कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी स्वयंशिस्त पाळणे आवश्यक - जिल्हाधिकारी उदय चौधरी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 18 July 2020

कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी स्वयंशिस्त पाळणे आवश्यक - जिल्हाधिकारी उदय चौधरीऔरंगाबाद, दिनांक 18  : कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी उद्योजकांनी स्वयंशिस्त पाळत कामगारांनाही प्रशिक्षित करावे. कोरोना आजार होऊ नये यासाठी घ्यावयाची खबरदारी याबाबत जनजागृती करण्यावर भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज उद्योजकांना केले.
     जनता कर्फ्यूनंतर सुरू होणाऱ्या उद्योगांनी घ्यावयाची खबरदारी, कामगारांची काळजी याबाबत आज येथील उद्योग संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी जिल्हाधिकारी यांनी  चर्चा केली. यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक अस्तिककुमार पांडेय,पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उद्योजक राम भोगले, मानसिंग पवार, मुकुंद कुलकर्णी, कमलेश धूत, अभय हंचनाळ, मनीष धूत, प्रितीश चटर्जी आदींसह सीआयए, सीएमआयए,मसिआ, डिलर्स असोसिएशन, औरंगाबाद फर्स्टच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
चर्चेच्या सुरुवातीला उद्योग संघटनांनी मिळून उद्योग क्षेत्रात आगामी काळात कशा प्रकारे काळजी घेण्यात येईल आणि कोणकोणत्या उपाययोजना अमलात आणल्या जातील याबाबत जिल्हाधिकारी यांच्यासमोर सादरीकरण केले.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की,  जनता कर्फ्यूनंतर पूर्वीप्रमाणे उद्योग व्यवसाय सुरू होताहेत. त्यादृष्टीकोनातून उद्योगांनी कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने जारी करण्यात आलेल्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे.  कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी उद्योग कंपन्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीत या आजाराचा प्रसार होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. तसेच 55 वर्षांवरील व्यक्ती, मधुमेह, रक्तदाब, हृदय, यकृत विकार, दमा, जास्तीचा खोकला असेल अशा व्यक्तींना घरून काम करण्याची मुभा द्यावी.  कर्मचाऱ्यांनीही घरून निघताना स्वत:सह इतरांची काळजी घेत घ्यावी तसेच  आरोग्य सेतू आणि महापालिकेच्या MHMH या अँपचा वापर करावा. प्रतिबंधात्मक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर उपस्थित होऊ नये, शारिरिक अंतर, मास्कचा वापर, वारंवार हात धुणे या त्रिसूत्रीचा वापर करावा असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
यावेळी उद्योजकांनी केलेल्या सादरीकरणात कामगारांनी बसमध्ये बसण्याची नागमोडी पद्धत अवलंबवावी. एका आसनावर एकच व्यक्ती बसावी. कारमध्ये केवळ तीनच व्यक्तींनी प्रवास करावा. बस वाहक, चालकांनी वाहून नेत असलेल्या कामगारांवर शिस्तीचे पालन होत आहे याबाबत नियंत्रण करावे. प्रवासात, कामावर असताना मास्कचा वापर करणे बंधनकारकच आहे. कामाच्या ठिकाणी तपासणी, घ्यावयाची काळजी याबाबत वारंवार आढावा घेण्यात यावा. जेवण, चहा, नाष्टांच्या वेळा ठराविक असाव्यात, तिथे शारीरिक अंतर पाळले जाईल, याची दक्षता घ्यावी. कामगारांची काळजी घेण्याबरोबरच कामगारांनाही त्यांच्या नातेवाईकांना प्रशिक्षित करण्याबाबत त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करावी, याबाबतही चर्चा करण्यात आली.
चिकलठाणा, रेल्वे स्टेशन परिसरातील औद्योगिक परिसरातील उद्योग कंपन्या त्यांच्या कामगारांच्या अँटीजन चाचण्या करण्यासाठी मनपा प्रशासनास सहकार्य करेल, असेही उद्योजकांनीही यावेळी सांगितले.

No comments:

Post a Comment

Pages