आम्हाला गरज धर्माची नाही, तर सम्यक विचारांची. - प्रा.संदीप गोणारकर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 16 June 2020

आम्हाला गरज धर्माची नाही, तर सम्यक विचारांची. - प्रा.संदीप गोणारकर

 
   जगातील व देशातील कोरोनाचा प्रवास आपण अनुभवत आहात. त्याचा जगासह आपल्यावर सुद्धा खूप परिणाम झाला आहे. त्यात प्राणी,पक्षी व निसर्गातील सर्वच घटकांवर परिणाम झाला. त्याबद्दलची आकडेवारी न देता त्याबद्दलची समीक्षणात्मक माहिती या माध्यमातून लिहिणार आहे.
        जगातील विविध देशांनी कोरोनाचा संसर्ग टळावा म्हणून लॉकडाऊन ची घोषणा केली. त्यातून मानव प्राणी आप-आपल्या घररूपी पिंजऱ्यात बंदिस्त झाला. जंगलातील ईतर प्राणी मनसोक्त पणे बागडायला लागेल. म्हणजेच आपण जे निसर्गावर अतिक्रमण केलं होतं. ते अतिक्रमण काही महिन्यांपुरत कमी झालं. व निसर्गाची वाटचाल मनसोक्त पणे चालू झाली.
      त्यात ओझोन च्या थरातील छिद्र सुद्धा नष्ट झाल्याची बातमी ऐकण्यात आली.हवा प्रदूषण खूप प्रमाणात कमी झाले. ओझोनच्या थरातील छिद्र असो किंवा दिल्लीच्या प्रदूषणाचे प्रमाण 130 वरून 35 पर्यंत कमी होणे असो . हे प्रमाण कमी होण्याचं कारण म्हणजे शहरातील वाढते वाहतुकीचे प्रमाण, कारखानदारी हे मुख्य करणे होत. या कारणामुळं वातावरणात रासायनिक वायूचे प्रमाण वाढत गेले. त्यातून निसर्ग चक्रात अडथळे येऊ लागले.
     नदी मध्ये कारखान्यांमार्फत होणारा दूषित पाण्याचा विसर्ग कमी झाला, तिर्थक्षेत्रांच्या नावाखाली नदीत केले जाणारे अस्थी विसर्जन, नदीत केली जाणारी पूजा विधी, आदींसह नदीचे पाणी दूषित करण्यास कारणीभूत सर्व घटक बंद होते. त्यामुळं नदीच्या स्वच्छतेचे प्रमाण कमी झाले. पण म्हणावे तसे कमी झाले नाही. कारण बहुतांश नदीतील पाणीसाठा हा प्रवाहित नाही. नांदेड येथील गोदावरी नदीतील मासे किनाऱ्यावर दिसून येणे. हे दिवस उन्हाळ्याचे असल्यामुळं पाण्याची पातळी खालावल्या गेली. त्यातून नदीचा प्रवाह बंद झाला. बंद प्रवाहामुळे पाणी स्थिर राहिले व नदीच्या प्रदूषणात घट दिसून येत आहे. यामुळं जलसंपत्तीत वाढ होण्यास मदत झाली.
      ध्वनी प्रदूषण : विविध शहरातील वाहनांची वर्दळ थांबली, त्यातून आवाज, हॉर्नचे आवाज बंद झाले. कारखानदारी बंद त्यातून कर्ण-कर्कश सायरन बंद झाले. यामुळं ध्वनी प्रदूषण कमी होण्यास मोठ्या प्रमाणात मदत झाली. विविध शहरांसह देशाचे प्रदूषण कमी होण्यास यातून मदत झाली. यातून बरेच मानवाने चालवलेली निसर्गाची हानी काही काळासाठी ती थांबली. त्यातून निसर्गातील अन्य सजीव आनंदाने आपलं आयुष्य जगू लागले.
      त्याचे परिणाम मानव जातीसह अन्य सजीवांना सुद्धा भोगावे लागत आहेत. पण कर्म माणसाचे, त्याचे फळ मात्र इतर प्राण्यांना का ?
असा विविध बाजूने चांगला परिणाम निसर्गावर या लॉकडाऊन चा झाला. पण या लॉकडाऊन नंतर काय होणार ? हा प्रश्न आपल्यासमोर आहे. अनलॉक नंतर हि परिस्थिती कशी रहावी याबद्दलची काळजी घेणं आमची गरज आहे. मुंबई पुण्यासारख्या शहरात लॉकडाऊन मध्ये काही काळ शिथिलता दिल्यानंतर रस्त्यावरील वाहनांची व नागरिकांची वर्दळ पाहिल्यानंतर भविष्यातील भीषण स्थिती लक्षात येते. मग अशा वेळी काय करणं गरजेचं आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल.
अनलॉक करत असताना नांगरिकांनी संयम बाळगणे गरजेचे आहे. "मानवाने कोणत्या ठिकाणी कसे वागावे, हे समजून घेऊन वावरण्याची जिम्मेदारी उचलली असती तर आज देशाला लॉकडाऊन ची गरज पडली नसती." हि विचारप्रणाली बुद्धांनी आपल्या आयुष्यात सुख-वस्तूंचा त्याग करून. आयुष्यातील सहा वर्षे कठोर परिश्रम घेऊन देण्याचं काम केलं. पण त्या शिकवणीस धर्म या व्याख्येत बंदिस्त करून आम्ही आमच वाटोळं करून घेत आहोत.
         तथागतांच्या शिकवणीचा मुख्य उद्देश मानवी जीवन सुखी बनवणे. त्यासाठी विविध बंधने (मी त्यांना बंधने समजणार नाही. पृथ्वीतलावरील प्रत्येकाचे आयुष्य आनंदी करण्यासाठी माणसाने कसे वागावे याबद्दलच्या सूचना आहेत.) सांगितली आहेत. पण ही बंधने आहेत का याचा आपण नक्की विचार करावा.
