गीतांतून जागविला वामनदादांचा विचारवारसा
१०४व्या जयंतीनिमित्त ‘गीत काव्य गौरव’; २६ कवी-कवयित्रींचा उत्स्फूर्त सहभाग
किनवट : शब्दांना विचारांची धार आणि गीतांना परिवर्तनाची ताकद देणारे लोककवी वामनदादा कर्डक हे महाराष्ट्राच्या प्रबोधन चळवळीतील अजरामर नाव. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रभावित झालेल्या वामनदादांनी आपल्या गीतांमधून समता, न्याय, बंधुभाव आणि स्वाभिमानाचा जागर खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचविला. त्यांच्या याच विचारवारशाला गीत-काव्याच्या माध्यमातून उजाळा देत क्रांतीसूर्य ग्रुपच्या वतीने त्यांच्या १०४व्या जयंतीनिमित्त ‘गीत काव्य गौरव’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
१५ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या २६ दिवसांच्या कालावधीत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला कवी-कवयित्रींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वामनदादा कर्डक यांच्या गीतलेखन, गीतगायन आणि प्रबोधन चळवळीतील योगदानावर अल्पावधीत कविता व गीतरचना साकारून त्या प्रसारित करण्यात आल्या. नांदेड, छत्रपती संभाजीनगर, आदिलाबादसह किनवट, माहूर, हदगाव, भोकर, हिमायतनगर आदी तालुक्यांतील साहित्यिकांनी सहभाग नोंदवून वामनदादांच्या विचारांना काव्यरूपाने अभिवादन केले.
वामनदादांनी बुद्ध, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या विचारांचा जागर आपल्या गीतांतून केला. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर आंबेडकरी चळवळीला गीतांच्या माध्यमातून गतिमान करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले. त्यांच्या हजारो गीतांनी अनेक शाहीर आणि गायकांच्या स्वरातून समाजमनाला जागविले. त्यामुळे वामनदादांची गीते ही केवळ मनोरंजनाचे माध्यम न राहता सामाजिक परिवर्तनाची प्रभावी साधने ठरली.
या वैचारिक परंपरेला नव्या पिढीतील काव्यप्रतिभेची जोड देण्याचा प्रयत्न ‘गीत काव्य गौरव’ उपक्रमातून करण्यात आला. विशेष म्हणजे सहभागी कवींना अतिशय कमी कालावधीत वामनदादांच्या कार्याचा अभ्यास करून त्यावर स्वतंत्र रचना साकारायच्या होत्या. त्यामुळे हा उपक्रम सहभागी कवी-कवयित्रींसाठीही एक नवा साहित्यिक अनुभव ठरला.
क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक-कवी रमेश मुनेश्वर यांनी सहभागींच्या कवितांचे आकर्षक पेजसेटिंग व डिझायनिंग केले. सोशल माध्यमांवर या रचना प्रसारित करून वामनदादांच्या विचारांचा आणि साहित्यिक योगदानाचा जागर करण्यात आला.
या उपक्रमात कवी अशोक वासाटे, रमेश मुनेश्वर, शाहीर उत्तमराव म्हस्के, शंकर सोनकांबळे, शाहीर संभाजी गायकवाड, प्रा. एस. डी. वाठोरे, सुरेश शेंडे, शाहीर कैलास राऊत, गौतम नरवाडे, सुरेश पाटील, राहुल वाठोरे, परमेश्वर सुर्वे, भारत वाठोरे, मधु बावलकर, महेंद्र नरवाडे, राजू कांबळे, नागोराव डोंगरे, माधव सर्पे, विजय भगत, बाबुराव पाटील, प्रज्ञाधर ढवळे, विजय वाठोरे, प्रा. गजानन सोनोने, तसेच कवयित्री सुजाता पोपुलवार आणि वंदना तामगाडगे-पाटील यांनी सहभाग घेतला.
गीतांमधून पेटविलेली विचारांची ज्योत आजही समाजमन उजळवत आहे. त्याच ज्योतीला नव्या शब्दांची आणि नव्या पिढीच्या संवेदनांची जोड देण्याचे काम ‘गीत काव्य गौरव’ उपक्रमाने केले. वामनदादांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या विचारांना केवळ अभिवादन न करता ते गीत-कवितेतून पुढे नेण्याचा हा उपक्रम ठरला.
उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल संयोजक कवी महेंद्र नरवाडे यांनी सर्व सहभागी कवी-कवयित्रींचे अभिनंदन करून आभार मानले.

No comments:
Post a Comment