छत-भिंती नसलेल्या शाळेतून उभा राहणारा शिक्षणाचा दीपस्तंभ - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 17 April 2026

छत-भिंती नसलेल्या शाळेतून उभा राहणारा शिक्षणाचा दीपस्तंभ

 छत-भिंती नसलेल्या शाळेतून उभा राहणारा शिक्षणाचा दीपस्तंभ



संभाजीनगर :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज परिसरातील एका पालामध्ये घडलेला अनुभव मनाला अंतर्मुख करून गेला. काही कुटुंबे कचरा वेचण्याचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. या कुटुंबांतील मुलेही पूर्वी पालकांसोबत कचरा वेचण्यासाठी जात असत. परंतु आज त्या मुलांच्या आयुष्यात शिक्षणाचा प्रकाश पोहोचलेला पाहून मन अक्षरशः भारावून गेले.

या परिवर्तनामागे एम. पी. लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी भगवान सदावर्ते यांचे अथक प्रयत्न आहेत. एका विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्याने इतका नाविन्यपूर्ण आणि परिणामकारक उपक्रम उभा केला आहे की त्याचे वर्णन शब्दांत करणे कठीण आहे. छत-भिंती नसलेल्या शाळेमध्ये जवळपास 50 विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षणाची गोडी लावली आहे. कचरा वेचण्याच्या दुष्टचक्रातून या मुलांना मुक्त करून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे हे कार्य खरोखरच स्तुत्य आहे.

आज त्या शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, त्यांची जिज्ञासा आणि शिकण्याची ओढ अनुभवता आली. काही विद्यार्थी इतके अस्खलित इंग्रजी वाचत होते की ते ऐकून कानाला सुखद वाटले. काही विद्यार्थिनी भारतीय संविधानातील कलमे आणि प्रस्तावना आत्मविश्वासाने, अखंडितपणे म्हणताना दिसल्या. त्यांच्या ओठातून उमटणारे प्रत्येक शब्द हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील शिक्षणक्रांतीचे जिवंत चित्र होते.

या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांच्या डोळ्यांत मोठी स्वप्ने चमकत होती. कुणाला कलेक्टर व्हायचे आहे, कुणाला पोलीस अधिकारी, कुणाला डॉक्टर तर कुणाला रोबोटिक्स क्षेत्रात काम करायचे आहे. कचरा वेचणाऱ्या वस्तीत वाढणाऱ्या या मुलांच्या मनात एवढी उंच भरारी घेण्याची स्वप्ने पाहून मनाला नवी ऊर्जा मिळाली. प्राचार्य

प्र .इ सोनकांबळे प्रतिष्ठानतर्फे या सर्व विद्यार्थ्यांना भोजनदान करण्यात आले. याचबरोबर काही विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक शिक्षण पूर्ण व्हावे यासाठी दत्तक घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही घेण्यात आला. शिक्षणाच्या माध्यमातून त्यांचे आयुष्य घडवण्याचा हा प्रयत्न म्हणजे बाबासाहेबांच्या “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” या संदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणीच म्हणावी लागेल.

आजचा संपूर्ण दिवस अतिशय प्रसन्न आणि भावनिक वातावरणात गेला. तीन वर्षांच्या लहान बालकापासून ते तेरा-चौदा वर्षांच्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांच्या चेहऱ्यावर निरागस आनंद दिसत होता. त्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानण्याची वृत्ती, संयम आणि भविष्यासाठीची आशा मनाला स्पर्शून गेली.


या उपक्रमात डॉ. प्रकाश कदम, डॉ. चेतना सोनकांबळे, रुहिका सोनकांबळे, डॉ. वैशाली घोडेराव, डॉ. राजरत्न गायकवाड, कु. कल्पना कांबळे आदी मान्यवरांनी सक्रिय सहभाग घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणाऱ्या या सर्व समाजभान असलेल्या व्यक्तींनी एकत्र येऊन हा उपक्रम यशस्वी केला.

समाजातील प्रत्येक घटकाने अशा छत-भिंती नसलेल्या शाळांकडे लक्ष देणे आज काळाची गरज आहे. या मुलांसाठी स्वतंत्र शाळा उभी राहावी, त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे आणि त्यांची स्वप्ने साकार व्हावीत यासाठी समाजाने पुढे येणे अत्यावश्यक आहे.

हा अनुभव केवळ भोजनदानाचा नव्हता, तर मानवतेचा, शिक्षणाचा आणि सामाजिक परिवर्तनाचा उत्सव होता.- डॉ.चेतना सोनकांबळे 

No comments:

Post a Comment

Pages