध विषयांवर परखड व मिश्किल भाष्य करणारे महाराष्ट्रातील नामवंत व्यंगचित्रकारांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन तिन्ही दिवस आयोजित करण्यात येणार आहे.
शहरातील निवडक दहा बौद्ध विहार समित्यांचा ‘कृतिशील बौद्ध विहार’ म्हणून विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
जिल्हा वकील संघातून बहुमताने विजयी ठरलेल्या डॉ. आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
दर रविवारी शहरातील अनेक बुद्ध विहारांमध्ये मोफत वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या दामा हेल्थकेअर फाउंडेशनच्या सर्व सदस्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
अनेक कलांचा संगम | कलावंतांसाठी पर्वणी
बौद्धिक उपक्रमांसाठी प्रभावी ठरत असलेला नागसेन फेस्टिव्हलचा मंच आता कलावंतांसाठीही हक्काचा मंच म्हणून समृद्ध होत आहे. यंदा ‘नागसेन कला दालन’ उभारून त्यामध्ये व्यंगचित्र प्रदर्शन, लाईव्ह पेंटिंग डेमोस्ट्रेशन, लाईव्ह मूर्तिकला डेमोस्ट्रेशन, स्टोन आर्ट अशा विविध कलाप्रकारांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. यासाठी कलावंतांना आपली कला सादर करण्याची विशेष संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नागसेन चषक क्रिकेट स्पर्धा
या अंतर्गत नागसेनवनातील विविध महाविद्यालयांच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमध्ये मैत्रीपूर्ण क्रिकेट सामने होणार असून या स्पर्धेमुळे कर्मचारी वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या सामन्यांमुळे परस्पर संवाद व स्नेह दृढ होणार असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.
तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेताना सादर केलेले युगयात्रा हे महानाट्य 70 वर्षांनंतर पुन्हा सादर करणाऱ्या मिलिंद कला महाविद्यालयाच्या ‘युगयात्रा’ या महानाट्याशी संबंधित सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सिने अभिनेते मिलिंद शिंदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे.
मिलिंद सन्मान पुरस्काराची घोषणा
समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना नागसेन फेस्टिव्हल समितीच्या वतीने देण्यात येणारा ‘मिलिंद सन्मान पुरस्कार’ यंदा जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये हर्सूल कारागृह येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन डोंगरे, विधी क्षेत्रातून ॲड. अभय भोसले, वैद्यकीय क्षेत्रातून डॉ. मनोज भुक्तार व डॉ. महेंद्र गायकवाड, संशोधन क्षेत्रातून अभिजित वाघरे, शैक्षणिक उपक्रमांतर्गत ‘बिन छताची शाळा’ या उपक्रमाचे भगवान सदावर्ते, कला क्षेत्रातून नंदकुमार जोगदंड तसेच लेणी संवर्धन व धम्म कार्यासाठी सूरज जगताप, क्रीडा संघटक म्हणून सुदंर घाटे यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
मतदान प्रक्रियेत प्रामाणिकपणा आणि लोकशाही मूल्यांचे जतन करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ.आंबेडकर नगर येथील युवकांनी राबविलेल्या एका अभिनव उपक्रमाचा विशेष गौरव यात करण्यात येणार आहे.
या दशकपूर्ती वर्षानिमित्त आयोजित सर्व उपक्रमांना मोठ्या संख्येने आजी-माजी विद्यार्थी, नागरिक व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सचिन निकम, हेमंत मोरे, ऍड.सुनील मगरे, प्रा.मिलिंद मनवर, मेघानंद जाधव, के.एम बनकर, प्रा प्रबोधन बनसोडे, अविनाश कांबळे, राष्ट्रपाल गवई, कुणाल भालेराव, रत्नदीप रगडे, सिद्धार्थ दिवेकर आदींनी केले आहे .

No comments:
Post a Comment