भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 22 November 2019

भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलन

यवतमाळ येथे तीन दिवसीय १४ वे अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलन..


यवतमाळ ( प्रतिनिधी ): आंबेडकरी साहित्य व कला अकादमीच्या वतीने आयोजित व महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ पुरस्कृत १४ वे अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलन दिनांक २३, २४ , २५ नोव्हेंबर २o१९ रोजी यवतमाळ येथे  होत आहे. सुप्रसिद्ध कवी, समीक्षक, इतिहास संशोधक प्रा. डॉ. महेंद्र भवरे यांचे अध्यक्षतेखाली हे संमेलन संपन्न होत असून संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध पटकथाकार, नाट्यलेखिका आणि महामानवाची गौरवगाथा या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित स्टार प्रवाह वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या मालिकेच्या पटकथाकार शिल्पा कांबळे यांचे हस्ते होणार आहे.

          जम्मू काश्मीर लडाख येथील गायक व सिनेस्टार मा.फुन्सोक लडाखी, हैदराबाद येथील प्रा.डॉ.डब्ल्यू.मायादेवी, बिलासपूरचे डब्ल्यू.कपूर उत्तर प्रदेश कानपूर येथील मा. देवकुमार, छत्रपती संभाजी महाराजांचे अंत्यसंस्कार करणारे गोविंद गोपाळ यांचे तेरावे वंशज, उद्योजक मा.राजेंद्र गायकवाड, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सदस्य सुप्रिया अय्यर, पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला येथील कृषी शास्त्रज्ञ डॉ. विजय माने, यवतमाळ नगर परिषदेच्या अध्यक्ष कांचनताई चौधरी, धम्मभूमी मासिकाचे संपादक विजय डांगे, गोदावरी अर्बन मल्टी क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी नांदेडचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे. ग्रंथप्रकाशन,पुरस्कार वितरण, सांस्कृतिक प्रबोधन, कवयित्रींचा काव्य जागर, आंबेडकरी साहित्य चळवळ :अभिव्यक्ती स्वातंत्र्य व साहित्यिकांची भूमिका, या विषयावरील परिसंवाद, सुप्रसिद्ध कवी लोकनाथ यशवंत यांची प्रकट मुलाखत, गजानन कांबळे आणि संच यांचा आंबेडकरी सुगम संगीताचा कार्यक्रम, दिनांक ११ सप्टेंबर १९३५ रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ११व्या अस्पृश्य विद्यार्थी संमेलनांमध्ये केलेल्या अध्यक्षीय भाषणातील “आजच्या जीवनकलहाच्या दंगलीत पुढारलेल्या लोकांपेक्षा आम्ही नीरस ठरल्यास आमची धडगत होणार नाही,” या विधानावरील परिचर्चेत प्रा.डॉ.लीलाताई भेले यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक-सांस्कृतिक प्रशासकीय आणि क्रीडा व पत्रकारितेच्या क्षेत्रातील मान्यवर मंडळींचा सहभाग, बल्लारपूर येथील सुप्रसिद्ध कवी व कलावंत पवन भगत यांचे क्रांती नृत्य, वंदना सदांशिव,ज्योती खोंडे यांचे समूहनृत्य,मराठी बोलीभाषा आंबेडकरी काव्यजागर हा बोली भाषेतील कविसंमेलनाचा कार्यक्रम, सुप्रसिद्ध कवयित्री उषाकिरण आत्राम यांचे अध्यक्षतेखाली बबन इंगोले, जनार्दन मोहिते ,डॉ.राजन जयस्वाल ,पंजाब चव्हाण याडीकार, रोशन कुमार पिल्लेवान ,आनंद गायकवाड मतीन भोसले ,विजय ढाले हे कवी फार्शी, बेलदारी, झाडीबोली, गोरबोली, वऱ्हाडी पारधी, या बोलीभाषेत आपल्या कविता सादर करतील.

          स्त्रीवादी साहित्य आणि आंबेडकरी चळवळीतील स्त्री: वास्तववादी तुलना, या प्रा.डॉ. प्रतिभा अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित परिसंवादांमध्ये सिनेस्टार व चरित्र लेखिका वंदना जीवने, प्रा. डॉ.आशा खडसे, समीना शेख, प्रा.पुष्पा घोडके, प्रा.अनिता कांबळे यांचा सहभाग राहील. मैत्रिका महिला मंडळाचे समूह नृत्य,उर्दू साहित्य अकादमीचे सदस्य मन्सुर एजाज जोश यांचे अध्यक्षतेखाली होणारे कवी संमेलन, प्रसिद्धमराठी गझल गायक गौतम पाढेण आणि संच यांचा एल्गार निळ्या नभाचा हा बहारदार कार्यक्रम, तसेच शिक्षणक्षेत्रात प्रदूषित साहित्याची घुसखोरी आणि पुरोगामी साहित्यिकांचे दायित्व, या विषयावरील प्रा. डॉ. कल्याण साखरकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या परिसंवादामध्ये तेलंगणाचे इंद्रवेल्ली भारत, प्रा.प्रवीण कांबळे,प्रा. सुदाम राठोड,प्रा .डॉ. भास्कर पाटील, प्रा.मनोज मुनेश्वर,कपिल दगडे हे हे सहभागी होतील.

        प्रियंका तेलंग आणि रचना मून यांचा सांस्कृतिक कार्यक्रम, आंबेडकरी गझल या बहारदार कार्यक्रमात सुप्रसिद्ध कवी, नाटककार, कलावंत, अशोक बुरबुरे यांचे अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत गझलकार सहभाग नोंदवतील. आंबेडकरी विचार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित करण्याचे दृष्टीने संमेलनांमध्ये नव्या पिढीचे कवी, लेखक यांना विचारमंच उपलब्ध करून देण्याचा या संमेलनाचा मानस आहे. या संमेलनामध्ये आंबेडकरी चळवळीला गतिमान करण्याच्या दृष्टीने महिला वर्गाचा लक्षणीय सहभाग आहे. विविध विषयावरील परिसंवाद, प्रबोधनात्मक कार्यक्रम, मराठी बोलीभाषेतील कविसंमेलन ही या संमेलनाची काही वैशिष्ट्ये सांगता येतील. या सांस्कृतिक व प्रबोधनात्मक वैचारिक सोहळ्यास उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने आनंद गायकवाड, प्रा. विलास भवरे, कवडू नगराळे, नवनीत महाजन, निरज वाघमारे, निलेश सोनटक्के, प्रा. श्रद्धा धवने आदींनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages