नांदेड दि. 22 :- किराणा, भुसार, घाऊक / किरकोळ अन्न आस्थापना यांच्या व्यवसायाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत करण्यात आली असून अन्न व्यवसायिकांनी निर्देशित वेळेमध्येच आपला व्यवसाय करावा, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमित केले आहेत.
अन्न व्यावसायिकांनी व्यवसायाचे ठिकाणी स्वत:चे व कार्यरत कामगारांचे आरोग्य सुरक्षित राहिल यादृष्टीने दक्षता घ्यावी. चेहऱ्यावर मास्क तसेच हातामध्ये हॅन्डग्लोज व सॅनिटायझरचा योग्य तो वापर करावयाचा आहे. व्यवसायाच्या ठिकाणी कामगार, ग्राहक यांच्या संबंधात सुरक्षित अंतर किमान एक मीटरचे असावे. व्यवसाय परिसरात एकावेळी पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्ती एका ठिकाणी जमणार नाहीत याबाबत स्वत: उपाययोजना करुन त्याची अंमलबजावणी करावी. ग्राहकांच्या बाबतीत योग्य अंतर ठेवयाचे असून अन्न हाताळणीपूर्वी सॅनिटायझरचा वापर करावयाचा आहे. हात साबणाने स्वच्छ धुण्याबाबत सुविधा उपलब्ध करुन द्यावयाची आहे. चेहऱ्यावर मास्क न लावलेल्या ग्राहकांना अन्न पदार्थाची विक्री करण्यात येणार नाही याबाबत त्यांना सुचित करावयाचे आहे.
पार्सल सेवा / घरपोच सेवा देणारी रेस्टारन्ट यांच्याकडे काम करणारी व्यक्ती यांनी चेहऱ्यावर मास्क वापरणे तसेच हात सॅनिटायझरने स्वच्छ करणे क्रमप्राप्त आहे. त्याचबरोबर संबंधित अन्न पदार्थ तयार करणारे व पुरवठा करणारे कर्मचारी (डिलिव्हरी बॉय ) यांची वैद्यकिय तपासणी करुन घेणे गरजेचे आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी असेही आदेशित केले आहे की, कन्फेक्शनरी, फरसाण व मिठाई आस्थापनाना दिलेली दि. 19 एप्रिल 2020 रोजीची परवानगी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित व्यावसायिकांनी व त्याचे चालक, कामगार यांनी पुढील आदेशापर्यंत व्यवसाय करु नये याची त्यांनी नोंद घ्यावी.
अन्न व्यावसायिकांनी त्यांना दिलेल्या निर्धारित वेळेच्या बंधनासहित आरोग्याच्यादृष्टीने सर्व उपाययोजना करुन व्यवसाय करावाचा आहे. अन्यथा साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन 2005 आणि भा. द. वि. 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व त्याअनुषंगाने कारवाई करण्यात येईल, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त तु. चं. बोराळकर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment