पुस्तक परिक्षण: " काळोखाच्या गर्भात उजेडाची बीजं पेरणारी कविता : युद्धशाळा ! " - Middlepathnews

लाइव न्यूज़

पुस्तक परिक्षण: " काळोखाच्या गर्भात उजेडाची बीजं पेरणारी कविता : युद्धशाळा ! "

" काळोखाच्या गर्भात उजेडाची बीजं पेरणारी कविता : युद्धशाळा ! "
( कवी मनोहर नाईक यांचा कविता संग्रह ' युध्दशाळा ' चे समिक्षण अरुण विघ्ने यांनी केले आहे ते वाचकासाठी देत आहेत )
________________________________

           एकीकडे  ब्रिटिशांनी  भारतावर दिडशे वर्षे राज्य केले . आमच्याच देशात आम्हाला गुलामासारखं वागवलं जात होतं. त्याची चीड प्रत्येक भारतीयांच्या मनात जागली आणि सर्वसामान्य मानसापासून ते नेत्यांपर्यंत सर्वांनी स्वातंत्र्य लढा ऊभारून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले . तर
दुसरीकडे अनादी कालापासून आमच्याच देशात एका वर्णाकडून दुस-या वर्णाचा म्हणजेच एका मानव समूहाचा दुस-या मानवी समूहाकडून अतोनात छळ केल्या गेला . कितीतरी काळ तो अंधारात खितपत पडलेला होता . ज्ञानाचा प्रकाश त्याला  कायम नाकारल्या गेला . या विरोधात मात्र बोटावर मोजण्या इतके लोक सोडले तर कुणीही शोषित, वंचित , पिडीत समाजाच्या उत्थानासाठी पुढे सरसावले नाही . ही शोकांतीका म्हणावी लागेल .
            प्रकाशाच्या, उजेडाच्या सर्वच वाटा त्या समूहासाठी हेतूपुरस्सर कायमच्या बंद केल्या गेल्या होत्या . शरीराने बलवान, विचाराने बुद्धीमान, मनाने शीलवान माणसाला या अमानुष व्यवस्थेने बंदीस्त करून टाकले होते . विसाव्या शतकात डाँ. बाबासाहेब आंबेडकर नावाच्या महासूर्याने  रक्तविरहीत व शस्त्रविरहीत क्रांती केली आणि या बंदिवान समाजाला गुलामगीरीच्या पाश्यातून कायमचे मुक्त केले . तेव्हापासून आम्ही सूर्याच्या कुलातले गणल्या जाऊ लागलो .  14 आँक्टोबर 1956 ला विदर्भातल्या नागभूमीवर बुद्ध धम्म दीक्षेच्या निमित्ताने लाखोच्या जनसमुदायामध्ये क्रांती घडून आली आणि तेव्हापासून आम्ही वैश्विक उजेडाचे नेतृत्व करणा-या बौद्ध धम्माचे भाग झालो व नागपूरची दीक्षाभूमी ही आमच्यासाठी " युद्धशाळा " झाली .
         त्याच नागपूरचे सूर्यकुलातले एक कवी म्हणजे प्रा.डाँ. मनोहर नाईक . यांचा " युद्धशाळा " हा अलीकडेच प्रकाशीत झालेला विविध काव्यप्रकारातील एकूण 55 सशक्त कविता असलेला काव्यसंग्रह . संवेदना प्रकाशन नागपूरने प्रकाशीत केलेल्या ह्या काव्यसंग्रहाला प्रख्यात आंबेडकरी साहित्तिक डाँ. यशवंत मनोहर सरांची मुद्देसुद,  सविस्तर, चिंतनशील, नवनिर्मिक प्रस्तावना लाभली आहे . मुखपृष्ठ जयंत आष्टनकर, नागपूर यांनी अतीशय समर्पक रेखाटले आहे .
डाँ. यशवंत मनोहर सर आपल्या प्रस्तावनेत मनोहर नाईक यांच्या " युद्धशाळा " काव्यसंग्रहाचे वर्णन ' उजेडाने पिसारलेले कवितांचे झाड ' असे करतात . त्यांनी केलेले वर्णन अगदी तंतोतंत आहे . " कारण कवी हे मराठी प्रकाशपरंपरेचे सभासद आहे . कवी सूर्यवंशाचे आहेत . सूर्यवंश म्हणजे जीवनाला प्रकाशाची दौलत देणारा वंश . या वंशातील सूर्य स्वतः पेटत असतात आणि उजेड इतरांना वाटत असतात . वंश म्हणजे कूल, कूल म्हणजे घराणे . काही कवी या घराण्याशी नाते जोडतात आणि त्यांना दुनिया मग सूर्यकुलाचे कवी म्हणून गौरविते ".
कवी आपल्या "दीक्षाभूमी " या दीर्घ कवितेत तिच्या विविध पैलूंचे वर्णन करतांना म्हणतात ...!

