२५ हजार रुपये नुकसानभरपाई द्या : खा. हेमंत पाटील - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 18 November 2019

२५ हजार रुपये नुकसानभरपाई द्या : खा. हेमंत पाटील



महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये नुकसानभरपाई द्या :  खा. हेमंत पाटील


हिंगोली(प्रतिनिधी):
गेल्या महिन्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने महाराष्ट्रातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई द्या, अशी आग्रही मागणी हिंगोलीचे खा. हेमंतभाऊ पाटील यांनी संसदेत केली.
     सोमवार (ता.१८ )पासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी खा. हेमंत पाटील हे लोकसभेत बोलताना पुढे म्हणाले की, मागील महिन्यातील अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे महाराष्ट्रातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीचा फटका महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यातील ३२५ तालुक्यांना बसला आहे . यामध्ये ५४.२२ लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचे १० हजार कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे.
      या अवकाळी पावसाचा फटका महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, कोकणासह संपूर्ण मध्य भागाला बसला आहे. शेतातील काढणीला आलेल्या सोयाबीन, तूर, जवारी, बाजरी, मका यासह ऊस, केळी, हळद, द्राक्ष, संत्रा या सारख्या नगदी पिकांचे मोठे नुकसान झाले.
    या आसमानी संकटाने पुरते नागविलेल्या शेतकऱ्यापुढे पुढील काळातील उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. या वैफल्यग्रस्त शेतकऱ्यांनी आत्मघाताचे टोकाचे पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. गेल्या पंधरा दिवसात हिंगोली लोकसभा क्षेत्रातील सहा शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.
        या भागातील हजारो शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा काढला आहे. परंतु मोठ्या प्रमाणातील झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यास आता विमा कंपनी टाळाटाळ करीत आहे. या विमा कंपनीने राज्यातून हजारो कोटी रूपये जमा केले आहेत पण आता  शेतकऱ्यांच्या अर्जात त्रुटी काढून वेळकाढूपणा करीत आहेत. विमा कंपनीचे प्रतिनिधी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करीत नाहीत.
      ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरला नाही, त्यांना एनडीआरएफ कडून तात्काळ मदत मिळवून द्यावी. महाराष्ट्रात राज्यपालांनी केवळ ८ हजार रुपये हेक्टरी मदत जाहीर केली आहे. ती अतिशय तुटपुंजी असून हेक्टरी २५ हजार रुपये नुकसानभरपाई जाहीर करण्यात यावी,अशी आग्रही मागणी हिंगोलीचे खा. हेमंत पाटील यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेत बोलताना केली.

No comments:

Post a Comment

Pages