कोराना विषाणुशी लढण्यासाठी फक्त लाॅकडाऊन हा एकमेव उपाय नाही ;जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 23 March 2020

कोराना विषाणुशी लढण्यासाठी फक्त लाॅकडाऊन हा एकमेव उपाय नाही ;जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

कोराना विषाणुशी लढण्यासाठी फक्त लाॅकडाऊन हा एकमेव उपाय नाही ;जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा





लंडनः कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतासह जगभरात भलेही लॉकडाऊन म्हणजेच संपूर्ण देश पूर्णतः बंद करण्याचा मार्ग अवलंबला जात आहे, मात्र जागतिक आरोग्य संघटनेच्या मते ( डब्ल्यूएचओ) कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी केवळ एवढीच उपाययोजना पुरेशी नाही. कोरोना विषाणुने पुन्हा हातपाय पसरू नये म्हणून सार्वजनिक आरोग्याच्या भक्कम उपायायोजनाही अत्यावश्यक आहेत. ज्या देशांतील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अत्यंत वाईट स्थितीत आहे आणि कोरोनाशी लढण्याची तयारीही झालेली नाही, अशा देशांसाठी डब्ल्यूएचओने हा इशारा डोळ्यात अंजन घालणारा आहे. त्यामुळे कोरोना विषाणुचा संसर्ग हे भारतासमोरील मोठे आव्हान ठरणार आहे.

 जे आजारी आहेत, ज्यांना कोरोना विषाणुची लागण झाली त्यांचा शोध घेणे, आणि त्यांना आयसोलेट करणे, त्यांचा संपर्क शोधणे आणि तो तोडून टाकणे अत्यंत महत्वाचे आहे. आपण जर सार्वजनिक आरोग्याच्या ठोस उपाययोजना केल्या नाहीत तर लॉकडाऊनही धोक्याचे आहे. जेव्हा लॉकडाऊन उठवले जाईल आणि लोकांच्या हालचालींवरील निर्बंध मागे घेतले जातील तेव्हा कोरोना विषाणु नव्याने उभारी घेण्याचा मोठा धोका आहे, असे डब्ल्यूएचओचे आपत्कालीन व्यवस्थापनाचे वरिष्ठ विशेषज्ञ माइक रयान यांनी रविवारी बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले.

हेही वाचाः मुंबईत आणखी एका कोरोनाग्रस्त रूग्णाचा मृत्यू, महाराष्ट्रात १५ नव्या रूग्णांची भर

आपण ज्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, त्यात ज्यांना कोरोना विषाणुची बाधा झाली आहे, त्यांचा शोध घेणे आणि त्यांना आयसोलेट करणे. त्यांचा पत्ता शोधणे आणि त्यांना इतर लोकांपासून वेगळे करणे महत्वाचे आहे, असे ते म्हणाले. एकदा कोरोना विषाणुचा संसर्ग नियंत्रणात आणल्यानंतर आम्हाला कोरोना विषाणुचा पिच्छा पुरवावा लागेल आणि त्याविरुद्ध लढाई लढावी लागेल, असेही ते म्हणाले. चीन, सिंगापूर आणि दक्षणि कोरियाच्या धर्तीवर युरोपने सक्तीने निर्बंध घातले आणि संशयितांचा शोध सुरू केला आहे.

हेही वाचाः धन्यवाद आरोग्य यंत्रणा !

भारताची कितपत तयारी?- भारतामध्ये कोरोनाग्रस्तांच्या नमुन्याच्या चाचणीचीही पुरेशी व्यवस्था नाही. किती तपासणी किट उपलब्ध आहेत, याचीही माहिती मिळत नाही. भारतामध्ये आजवर खूपच कमी प्रमाणात नमुना चाचण्या होत आहेत, अशा बातम्या येत आहेत. दररोज सुमारे ५०० नमुना तपासणी होत असल्याच्या बातम्या आठवडाभरापूर्वी येत होत्या. ३० जानेवारी रोजी भारतात पहिला कोरोनाग्रस्त आढळून आल्यानंतरही आजवर भारत दररोज किमान ३००० नमुना तपासणीची क्षमता उभारू शकलेला नाही. त्यावरून भारताकडे टेस्ट किट किती कमी आहेत, याचा अंदाज येतो.

हेही वाचाः महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरू, घराबाहेर पडणाऱ्यांच्या धरपकडीसाठी पोलिसांची विशेष पथके

कोरोना हा प्रचंड वेगाने पसरणारा विषाणु आहे, मात्र भारतात बेडची व्यवस्थाही पुरेशी नाही. उदाहरणच घ्यायचे तर उत्तर प्रदेशची लोकसंख्या २० कोटी आहे आणि सध्या तेथे दोन हजारापेक्षाही कमी बेड उपलब्ध आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने २० मार्च रोजी दिलेल्या वृत्तानुसार बिहारची लोकसंख्या ११ कोटी आहे आणि तेथे केवळ ३५६ बेडच तयार आहेत. बिहारमध्ये २७४ आयसीयू वॉर्ड आहेत. या दृष्टिने व्हेटिंलेटरचाही प्रचंड तुटवडा आहे. या माहितीनुसार जर कोरोना विषाणुमुळे लोक संकटात सापडले तर किती लोकांना उपचार मिळणे शक्य होईल? ही स्थिती केवळ उत्तर प्रदेश किंवा बिहारची नाही, तर देशातील जवळपास सर्वच राज्यांची आहे.

हेही वाचाः लॉकडाऊन महाराष्ट्रः आजपासून मीटर रिडिंग बंद, विद्युत पुरवठा खंडित करण्यासही मनाई

या स्थितीची तुलना युरोपातील अत्यंत विकसित आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्था उत्कृष्ट असलेल्या देशांशी केली तर परिस्थिती अत्यंत भयावह आहे. ज्यांची व्यवस्था भक्कम आहे, तेही व्हेंटिलेटरच्या मोठमोठ्या ऑर्डर देऊ लागले आहेत. इंग्लंडने सुमारे २० हजार, जर्मनीने १० हजार, इटलीने ५००० हजार व्हेंटिलेटरच्या ऑर्डर दिल्या आहेत. भारताने व्हेंटिलेटर खरेदीसाठी ऑर्डर दिली की नाही, याबाबत कोणतेही वृत्त नाही. राज्यांतील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था भक्कम करण्यासाठी भारताने कोणती पावले उचलली, याचाही तपशील अद्याप बाहेर आलेला नाही.

विशेष म्हणजे सध्या युरोप कोरोना विषाणुचे केंद्र आहे. त्यामुळे इटली सर्वाधिक प्रभावित झाला आहे. सर्वाधिक ४८०० मृत्यू इटलीत झाले आहेत आणि ५३ हजारहून अधिक लोक पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. स्पेनमध्ये २८ हजाराहून अधिक पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत, तर १७०० जणांचा मृत्यू झाला आहे. भारतामध्ये सध्या कोरोना विषाणु फैलावण्याच्या टप्प्यात आहे. आजवर कोरोनाने ७ भारतीयांचा मृत्यू झाला आहे.

No comments:

Post a Comment

Pages