१२ जिल्हा परिषद, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर; ५ फेब्रुवारीला मतदान
मुंबई : राज्यातील बहुप्रतिक्षित जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. यानुसार राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी निवडणुका होणार असून, ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान घेतले जाणार आहे.
निवडणुकीची अधिसूचना १६ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत १६ ते २१ जानेवारी, तर अर्जांची छाननी २२ जानेवारीला होईल. उमेदवारी माघारीची अंतिम मुदत २७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असून, त्याच दिवशी दुपारी ३.३० नंतर अंतिम उमेदवारांची यादी व निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल.
मतदान ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत होणार असून, मतमोजणी ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरू होईल. मतदानाच्या २४ तास आधी प्रचाराची सांगता केली जाणार आहे.
या निवडणुकांसाठी १ जुलै २०२५ची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. राज्यभरात २५ हजार ४८२ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, यासाठी १ लाख १० हजार ३२९ बॅलेट युनिट्स वापरण्यात येणार आहेत.या जिल्ह्यांत जिल्हा परिषद निवडणुका कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तसेच पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर व धाराशिव या जिल्हा परिषदांसाठी निवडणुका होणार आहेत.
निवडणूक कार्यक्रम
अर्ज स्वीकारणे : १६ ते २१ जानेवारी २०२६
छाननी : २२ जानेवारी २०२६
माघार : २७ जानेवारी २०२६ (दुपारी ३ पर्यंत)
अंतिम यादी व चिन्ह वाटप : २७ जानेवारी २०२६ (दुपारी ३.३० नंतर)
मतदान : ५ फेब्रुवारी २०२६
मतमोजणी : ७ फेब्रुवारी २०२६

No comments:
Post a Comment