कोरोनाशी लढा :एक -दोन महिने नव्हे, एक-दोन वर्षांचे नियोजन करा -शरद पवारांचा केंद्राला सल्ला
मुंबईः कोरोनाचे संकट एक-दोन महिन्यांचे नसून आर्थिक क्षेत्रात या संकटावर मात करण्यासाठी एक-दोन वर्षे लागू शकतात. यासाठी केंद्र सरकारने अजून खबरदारी घ्यायला हवी, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. सरकार कुठल्या पक्षाचे आहे हे न पाहता या संकटावर मात करण्यासाठी पावले टाकण्याची गरजही पवारांनी बोलून दाखवली. शिवाय वांद्रे येथील घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी घेण्याचा सल्लाही पवारांनी दिला आहे.
कोरोनाच्या महामारीचा अर्थकारणावर विपरित परिणाम झाला आहे. बाजारपेठेला मर्यादा आल्या आहेत. शेतीवरही परिणाम होत आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू बाजारात आणण्यासाठी संकटे येत आहेत. हातात आलेले पीक सोडून देण्याची भूमिका शेतकऱ्याला घ्यावी लागत आहे, असे पवार म्हणाले.
बेरोजगारी वाढेल, खबरदारी घ्याः उद्योग बंद असल्याने उद्योजकांवर कामगारांची जबाबदारी वाढत आहे. त्यामुळे पुढील काळात बेकारी व बेरोजगारीचे संकट वाढू शकते. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढेल, असे दिसत असल्याने आपण आताच योग्य खबरदारी घ्यायला हवी, असेही पवारांनी म्हटले आहे.
पाणी टंचाईवर आताच उपाययोजना कराः राज्यात मे महिन्यात साधारणतः पिण्याच्या पाण्याची कमरता भासते. यासाठी सरकारने योग्य ती खबरदारी घेऊन जिल्हा, तालुका तापळीवर योग्य ती काळजी व उपाययोजना आताच करायला हव्यात. पाणी संकटाला सामोरे जाण्याची तयारी ठेवायला हवी, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.
No comments:
Post a Comment