" गगनाला भिडे
युद्धध्वज नीळा
नवी युद्धशाळा
दीक्षाभूमी ! "

         दीक्षाभूमी ही शोषितांच्या सर्वंकश उत्थानाची भूमी ठरली आहे . तिने समता,स्वातंत्र्य, बंधुता, प्रज्ञा, शील, करुणा, शांतीचा संदेश देऊन जगण्याची व लढण्याची प्रेरणा दिली . 'बुद्धं सरणं गच्छामीचा ' हा स्वर प्रथम तिथेच सर्वत्र घुमला .हिंदू धर्म त्याग, परिवर्तन , अढळ संकल्प, व्यापक प्रकल्प, देवतेचा नकार, नितिमत्ता , ज्ञानाची शिदोरी , ही नव ऊर्जा तेथूनच मिळाली आणि आजही मिळते आहे . म्हणूनच कवीच्या मते दीक्षाभूमी ही युद्धशाळा ठरते .
प्राप्त मूल्यांचे जतन करणे क्रमप्राप्त आहे . म्हणून कवी ' मोर्चेबांधनी '
या कवितेत व्यक्त होतात की, ....

" काजळी धरलेल्या दिव्यांची
काजळी झटकून येतो
विझलेल्या दिव्यांना
पुन्हा एकदा पेटवून येतो
आपल्याला गर्भातच प्रकाश पेरायचा आहे
थांब ! मी सूर्यच सोबतीला घेऊन येतो ."

         प्रज्ञासूर्यांनी हा प्रकाश आमच्या पुढ्यात ठेवला आहे . तो अविरत तेवत ठेवण्याचं महत्  कार्य आम्हाला करायचं आहे . झोपलेल्यांना जागं करायचं आहे . थडग्यांनाही जागवायचं आहे .हे युद्ध निरंतर सुरू ठेवण्यासाठी सतर्क असलो पाहीजे . गाफील राहून कदापीही चालणार नाही . अनअवधानाने दिव्यावर काजळी धरली असेलही पण ती झटकून, येणा-या काळाच्या गर्भात उजेड पेरत राहीलं पाहीजे तरच हा प्रकाश अंधार निरंतर चिरत राहील. कारण आम्ही उजेयात्री आहोत...!

  "सूर्यगर्भित पहाटेला नाकारणे शक्य नाही !
उगवत्या सूर्याला कैद करणे शक्य नाही. समुद्र आता शांत आहे अशा भ्रमात राहू नका .
समुद्राच्या भरतीला थोपवणे शक्य नाही !"

            पहाटेच्या गर्भातील उद्याच्या उजेड सूर्याला आता उगविण्यापासून कुणीच थांबवू शकणार नाही . येथील प्रत्येक शोषिताने आपल्या विकासाची दिशा निश्चित केली असून तो समुद्रासारखा संथ गतीने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करण्याचे स्वप्न बघतो आहे . तो थांबला आहे ह्या भ्रमात कुणीही न राहता त्याच्या उत्थान भरतीला कुणीही थोपवू शकणार नाही . हा  प्रचंड आशावाद कवी येथे व्यक्त करतांना दिसतात . आता कोणत्याही निर्णायक युद्धाला उजेडाच्या झाडांनी तत्पर असलं पाहीजे. आता त्या चाबूकाची पर्वा न करता समोर आलेल्या परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारीही केली पाहीजे . तेव्हाच आम्ही उजेडाचे खरे वारसदार आहोत हे सिद्ध होईल .

