भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहूती देऊन बलिदान दिले आहे. या स्वातंत्र्य संग्रामात आदिवासी समाजातील क्रांतिवीरांचाही फार मोठा सहभाग आहे. त्यापैकीच एक म्हणजे आदिवासी स्वराज्याचा नायक क्रांतीवीर बिरसा मुंडा आहे. आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न..
आदिवासी समाजाच्या उद्धारासाठी बिरसा मुंडा यांनी जीवन अर्पण केले असून ते प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्यांची तुलना करता येत नाही. बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाला जागृत करण्याचे कार्य करून विकासाच्या प्रवाहात आणण्याचे महान कार्य केले आहे.
बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर,१८७५ रोजी झारखंड मधील रांची जिल्ह्यात लिहतू या खेडेगावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सुगमा मुंडा आणि आईचे नाव करमी हातू हे होते. त्यांचे वडील शेतमजूर होते. त्यांचे शिक्षण चाईबासा मिशनरी स्कूलमध्ये झाले. शिक्षणामुळे त्यांच्यावर आधुनिक विचारांचा प्रभाव पडला. परंतु त्यांना भारतीय संस्कृतीचा मनस्वी अभिमान होता व तो त्यांनी निरंतर जपला. नैतिक आचरणाची शुद्धता व एकेश्वरवादाचा त्यांनी पुरस्कार केला.
ब्रिटिशांनी १८७८-७९ मध्ये प्रथमच वनाबद्दलचा कायदा केला व जंगल सरकारच्या मालकीचे झाले. ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये आदिवासींच्या वनसंपत्तीवर असलेल्या अधिकारावर बाधा येण्यास सुरुवात झाली. आदिवासींना यामुळे बेघर व्हावे लागले. आदिवासींनी उदरनिर्वाहासाठी फळ, कंदमूळ, लाकुड्फाटे अथवा जनावरांसाठी चारा तोडल्यास त्यांना शिक्षा होऊ लागली आणि आदिवासीयांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. हे रोखण्याकरीता आदिवासींनी न्यायालयात याचिका दाखल केली व आदिवासींचे वनाधिकार पुनर्स्थापित करण्याची मागणी केली. परंतु सरकारने ती फेटाळल्यामुळे आदिवासी समाजात प्रचंड रोष निर्माण झाला.
सन १८९४ मध्ये बिहार राज्यात भीषण दुष्काळ पडला होता. या दुष्काळामध्ये उपासमारी व महामारीने अनेक लोक मृत पावले. त्यावेळी त्यांनी गरीब आदिवासी समाजाची निःस्वार्थी अंतःकरणाने सेवा केली. आणि अन्यायाविरुद्द बिरसांनी व्यापक क्रांती 'उलगुलान 'ची घोषणा केली. बिरसांनी समाजसुधारणेचे अभियान आपल्या हातात घेतले. जल, जंगल, जमीन ही संपत्ती आमचा अधिकार आहे, ते आमच्या उपजीविकेचे साधन आहे, यासाठी सर्व आदिवासींनी एकत्र येवून लढायचे आवाहन केले. त्यांनी न्याय व अधिकारासाठी शस्त्र हाती घेतेले. जंगल राज्याची घोषणा करून ते आदिवासींचे महानायक बनले.
पुढे ब्रिटीश सरकारने आकारलेला अवाजवी शेतसारा माफ करुन दुष्काळावर मात करण्याकरिता त्यांनी जनआंदोलन केले. हे आंदोलन जहागीरदार व जमीनदार यांच्या शोषणाविरुद्ध होते. त्यामुळे सामाजिक संतुलन बिघडून अशांतता निर्माण होत असल्यामुळे ब्रिटिशांनी जहागिरदार व जमीनदारांच्या माध्यमातून बिरसा मुंडा यांना रोखण्याचा प्रयत्न केला. १८९५ मध्ये बिरसा मुंडा यांना दोन वर्षाचा करावास झाला त्यांना हजारीबाग तुरुंगात पाठविले. त्यामुळे सरकारविरुद्ध असंतोष वाढत गेला व ब्रिटिश सत्ता उखडून टाकण्याचा संकल्प त्यांनी केला. दोन वर्षाचा सश्रम कारावास उपभोगून परत आल्यानंतर आदिवासींच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी राजकीय स्वातंत्र्याची आवश्यकता त्यांनी ओळखली. त्यासाठी संपूर्ण आदिवासी समाजाला संघटित करण्यासाठी प्रयत्न करुन त्यांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध स्वातंत्र्यलढा पुकारला.
बिरसा हे उत्तम योद्धा होते. एक कुशल प्रशासक होते. फेब्रु. १८९८ मध्ये बिरसांनी आपल्या अनुयायांच्या सोबत डुंबारी बुरुज या पर्वताच्या पायथ्याशी सभा बोलावली, व १८९९मध्ये नाताळचा पहिलाच दिवस हल्ल्याचा दिवस म्हणून ठरवला. या हल्ल्यामध्ये त्यांनी पोलिस चौकी लुटायचे ठरवले, नाताळच्या रात्री आपल्या साथीदारांच्या तीन वेगवेगळ्या तुकड्या बनवून वेगवेगळ्या जागेवर हल्ले चढवले. आणि 'गणिमी काव्या'च्या माध्यमातून फादरच्या घरावर हल्ले करून फादर कारवेरी व फादर हाफमान यांच्यावर बाण चालवले. पुढे ब्रिटीशांनी या गोष्टीचा खुपच धसका घेतला. त्यांनी बिरसाला पकडण्यासाठी मोहीम सुरु केली. माहिती देणाऱ्याला किंवा पकडून आणणाऱ्यांसाठी बक्षिसे जाहीर केली. ३ मार्च १९०० मध्ये बिरसाला अटक करण्यात आली. तुरुंगवास भोगत असताना कॉलराने ग्रस्त होवून ९ जून १९०० मध्ये बिरसाची प्राणज्योत मावळली. पण बिरसाच्या अनुयायांच्या म्हणण्यानुसार बिरासांना तुरुंगात घातपात करून मारण्यात आले होते.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आदिवासींच्या स्वातंत्र्य संग्रामास इतिहासात मोठे स्थान प्राप्त करून देण्याचे श्रेय बिरसा मुंडा यांनाच जाते. आणि बिरासांनाही खात्री होती की त्यांनी सुरू केलेल्या 'उलगुलान' नावाच्या वादळाचा कधीच अंत होणार नाही, बिरसा मुंडा अमर आहेत व आपल्यासाठी आणि येणाऱ्या प्रत्येक पिढ्यांसाठी ते आदर्श आहेत. त्यामुळेच बिरसा मुंडा हे भारतीय आदिवासी समाजाचे वीर नायक समजले जातात.
बिरसा मुंडा यांच्या नावावर आज अनेक सामाजिक व सेवाभावी संस्था आहेत, विशेष म्हणजे रांची विमानतळाला बिरसा मुंडा यांचे नाव देण्यात आले आहे. तसेच बिरसा मुंडा यांच्या नावावर काही शैक्षणिक संस्था देखील आहेत त्यामध्ये 'बिरसा इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सिंधरी', 'बिरसा मुंडा वनवासी छात्रवास कानपूर', 'सिद्धो कान्हो बिरसा विद्यापीठ', 'पुरुलिया आणि बिरसा कृषी विद्यापीठ' ह्या महत्त्वाच्या शिक्षणसंस्था समजल्या जातात. बिरसाच्या जीवनावर आधारीत 'उलुलन-एक क्रांती (द क्रांती)' हा २००४ मध्ये 'अशोक सरन' यांनी दिग्दर्शित केलेला एक हिंदी चित्रपट देखील आहे. त्यामध्ये ५०० पेक्षा अधिक बिरसा मुंडा यांच्या अनुयायांनी अभिनय केला होता. तसेच रमन मॅगसेसे पुरस्कार विजेते, लेखक-कार्यकर्ते 'महाश्वेता देवी' यांनी बिरसा मुंडा यांच्या विद्रोहांवर 'अरण्यर अधिकारी (१९७७ चा अधिकार)' नावाची कादंबरी देखील लिहिली होती विशेष म्हणजे या कादंबरीला बंगालीसाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानितही करण्यात आले होते.
Tuesday, 9 June 2020
बिरसा मुंडा : आदिवासी ओळख, स्वाभिमान आणि संघर्षाचा नायक - करण मेश्राम
Tags
# प्रासंगिक लेख
Share This
सम्यक मिलिंद सर्पे
प्रासंगिक लेख
Labels:
प्रासंगिक लेख
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.

No comments:
Post a Comment