किनवट ,दि.६ : हिमायतनगर कोवीड केअर सेंटर (सीसीसी ) मधील विलगीकरण कक्षात मागील तीन दिवसापासून असलेल्या किनवटच्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.खबरदारी म्हणून त्यांच्या घरातील तिघांना किनवट येथील विलगीकरण कक्षात ठेवले असून त्यांचे सह नऊ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यांचा अहवाल आल्यानंतरच वस्तुस्थिती समोर येणार आहे, तेव्हा जनतेंनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे यांनी केले आहे.
हिमायतनगर येथील भूमी अभिलेख कार्यालयात नांदेड वरून ये -जा करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा अहवाल दि. ४ रोजी पॉझिटिव्ह आल्याने त्या कार्यालयातील सहाही कर्मचाऱ्यांना हिमायतनगर येथील सीसीसी मध्ये ठेवण्यात आले होते. कंधारगल्ली, गोकुंदा( ता. किनवट ) येथून एक कर्मचारी त्या कार्यालयात ये-जा करीत होता. त्या सहामध्ये त्यांचाही समावेश होता त्या सहाही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी किनवटच्या ४५ वर्षीय व्यक्तीचा अहवाल बाधित आला. तो आजही तिकडेच उपचारार्थ दाखल आहे. परंतु, त्यानुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणून त्याच्या कुटुंबातील तीन व्यक्तींना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांची पत्नी आणि एक मुलगा यांना किनवट येथील सीसीसी मध्ये दाखल करण्यात आले आणि एका मुलाचे कोरोनासदृश्य लक्षण दिसू लागल्याने त्यांना डेडीकेटेड कोवीड हेल्थ केअर सेंटर (डीसीएचसी), उप जिल्हा रुग्णालय गोकुंदा ( किनवट ) येथे प्रविष्ठ करण्यात आले आहे. या तिघांसह एकूण नऊ जणांचे स्वॅब घेतले असून ते तपासणीसाठी नांदेडला पाठविण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल आल्यानंतरच वास्तव समोर येईल. तेव्हा जनतेंनी घाबरून जाऊ नये, अफवावर विश्वास ठेवू नये, अफवा पसरवू नये, स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम धुमाळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांनी केले आहे.
"हिमायतनगर येथील सीसीसी मध्ये दाखल किनवटचा एक व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्याने खबरदारी म्हणून त्यांच्या कुटुंबातील तीन व्यक्तींना विलगीकरण कक्षात ठेवले असून त्यांचे स्वॅब घेऊन तपासणीला पाठविण्यात आले आहेत. तेव्हा जनतेने कसलीही भीती बाळगू नये, अफवा पसरवू नये, अफवावर विश्वास ठेवू नये, प्रशासनाच्या आरोग्य विभागाच्या सूचना पाळाव्या मास्कचा वापर करावा, वारंवार साबणाने हात धुवावेत आणि गरज असल्याशिवाय घराच्या बाहेर पडू नये आणि बाहेरील व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि आपलं आरोग्य सांभाळावे".
-अभिनव गोयल (भाप्रसे),
सहाय्यक जिल्हाधिकारी, किनवट
No comments:
Post a Comment