दत्ता वानखेडे या शेतक-यावर अस्वलाचा प्राणघातक हल्ला
किनवट : शेतात रात्रभर पिकाला पाणी देऊन पहाटेपहाटे घराकडे येत असतांना अचानकच पाठीमागून येऊन अस्वलाने दत्ता वानखेडे या शेतक-यावर प्राणघातक हल्ला केला. सदरील घटना आज(दि. १४ ) सिंदगी (मोहपूर,ता.किनवट) या गावाजवळ घडली.
जखमी दत्ता वानखेडे यांच्यावर गोकुंदा येथिल उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी आदिलाबादच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
किनवट वनविभागाच्या कार्यकक्षेत येणा-या सिंदगी (मोहपूर) येथिल शेतकरी दत्ता प्रभु वानखेडे (वय ३०) हे रात्री शेतात रब्बीच्या पीकाला पाणी देण्यासाठी गेले होते. रात्रभर पाणी देऊन पहाटेपहाटे शेतातून घराकडे येत असतांना गावाजवळ आल्यावर अचानकच सकाळी सहा वाजताचे दरम्यान अस्वलाने पाठीमागच्या बाजूने हल्ला केला. पाठीवर, हातावर पंजाने वार करुन कानही चिरला आहे. त्यात तो रक्तबंभाळ झाला आहे. वानखेडेने आरडाओरड केल्याने अस्वलाने पळ काढला.
मादीजातीचे अस्वल असल्याने त्याच्या सोबत पिल्ले होती,त्यामुळेच अस्वलाने हा हल्ला केल्याचे बोलल्या जाते.
गोकुंदा येथिल उपजिल्हा रूग्णालयात दाखल करुन तेथे वानखेडे वर प्राथमिक उपचार करण्यात आला. त्याला उपचारासाठी वनविभागाकडून तात्काळ पाच हजार रुपयांची मदत देण्यात आली.
No comments:
Post a Comment