" आणि हेही लक्षात असू द्यावे की,
निर्णायक युद्धाचा निकाल
आमच्याच बाजूने लागेल
कारण चाबकाचे बळ सोसून
आमच्या पाठी
ढाली झाल्या आहेत ! "

       अशा कितीतरी लढाया आमच्या आज्या , बापानी, लढल्या आहेत . आम्ही कर्ण असलो तरी " पत्थर का जवाब ईट से देना हमे आता है ! " अनेक लढाया अंगवळी पडल्याने पुरते कणखर झालो आहोत . कुठल्याही गिधाड धमकीचा प्रतिकार करण्यास सज्ज असल्याची खात्री देण्याचा मनसूबा कवितेने केलेला दिसतोय. तेव्हा अशुद्ध व्यवस्थेने अशा कोणत्याही भ्रमात राहण्याची चूक करू नये . असा सज्जड दमच कवी बुरसटलेल्या व्यवस्थेला देतांना दिसतात .
अनादी काळापासून एका विशिष्ट समूहाच्या माणसांवर मानवनिर्मित काळोखाचे राज्य होते . पण जेव्हापासून गावकुसाबाहेरच्या झोपड्यात प्रकाशगर्भ वाढू लागला तेव्हापासून काळोखाचे दिवस आता इतिहासजमा व्हायला लागले आहेत.

" प्रकाशाचे पाईक आम्ही
आम्ही प्रकाशपूजक आहोत
काळोखाच्या पोशिंद्यांनो
आम्ही सूर्यवंशज आहोत ! "

          अनादी काळाच्या काळोखाशी असलेले नाते आता संपुष्टात आले आहे . कारण प्रकाशाचे पुजक , प्रकाशयात्री म्हणून आम्हाला सूर्याच्या दिशेने वाटचाल करायची आहे .पुन्हा काळोखात जाण्याची इच्छा नाही कारण आम्ही सूर्यवंशज आहोत . सिद्धार्थ गौतम बुद्धाने जनकल्याणासाठी आपल्या भौतीक सुखाचा त्याग करून आपलं उर्वरीत आयुष्य मानवी दुःखाचा शोध घेऊन त्याचं समूळ उच्चाटन करण्यासाठी  उपाय शोधून दुःखमुक्तीचा मार्ग दिला आहे .

" वैराला जिंकण्या
सर्वस्व त्यागले
दुःखही भोगले
अमर्याद !

अतिरिक्त तृष्णा
दुःखाचे कारण
जीवन तारण
लोभाघरी ! "

        मानव जीवनात दुःख आहे . त्याचे मुळ कारण तृष्णा आहे .तृष्णेवर विजय मिळवायचा असेल तर मनावर ताबा मिळवावा लागेल . तरच मानव दुःखमुक्त जीवनाचा आनंद घेऊ शकतो . हा वैज्ञानीक संदेश बुद्धाने अखिल मानवाच्या कल्यानार्थ दिला . तोच संदेश बौद्ध धम्मचक्र प्रवर्तनाच्या माध्यमातून युगप्रवर्तकांनी उपेक्षीतांना दिला . हा उजेळाचा संदेशच वंचितांना माणूस म्हणून घडविण्यासाठी तारक ठरलेला दिसून येतोय .
बाबासाहेबांच्यापूर्वी राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतीराव फुले, क्रांतीज्योती  सावित्रीमाई फुले यांनी अस्पृश्यता, भेदाभेद , बालविवाह , सतीप्रथा, अशा कुप्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न करून स्त्रीशिक्षण , विधवाविवाह सुरू करून स्त्रीला अज्ञानाच्या गर्तेतून काढण्यासाठी प्रवाहाच्या विरूद्ध जावून कार्य केले . " सावित्रीबाई फुले " या कवितेत कवी म्हणतात ...!

"भाळावरती काळाच्या
तूच अक्षरांचे लेणे
बंदिस्त हुंदक्यांसाठी
झाली स्त्रीमुक्तीचे गाणे ! "

