रेती तस्करांचा पोलिस कर्मचाऱ्यांवर जिवघेणा हल्ला:चार पोलिस जखमी : एका गंभीर जखमी पोलिसास नांदेडला हलवले - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday, 20 June 2020

रेती तस्करांचा पोलिस कर्मचाऱ्यांवर जिवघेणा हल्ला:चार पोलिस जखमी : एका गंभीर जखमी पोलिसास नांदेडला हलवले

  किनवट,दि.२० : रेती तस्करांनी गस्तीवर असलेल्या पोलिसांवर केलेल्या हल्ल्यात चार पोलीस जखमी झाले आहेत. यातील एका पोलिसाची प्रकृती गंभीर असल्याने त्यास पुढील उपचारासाठी नांदेड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना शुक्रवारी( दि.१९)रात्री अकरा ते साडे अकराच्या सुमारास दाभाडी (ता.किनवट) या गावाजवळ असलेल्या नाल्यावर  घडली.
    या प्रकरणी पोलिस नाईक गजानन रामदास चौधरी (३९) यांच्या फिर्यादीवरून आज (दि.२०) किनवट पोलिस स्टेशनला दाभाडी येथील १७ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गंभीर जखमी असलेले पोलिस कर्मचारी श्री.रठोड यांना नांदेड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे,तर आरोपीपैकी सात आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. घटनेची माहिती मिळताच भोकर विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी घटनास्थळी तातडीने भेट देऊन घटनेची माहिती घेतली.
    पोलिस नायक  गजानन चौधरी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आलेल्या आरोपींची नावे अशी: मनोहर दबडे, अविनाश दबडे, अमरनाथ दबडे, ज्ञानदेव जगदीश खांडेकर , विठ्ठल गणपत आमनर, दीपक सिकालकर, रुपेश चिकालवार, साईनाथ शामराव गजभारे, महादेव अंकुश पांढरे, बाबुराव प्रभू  वाळेकर, अजय मनोहर दबडे, ज्ञानेश्वर लक्ष्मण शिंदे, किरणबाई मनोहर दबडे, कानुपात्रा अमरनाथ दबडे, प्रभा नामदेव दबडे व इतर दोन पुरुष राहणार सर्व दाभाडी (ता.किनवट)
     चौधरी यांनी दिलेल्या आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादी व साक्षीदार असे मिळून वाळू चोरी प्रतिबंध करण्याकरिता लोकसेवक या नात्याने त्यांची शासकीय कर्तव्य बजावीत असताना शुक्रवारी (ता.१९) रोजी रात्रीच्या अकरा ते साडे अकराच्या सुमारास दाभाडी (ता. किनवट) या गावी आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादी व साक्षीदार यांना त्यांच्या कर्तव्यापासून परावृत्त करण्याच्या उद्देशाने संगनमत करून जिल्हाधिकारी नांदेड यांच्या जमावबंदीचे व हत्यार बंदीचे आदेश लागू असतांना त्याचे उल्लंघन करून आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून, सशस्त्र होऊन साक्षीदार पोहेका राठोड यांचा जीव घेण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यात लोखंडी फावडे मारुन त्यांना गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादी व सोबतचे कर्तव्यावरील पोलीस अधिकारी कर्मचारी यांना लाकडी दांड्याने, काठीने व दगड फेकून मारून जखमी केले  व रस्ता अडवून अटकाव केला. साक्षीदार सुरेश कोलबुधे यांचा मोबाइल फोडून नऊ हजार रुपयांचे नुकसान केले.
   या प्रकरणी पोलीस निरीक्षक मारोती थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार कांबळे हे पुढील तपास करीत आहेत. या घटनेतील सतरा आरोपींपैकी पोलिसांनी आज (ता.२०)  मनोहर दबडे, अविनाश दबडे, अमरनाथ दबडे, ज्ञानदेव जगदीश खांडेकर,  महादेव अंकुश पांढरे, अजय मनोहर दबडे व ज्ञानेश्वर लक्ष्मण शिंदे या सात आरोपींना अटक केली आहे.
    #चौकट#
   पोलिसांवर हल्ला करणे ही गंभीर बाब आहे. यात कांही महिलांचाही समावेश आहे आरोपींमध्ये महिला असल्या तरी त्यांची गय केली जाणार नाही, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

No comments:

Post a Comment

Pages