कारण, बुद्ध निसर्गातील प्रत्येक घटकाला महत्व देतात, पृथ्वीतलावरील प्रत्येक मानवाला किंमत देतात. त्यातून एक-मेकांना काहीही त्रास होऊ नये यासाठी काळजी घेण्याची शिकवण देतात. प्रत्येकावर प्रेम करायला सांगतात. मानवी आयुष्यात तुमचा संपर्क येणाऱ्या प्रत्येक घटकांवर बुद्ध प्रेम करायला सांगतात. मग तो घटक सजीव असो अथवा निर्जीव. जर आपण प्रत्येक घटकावर प्रेम करत राहिलो तर आपली तृष्णा कमी होते. एक-मेकांतील आपुलकी वाढते. सीमावाद,प्रांतवाद, जातीवाद अशा प्रकारचे वाद थांबतात. त्यातून मानवाचे एक-मेकांशी घट्ट नाते जुळतात. मानवाचे एक-मेकांशी जर घट्ट नाते जुळले तर माणूस माणसाचा दुष्मन होत नाही. त्यातून हा आपला कोरोना आपल्यासमोर आला नसता.(खरंच जर प्रयोग शाळेत तयार झालेला असेल तर.) व आपण या संकटात सापडलो नसतो.
बुद्धांच्या विचारतील ताकद हि मानवाला पृथ्वी तलावरील प्रत्येक घटकांशी प्रेम करायला शिकवते. मग तो घटक जिवंत असो किंवा मृत. केरळ मधील हत्तीच्या निधनानंतर खूप मिम्स व दुःख व्यक्त करणाऱ्या पोस्ट व्हायरल झाल्या. पण याचा फायदा काय ? त्या प्राण्याने आपला जीव गमावला. असे कित्येक प्राण्यांचे आपण जीव घेता त्याबद्दल का कळवळा येत नाही. काल हत्तीण व तिचा न जन्मलेलं मूल मारल्यागेल म्हणून आम्ही शोक व्यक्त केला. पण येथे वर्षानुवर्षे देवाला प्रसन्न करण्यासाठी म्हणून प्राण्यांचा बळी दिला जातो, शेतात प्राण्यांनी धुमाकूळ घालू नये म्हणून शेताच्या सीमेवर विजेचे कुंपण घालतो. अशा प्रकारे हजारो प्राणी मारले जातात. शौक पूर्ण करण्यासाठी म्हणून प्राण्यांची शिकार केली जाते. जिभेची चोचले पुरवण्यासाठी प्राण्यांची हत्या केली जाते. त्या हत्त्येबद्दल बोलणार आहात का नाही ? त्या हत्त्येबद्दल तुम्हाला काहींच वाटत नाही. निसर्गातील कोणत्याही जीवाची हत्या केली तर आम्हाला काहीच वाटत नाही पण या हत्तीच्या वेळेसच एवढा कळवळा का ? ईथे जात,संपत्ती, प्रेम, द्वेष यातून माणसांची हत्त्या केली जाते. त्या हत्येचा निषेध करत असताना त्याची बाजू पाहून निषेध केला जातो (तो जर स्वधर्मीय असेल, त्याच्या हत्येच कारण आपली मानसिकता नसेल). हत्तीच्या निधना दरम्यान नागपूर च प्रकरण घडलं त्यानंतर पुण्याच, पिंपरी चिंचवड असे प्रकरण घडले पण या प्रत्येक वेळी निषेध नोंदवणारा समुदाय बदललेला दिसला. असे का ?
त्यात जो कोणी अन्यायग्रस्त होता त्याच्या समुदायातील किंवा समर्थनातील व्यक्तींनीच  त्याचा निषेध केला. आरोपींविरुद्ध आवाज उठवला. मग अशाने आपल्यात मानवता शिल्लक आहे हे कशावरून मान्य करायचे ? प्रत्येकाचा धर्म प्रत्येकाला चांगली शिकवण देतो, अन्यायाविरुद्ध लढायला सांगतो असं म्हणतो मग आता कुठं आहे तुमच्या धर्मातील चांगली शिकवण ? कोणत्या धर्मात काय सांगितलंय याच्याशी माझा काहीही संबंध नाही. मी कोणत्याही धर्माचं समर्थन किंवा विरोध करत नाही. पण मानव म्हणून जगत असताना ज्या बाबी करायला हव्यात त्या करण्यासाठी जर काही अडथळे येत असतील आणि त्यासाठी विशिष्ठ विचारधारा कारणीभूत असेल तर त्या विचारधारेच्या विरोधात मी नेहमी बोलत राहणार. मग ती विचारधारा एखाद्या धर्माची असेल तरी सुद्धा मला काहीही अडचण नाही. कारण मित्रानो तुम्ही म्हणता कि धर्म माणसाला, माणसाशी, माणसा सारखे वागायला शिकवतो. तर मग जाती आधारित हत्या करायला कोण शिकवते ? जातिआधारीत हत्या करायला कोणता धर्म शिकवत असेल तर त्या धर्माची हत्या करणं गरजेचं आहे माणसाची नाही. एखाद्या धर्मात,माणूस  नीच आहे म्हणून त्याच्याशी नाते जोडू नये, अशी सांगणारी शिकवण असेल. तर मग यात कुठली  आली माणुसकी. हा मानवाच्या हिताचा धर्म होऊच शकत नाही. ते सगळं थोतांड आहे. व ते मान्य करत जगणं म्हणजे आपण आपल्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करत आहात.