         स्त्रीच्या भाळावर अनंत काळापासून अज्ञानाचा काळा डाग कोरल्या गेला होता .
हा डाग फुले दाम्पत्यांनी पुसून तिच्या जीवनात अक्षरांचे लेणे कोरले .आणि तीला दास्यत्वातून मुक्त करण्याकरीता राज्यघटनेत बाबासाहेबांनी तरतूद केल्याने तीने विकासाच्या गगनात उंच भरारी घेतलेली आपल्याला दिसते . एकेकाळी चुल आणि मूल यातच गुंतून पडलेल्या स्त्रीने विकासाची सर्वच क्षेत्रे आज आपल्या कर्तृत्वाने काबीज केल्याचे दिसते . हा तिच्यासाठी सुटकेचा निःस्वास आहे .
सावित्रीमाई फुले यांनी आपल्या पतीच्या पावलावर पाऊल ठेऊन त्यांचे कार्य पुढे नेण्यास प्रयत्नांची पराकाष्टा केली . तसेच बोधीवृक्षाची सावली माता रमाई ह्यांनी सुद्धा समाजाच्या उत्कर्षासाठी स्वसुखाचा त्याग करून बाबासाहेबांना साथ दिली . अत्यंत प्रतिकुल परिस्थितीतही बाबासाहेबांच्या मागे खंबीरपणे उभे राहून दिल्या गेलेली साथ वाखाणण्याजोगी आहे . कवीने बाबासाहेबांच्या मुखी आपले शब्द ठेऊन त्यांच्या मनातील सल "रमाई"
या कवितेतून व्यक्त केली आहे .

" माझ्या ज्ञानपर्वासाठी
किती जाळलीस काया
धगधगत्या जीवनी
झाली बोधिवृक्ष छाया ! "

         भिकूजी धोत्रे वलंगकर यांच्या कन्या म्हणजे बाबासाहेबांच्या अर्धांगीनी रमा, रामू, रमाई या अनेक विशेषणाने परिचित असलेल्या वंचीतांच्या आई, रमाई बोधी़वृक्षाची सावली झाल्यात .  बाबासाहेबांना शोषितांना काळोखमुक्त करायचे आहे . त्यासाठी त्यांना खुप शिकता यावे ही खुणगाठ मनाशी बांधून रमाईने आपल्या कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारी निस्वार्थपणे, स्वाभीमानाने, परखडपणे, काटकसरीने, धिराने सांभाळली . आपल्या कुटुंबियांसह शोषितांच्या सुख दुःखात सामील होऊन स्वतःला या सद्कार्यात वाहून घेणार्या थोर माऊलीविषयी कितीही लिहीलं तरी कमीच पडेल. म्हणूनच की काय ,कवी त्यांना बोधीवृक्षाची सावली म्हणून संबोधतात.

" मी श्वास घेतला आणि
दुःखांनी स्वागत केले
फाटक्या छताला माझ्या
हे दुःखच झुंबर झाले !

पुढे चालता चालता
हे दुःखच मैतर झाले
मन खचलेल्या क्षणी
तेच मदतीला आले !"

           दारिद्र्य हे प्रत्येक शोषितांच्या जन्मापासून पाचवीलाच पुजलेलं होतं . त्यातच दुःख, अज्ञान, यांनीही पुरते थैमान घातले होते . भाकरीचा चंद्र कधीकधीच दृष्टीस पडायचा . यातून कवीचीही सुटका नव्हती . पण याही परिस्थितीत कवीसारखे अनेक तरूण अंधःकाराच्या  गर्तेत सापडले होते . कवी केवळ स्वतःविषयीच व्यक्त होत नाही तर वंचित समाजातील आजूबाजूच्या परिस्थितीचं अवलोकन करून प्रातिनिधीक स्वरूपात दुःख, व्यथा, वेदना ,शल्य उत्कटतेने मांडतांना दिसतात . याही परिस्थितीत न थांबता दुःख पिऊन पेटून उठणा-याच्या वाटेत एक दिवस उत्कर्षाचा सूर्य आला आणि निळ्या आकाशात एकेकाळचे मुके पक्षी गगनभरारी घेऊ लागले .पण कधिकधी
आयुष्यातील आठवणीचा मनात पाऊस दाटून येतोच . मग हा पाऊस कवीला स्वस्थ बसू देईल तो पाऊस कसला ?

" आला पाऊस पाऊस
सारे रान मोहरले
बाप माझा आनंदला
सारे शेत नांगरले !

बीज धरतीच्या पोटी
माय हळूहळू सोडे
झोळी बांधली झाडाला
त्यात चिमुकले रडे ! "

         कवींनी वेवेगळ्या पाच कवितातून पावसाची नोंद घेतलेली दिसते . प्रत्येकाच्याच आयुष्यात पाऊस येत असतो . मग तो अग्नीचा असेल, प्रेमाचा असेल, दुष्काळाचा असेल, पाऊस हा नवनिर्मितीचं ,परिवर्तनाचं, क्रांतीचं धोतक आहे . परिवर्तन आमच्या आयुष्याचा केंद्रबिंदू आहे . मातीत पेरलेलं बीज नष्ट होऊन त्यातून नवा अंकूर जन्माला येतो . नवनिर्मितीसाठी त्याग अपरीहार्य आहे .

" काळोख्या भूमीत
पेरीन प्रकाश
करूनिया नाश
काळोखाचा ! "

          शेती, माती आणि शेतकरी हे नैसर्गीक परिवर्तनाचे जीवंत उदाहरणं आहे. शून्यातून विश्व निर्माण करणारी ही प्रक्रिया आहे . माय बापाच्या अपार कष्टातून मुलांना भाकर मिळते .श्रावणसरीपासून अतुलनीय आनंद मिळतो तर कुठे मोगरा फुलतो .
या काव्यसंग्रहात अनेक दर्जेदार रचना आहेत . विविध छंदबद्ध प्रकारातील रचना प्रसंगी जनभावनेला सम्यक लढ्यासाठी, निर्णायक युद्धासाठी सचेत करणा-या वाटतात . " तेव्हा रान पेट घेते " , " प्रकाशपर्व " , " मानवधम्म " , " कबीर " " भीमराव माझा " , " मानवतेचा पुतळा " , " माय " , सूर्यग्रहण " , " शब्दज्वाळा " , " नामांतरयुद्ध " , "गाव " , " वाडा चिरेबंदी " , " जागृतीचा अग्नी ", " सत्यनिष्ठा ", " मी गतीचे चक्र झालो " इत्यादी काव्यरचना काव्यसंग्रहाला यशाच्या अत्युच्च शिखरावर घेऊन जाणा-या वाटतात .

         कवी मनोहर नाईक यांचा हा काव्यसंग्रह मला "उजेडाच्या कवितांचं झाड वाटतो " . विषयातला  तोच तोपणा टाळून नवनिर्मितिकडे घेऊन जाणारी ,अत्यंत चिंतनशीलतेतून आलेली ही कविता नवे विषय, आशय मांडणारी  आहे . अभंग , अष्टाक्षरी, षडाक्षरी, मुक्तछंद हे विविध काव्यप्रकार कविने खुबीने हाताळलेले दिसतात . विविध नव प्रतिमांचा वापर करून  ,तंतोतंत व मोजक्या शब्दांचा वापर करीत आपल्या प्रतिभेने हळुवार फुलविलेली ही कविता आहे . त्यांच्या कवितेतला माणूस हा विश्व नायक आहे . त्याला कुठेही मर्यादा आलेल्या दिसत नाहीत . कारण बौद्ध धम्म हा विश्वाचं नेतृत्व करतो .  नाईक यांची ही कविता समाज प्रबोधनात्मक दृष्टीने नव पिढीसाठी दिशादर्शक व अत्यंत उपयुक्त ठरणारी आहे .
प्रज्ञावंत वाचकवर्ग या सम्यक कवितेचा सहर्ष स्विकार करतील यात तिळमात्र शंका नाही. या नवप्रकल्पाबाबत कवीचे हार्दिक अभिनंदन करून पुढील साहित्तिक वाटचालीसाठी त्यांना मंगलकामना देतो .!

- अरूण विघ्ने
मु.पो. आर्वी जि . वर्धा
मो.९८५०३२०३१६
-----------------------------------------------
पुस्तकाचे नाव : ' युद्धशाळा ' काव्यसंग्रह
लेखकाचे नाव :  प्रा.डाँ. मनोहर नाईक
प्रकाशन संस्था : संवेदना प्रकाशन,नागपूर
पृष्ठसंख्या        :  ९६
मूल्य               :  १००/- रुपये

2 comments:

  1. अरुण विघ्ने सर
    जबरदस्त समिक्षण !

    ReplyDelete
  2. Pragmatic Play™ Roulette is a superior roulette half in} experience on desktop or cell gadgets. The Punt Casino is a dream come true for crypto lovers as net site} is solely accepting digital cash. Truth be advised, we 카지노 사이트 were expecting some more cryptocurrencies out there here. Right now, can even make|you might make} deposits and withdrawals with only the main cryptocurrencies similar to Bitcoin, Bitcoin Cash, Ethereum, Litecoin, and some others.

    ReplyDelete

Pages