न्यायमुर्ती जहांगीर पठाण यांचे आवाहन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 21 November 2019

न्यायमुर्ती जहांगीर पठाण यांचे आवाहन


समाजातील सर्व घटकांपर्यंत कायद्याची संकल्पना पोंहचावी - न्यायमुर्ती जहांगीर पठाण.

किनवट ( प्रतिनिधी ) :
आपण कायद्याच्या अधीन जगतो. प्रत्येक गोष्टीला कायदा, नियम असतो. याची माहिती सर्वसामान्यांना व्हायला हवी. समान न्याय व सर्व घटकांपर्यंत न्याय पोहचावा. अन्याय झालेल्या गोरन्गरिबांपर्यंत मोफत कायदेशीर सल्ला उपलब्ध करून द्यायची तरतूद राज्यघटनेत केली आहे. ही माहिती सर्वांना व्हावी म्हणूनच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. असे प्रतिपादन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश ( क. स्तर ) जहांगीर र. पठाण यांनी केले.
            महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण अधिनस्त तालुका विधी सेवा समिती, ता. किनवटच्या वतीने " न्याय आपल्या दारी पंधरवाड्यानिमित्त " गुरुवार  दि. २१ रोजी सकाळी १० वाजता महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गोकुंदा येथे आयोजित वक्तृत्व स्पर्धचे उद्घाटन करतांना ते बोलत होते.
             याप्रसंगी सहदिवाणी न्यायाधीश जे.एन. जाधव , अधिवक्तासंघाचे उपाध्यक्ष अॅड. मिलिंद सर्पे, लोकअदालत विधीमंडळ सदस्य माजी प्राचार्य वि. मा. शिंदे व के. मूर्ती, मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अभियंता प्रशांत ठमके हे अतिथी मंचावर उपस्थित होते.
             प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते ज्ञानदीप प्रज्वलन झाल्यानंतर पर्यवेक्षक शेख हैदर यांच्या संविधान उद्देशिकेच्या सामुहिक वाचनानंतर कार्यक्रमास प्रारंभ झाला. उत्तम कानिंदे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.
                पुढे बोलतांना न्यायाधीश पठाण म्हणाले, ज्ञान आणि विद्या किती महत्वाची आहे. हे क्रांतीसूर्य जोतिराव फुले यांच्या ' विद्ये विना मती गेली... मती विना निती गेली.... " या सुविचारातून दिसून येते. भारतीय संविधानाचे पालन करतांना न्याय प्रक्रियेत, सर्वांसाठी समता आणि निष्पक्षपातीपणाची हमी घेत योग्य व्यावहारीक आणि सकारात्मक पावले उचलणे या मुख्य उहिष्टासाठी स्थापित विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने " सर्वांसाठी न्याय " याकरिता विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
                यावेळी सह दिवाणी न्यायाधीश जे.एन. जाधव यांनी आपल्या मनोगतातून मोफत कायदेविषयक सल्ला व विधी साक्षरतेसाठी असे उपक्रम राबविणे गरजेचे असल्याचे सांगितले.
                वक्तृत्व स्पर्धेत इंदिरा गांधी विद्यालय गोकुंदा येथील दीक्षा शेषेराव राठोड हिने प्रथम व रोहिणी सुरेश तुम्मलवाड हिने उत्तेजनार्थ, सरस्वती विद्यामंदीर कनिष्ठ महाविद्यालय, किनवटच्या वैष्णवी लक्ष्मण गुट्टे हिने द्वितीय, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, गोकुंद्याच्या निकिता राजेंद्र सर्पे हिने तृतीय आणि आदिवासी मुलींचे शैक्षणिक संकुल, पिंपळगाव फाटा येथील निलिमा कैलाश मेश्राम हिने उत्तेजनार्थ पारितोषीक पटकाविले.
                 प्रा.डॉ. सुनिल व्यवहारे, प्रा.डॉ. पंजाब शेरे व प्रा.डॉ. वसंत राठोड यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. समारोपीय कार्यक्रमात पोलिस निरीक्षक मारोती थोरात, प्राचार्य राजाराम वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व यशवंतांना पुष्पगुच्छ देऊन गौरविले.
                   कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य सुभाष राऊत, उपमुख्याध्यापक जे.एस. पठाण, प्रा. रघुनाथ इंगळे, प्रा. संजय ढाले, पर्यवेक्षक प्रा. संतोष बैसठाकूर, महेंद्र नरवाडे, किशोर डांगे व प्रमोद मुनेश्वर आदिंनी परिश्रम घेतले. संपादक साजीद बडगुजर यांचे सह विविध शाळेचे शिक्षक व विद्यार्थी बहुसंख्येनं उपस्थित होते.

1 comment:

Pages