 निसर्गनियामानुसार स्त्री आणि पुरुष हे दोन भेद आहेत. या दोन्ही घटकांना विशिष्ट रचना निसर्गामार्फत प्राप्त झाली आहे. त्यातून ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टीला विरोध करण्याचा अधिकार आपणास कोणी दिला.(याबद्दल काही बोलायचं असेल तर शेवटी माझा नं दिला आहे. सम्यक चर्चेसाठी अवश्य कॉल करू शकता. तुमची वायफळ बडबड किंवा अन्य गोष्टी ऐकवायच्या असतील तर कॉल न केलात तर चांगलंच राहील.) जात हा अभिमानाचा मुद्दा असेल तर प्रेम सुद्धा त्यांच्या जगण्याचा मुद्दा आहे. मग या प्रकरणात अडथळा आणलात तर त्याची सजा तुम्हाला नक्कीच भेटेल.
ज्या जातीचा आपण अभिमान बाळगतोय ती आहे तरी काय ? माणसापेक्षा ती जास्तीची महत्वाची आहे का ? हा गर्व निर्माण होण्यास कारणीभूत घटक कोणते आहेत ? तर इथली समाजव्यवस्था. या समाजव्यवस्थेला तुम्हाला नाकारणं शक्य नाही, म्हणून तुम्ही तिचे गुलाम बनून राहता. हत्येच प्रकरण जर तुमच्या घरात घडलं तर काय वाटेल ? याबद्दल कधी डोक्यात तुमच्या विचार येईल का ? यावर प्रतिप्रश्न कराल कि कनिष्ठ जातीतील मुलांसोबत प्रेमप्रकरन असेल तर समाज काय म्हणतो याची जाणीव मला आहे का ? तुम्हाला या प्रश्नाच्या उत्तरात एवढंच सांगायचं कि,"हा गर्व महत्वाचा का माणूस ?" हि मानसिकता निर्माण होण्यास कारणीभूत घटक ओळखा आणि असे प्रकरण थांबवा. म्हणजे प्रमाला विरोध करण्यास बळ देणारी मानसिकता बदला. मग काहीही त्रास होणार नाही. आपण एखाद्या गोष्टी करत असताना लोक काय म्हणतील याचा विचार करू नये. असं आपण म्हणतो. कारण, लोक काय लोकांना फक्त बोलता येते. तसेच इथेही समजा ना. लोकांना काय फक्त बोलता येते.
अशा विचारांना रोखण्याची ताकद फक्त बुद्ध विचारातच आहे. हे मी सांगणार नाही. ते तुम्हीच मान्य कराल जर, बुद्धाला समजून घ्याल तर. बुद्धाच्या ज्ञानप्राप्तीनंतर जेव्हा त्यांच्या शिकवणीचा प्रसार वाढत चालला तसे तसे अनुयायी वाढत गेले. पण बुद्धांच्या अनुयायांत विशिष्ठ धर्मियांनी च यावे असं कोणत्याही प्रकारच बंधन न्हवत. म्हणजेच बुद्धाच्या शिकवणीचा जर अंगीकार करायचा असेल तर क्षत्रिय कुळातील, ब्राह्मण, वैश्य आदिपैकी एखाद्या वर्णाला परवानगी होती असे नाही. तर त्यात कोणत्याही वर्गातील व्यक्ती, स्त्री ती शिकवण अंगिकरू शकत होता. म्हणजेच तथागतांनी भेदरहित मानव तयार करण्याचा प्रयत्न केला. पण हा भेदरहित मानव आपल्याला मान्य नाही असे दिसतोय व त्यातून असे प्रकरण घडत जातात.
        जगातील प्रत्येक समस्या निर्मितीच मूळ बुद्धांनी जाणलं होत. ती निर्माण होऊ नये यासाठी त्यावर मार्ग सुद्धा सांगितला आहे. ते अंगिकरलो तर खूप समस्या नष्ट होतील. तो आचरणात आणत असताना आपनास संकटाचा सामना करावा लागतो. पण जेव्हा सामुदायिक आचरण होते त्यावेळी कसल्याही प्रकारचा त्रास आपणास होत नाही.

