किनवट : रब्बी आणि खरीप पीक कापणी अहवाला व्यतिरिक्त हिंगोली लोकसभा मतदार संघातील किनवट तालुक्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांचा विशेष कापणी अहवाल करून शेतकऱ्याकडील सर्वच मका ,खरेदी केला जाणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे . याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी राज्यस्तरावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कृषी मंत्री दादा भुसे यांच्या कडे सतत पाठपुरावा केल्यामुळे या विशेष कापणी अहवालास मान्यता देण्यात येऊन शासननिर्णयानुसार मक्याची खरेदी केली जाणार आहे .
किनवट तालुक्यातील अप्पारावपेठ , इस्लापूर , शिवणी या भागातील शेतकऱ्यांना कृषी विभागाने प्रोत्साहित करून मका पिकाचे उत्पादन घ्यायला लावले होते . शासनाच्या धोरणापेक्षा हेक्टरी जास्त उत्पादन झाल्यामुळे शेतकऱ्यांना मका विक्री करण्यास अडचण येऊ लागली मध्यंतरीच्या काळात कोरोनामुळे सर्व बाजारपेठा बंद असल्याने शेतकरी हवालदिल झाला होता . शासन निर्णयानुसार १७ क्विंटल मक्याची फक्त खरेदी होत होती, पण जवळपास ८० क्विंटल मका शेतकऱ्यांच्या घरात पडून राहू लागला. त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याने याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी यापूर्वी सुद्धा जिल्हाधिकारी यांना पत्रव्यवहार करून मका खरेदी करण्याचे निर्देश दिले होते . शासन निर्णयानुसार खरेदी करून उर्वरित मका तसाच सोडून दिला होता . याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी परत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे , कृषी मंत्री दादा भुसे , कृषी सचिव एकनाथ डवले यांच्याशी संपर्क साधून सर्व प्रकार निदर्शनास आणून दिला असता मुख्यमंत्री व कृषी विभागाने दखल घेऊन रब्बी व खरीप पीक कापणी या दोन शासन निर्णयानुसार असलेल्या अहवाला व्यतिरिक्त विशेष कापणी अहवाल तयार करण्यास मान्यता दिली. वस्तुस्थिती लक्षात घेऊन निष्कर्ष काढले जाणार आहेत, असे राज्याच्या कृषी विभागाने सांगितले आहे. तसेच खाजगी बाजारात मक्याचा १ क्विंटलचा दर १२०० रुपये असून शासन १७०० रुपये दराने खरेदी करणार आहे . खासदार हेमंत पाटील यांनी याबाबत शासन स्तरावर सतत पाठपुरावा केल्यामुळे किनवट तालुक्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. यापूर्वी सुद्धा खासदार हेमंत पाटील यांनी किनवट तालुक्यात सीसीआय चे कापूस खरेदी केंद्र सुरु करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे .
No comments:
Post a Comment