किनवट,दि.२३ : बुधवारी (दि.२२)रात्री तालुक्यात सर्वदूर झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यातील नदि - नाले काठोकाठ भरुन वहात आहेत. नाल्याला पूर आल्याने घोटी(ता.किनवट) येथील जुना पूल पाडून केलेला पर्यायी रस्ता वाहून गेल्याने किनवट-माहूर हा राष्ट्रीय महामार्ग बंद पडला आहे. त्यामुळे किनवट शहराचा संपर्क तेलंगणातील आदीलाबाद, विदर्भातील काही जिल्हे व माहूर तालुक्याशी तुटला आहे. याबरोबरच रस्त्याच्या कडेला असलेले फायबर ऑप्टिकल केबल तुटल्याने किनवट शहर व परिसरातील इंटरनेट सेवा विस्कळीत झाली. त्यामुळे बँकिंग सेवा व इंटरनेट सेवा बंद पडल्याने नागरिकांची व शेतकऱ्यांची प्रचंड गैरसोय होणार आहे. यावर लोकप्रतिनिधी व प्रशासनाने पुढाकार घेऊन तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
किनवट-माहूर मार्गावरील घोटी येथील पूल वाहून गेल्याने अनेक गावांचा किनवट तालुक्याशी संपर्क तुटला आहे. पुलाशेजारील बंधाऱ्यावरून जीव मुठीत धरून मार्ग काढतांना प्रवासी, लहान मुले, दूध विक्रेते, आणि इतर लोकं दिसत आहेत. 'लॉकडॉउन'मुळे काम पूर्ण होऊ शकले नाही हे जरी खरे असले तरी शासन,प्रशासनाचे याकडे असणारे दुर्लक्ष हे ही तितकेच कारणीभूत आहे,असे नागरिकांतून बोलले जात आहे.
No comments:
Post a Comment