महाराष्ट्रातील ८१ टक्के कोरोना बाधित रुग्णांत संसर्गाची कोणतीही लक्षणेच दिसेनात! - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 21 April 2020

महाराष्ट्रातील ८१ टक्के कोरोना बाधित रुग्णांत संसर्गाची कोणतीही लक्षणेच दिसेनात!

महाराष्ट्रातील ८१ टक्के कोरोना बाधित रुग्णांत संसर्गाची कोणतीही लक्षणेच दिसेनात!


मुंबईः कोरोना विषाणूच्या संसर्गात महाराष्ट्रात युद्ध पातळीवर उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असतानाच आजपर्यंत आढळून आलेल्या तब्बल ८१ टक्के रुग्णांमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. केवळ १७ टक्के रूग्णांमध्येच कोरोना विषाणूच्या संसर्गाची लक्षणे आढळून आली आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत ही चिंता वाढवणारी बाब मानली जात आहे.

महाराष्ट्रात सोमवारी रात्रीपर्यंत कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ४,६६६ वर पोहोचली आहे. कोरोना संसर्गाच्या मूळाशी जाण्यासाठी आजवर आढळून आलेल्या राज्यातील २,३३६ रुग्णांचे विश्लेषण करण्यात आले आहे. त्यापैकी १,८९० रुग्णांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. म्हणजेच राज्यात आढळून आलेले तब्बल ८१ टक्के रुग्ण हे कोरोनाची लक्षणेविरहित आहेत. विश्लेषण केलेल्या रुग्णांपैकी केवळ ३९३ रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. हे प्रमाण विश्लेषण केलेल्या एकूण रुग्ण संख्येच्या १७ टक्के आहे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच ही माहिती दिली.

दुसरीकडे देशभरात कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून न आलेल्या रुग्णांचे प्रमाण ८० टक्के एवढे आहे. देशामध्ये कोरोनाचे ८० टक्के रुग्ण असे आहेत की त्यांच्यात कोरोना विषाणूच्या संसर्गाची कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाही, असे इंडियन काऊन्सिल फॉर मेडिकल रिसर्चचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रमण गंगाखेडकर यांनी म्हटले आहे. देशातील ८० टक्के रूग्ण लक्षणेविरहित आहेत. त्यांना शोधून काढणे हे आमच्या समोरचे मोठे आव्हान आहे. कोरोनाबाधित रूग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधणे म्हणजेच कॉन्टॅक्ट ट्रेसिंगशिवाय आमच्यापुढे अन्य कोणताही मार्ग नाही, असे डॉ. गंगाखेडकर यांनी एनडीटीव्ही दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

देशातील सर्व लोकांची एकाच वेळी चाचणी करणे अशक्य आहे. त्यामुळे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगशिवाय अन्य कोणताही मार्ग नाही, असेही डॉ. गंगाखेडकर सांगतात. कोरोना विषाणूची बाधा झाल्यानंतर लक्षणे दिसण्यासाठी १ ते १४ दिवसांचा कालावधी लागतो. अशा स्थितीत एखादी व्यक्ती आपणाला कोरोनाची बाधा झालेली नाही, असे समजून इतरांना भेटत असते. म्हणजेच एवढा प्रदीर्घ काळ कोरोना बाधित व्यक्ती इतरांशी भेटत असते आणि कोरोना विषाणूचा फैलाव अन्य लोकांमध्येही होत रहातो, त्यामुळे ही बाब चिंतेत भर घालणारी मानली जात आहे.

No comments:

Post a Comment

Pages