कोरोना संपला नाही तरीसुद्धा सरकार टप्प्या-टप्प्यांत अनलॉक करत आहे. यातून निर्माण होणारा संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडे काहीही नियोजन नाही. अशावेळी शासनाला दोष देत बसाल तर नुकसान आपलेच आहे. त्यामुळं शासनासोबत आपली जबाबदारी प्रत्येकाने पार पाडायला पाहिजे. तरच आपण व आपला परिसर सुरक्षित ठेऊ शकतो. कोरोना हा संसर्गजन्य रोग आहे. हे आम्हाला कळलं आहे. तो कसा पसरतो हे सुद्धा आम्हाला माहित झालं आहे. मग या कोरोनाला हरवण्यासाठी स्वतः खंबीर व्हा. म्हणजेच आपण "अत्त दीप भव" या वाक्याचा अंमल करा. नक्कीच आपण प्रत्येक बाबीत पुढं जाऊ. देश म्हणजे दुसरं तिसर काहीच नाही. तर देश म्हणजे आपण स्वतः आहोत. स्वतः प्रत्येक गोष्टीत सक्षम बनलो तर देश नक्कीच सक्षम बनेल.
        या निमित्ताने लिहिलेल्या प्रत्येक बाबीचा आपण नक्कीच विचार करावा. कोरोना आपल्याला बरंच काही शिकवून गेला असं म्हणतोय पण परिस्थिती बदलली कि आपण शिकलेल्या कोणत्याही गोष्टीला महत्व देत नाही. त्यामुळं कोरोना नंतर आपण पुन्हा आप-आपले वाद काढत बसतो. नंतर काय कोरोना काळातच आपण हे केलेलं आहे. पुण्यातील बहीण भावाचा खून, प्रेम प्रकरणातून झालेलं पिंपरी तील खूप प्रकरण, नागपुरातील जातीय द्वेषातून झालेला अंत. या सर्व बाबी आपल्याला दाखवून देतात कि, आम्ही मानव म्हणून कधीच सुधारणार नाही. आमच्या मनात जे येईल तेच आम्ही करू. तुमच्या मनात नेहमी सम्यक संकल्प व विचार येण्यासाठी बौद्ध विचारांची कास धरण्याची सद्बुद्धी तुम्हाला सुचो. हि अपेक्षा....

   @ जी.संदीप (गोणार,नांदेड)
                9552803980
























1 comment:

Pages