माझ्या सार्वजनिक जीवनावर सुरेश गायकवाड ,प्रा. पी. एस.धनवे,एस. एम. प्रधान , दादाराव कयापाक व डॉ. अशोक गायकवाड या पाच जणांचा अत्यंत प्रभाव पडला आहे ,नव्हे या लोकांमुळेच मी बालपणातच सामाजिक चळवळीत ओढल्या गेलो.या पैकी सुरेश दादा गायकवाड यांचं नाव मला अग्रक्रमाने घ्यावेच लागेल .
सुरेश गायकवाड हे नाव जेंव्हा मला माहित झालं तेंव्हा माझं वय फारतर बारा वर्षे असेल. तेंव्हा मी सहाव्या वर्गात शिकत होतो. माझ्या घराशेजारी असलेल्या रामराव कावळे यांच्या खोली मध्ये पी.जी.गायकवाड साहेब रहायला आले .त्यांचा छोटा भाऊ म्हणजेच सुरेश गायकवाड पी. जी. गायकवाड हे पोस्ट ऑफिस मध्ये कर्मचारी होते. सुरेश गायकवाड हे नांदेड ला 10 वि ची परीक्षा देऊन किनवट ला भावाकडे राहू लागले .तो काळ 75 चा असावा .या काळात रिपब्लिकन पक्ष हा गटातटात विभागलेला होता .
राज्यात दलितांवर अन्याय-अत्याचार मोठया प्रमाणावर होत होता. या संदर्भात सुरेश गायकवाड यांच्याकडून सविस्तर माहिती मिळू लागली. सुरेश गायकवाडांचा आमच्या नगरातील पहिला मित्र म्हणजे नितीन कावळे सोबत मीही सुरेश गायकवाड बरोबर बराच वेळ राहू लागलो होतो.सुरेश गायकवाड नितीन कावळे व मी एकदा कोठारीला नितीन कावळे च्या शेतात जांभुळ खाण्यासाठी गेलो होतो .ती आठवण मी आजही विसरू शकलो नाही .
तत्कालीन दलित समाजाच्या परिस्थितीवर सुरेश गायकवाड हे अत्यंत प्रभावीपणे आपली मते व्यक्त करीत .दलित समाजाची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे.अश्या परिस्थितीत दलित समाजावरील तरुणांनी स्वस्त बसून चालणार नाही ,त्याने समाजासाठी कांहितरी केलंच पाहिजे.अशी त्यांची कळकळ असे .मी वयाने लहान असूनही त्या काळात सुरेश गायकवाड यांच्या सहवासात राहू लागलो .त्यांच्यामुळे मला गौतम बुद्ध, महात्मा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची ओळख झाली.
एका बैठकीत एक प्रसंग मी आजही विसरू शकलो नाही.ते मला म्हणाले की,"तुझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी नोकरीचा विचार न करता चळवळीला वाहुन घेतले पाहिजे". मी ते विचार माझ्या काळजात कोरून ठेवले .पुढे चालून प्रथम श्रेणीत दोन पदव्या प्राप्त करूनही नौकरीसाठी साधा अर्जही कुठे पाठविलेला नाही.माझ्या परीने आजही मी कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहे.
मी चळवळीत योगायोगाने आलेलो नाही.तर जाणून बुजून ठरवून आलो आहे आणि ह्या मागची प्रेरणा होती ती मात्र सुरेश गायकवाड यांची .त्यांच्यासोबत मी विद्यापीठ नामांतराच्या आंदोलनात सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत सहभागी होतो.विद्यापिठ नामांतर चळवळीच्या काळात 15-15 दिवसाच्या जेल मी सहावेळा भोगला.आज मी त्यांच्या सोबतही नाही,त्यांच्या पक्षातही नाही ,तरी मी त्यांना माझा राजकीय गुरू आजही मानतो.
सुरेश गायकवाड यांच्या सोबत प्रारंभीच्या काळात दलित पँथर मध्ये काम करतांना एक बिन्नीचा कार्यकर्ता म्हणून मी तयार झालो.त्यांनी माझ्यावर "शिशु दलित पँथर" च्या अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली होती.
तन -मन- धनाने काम कसे करायचे, देहभान विसरून ,भूक - तहान विसरून कसे कामं करायचे, हे आम्ही त्यांच्याकडूनच शिकलो.त्यांच्या सोबत वीस- वीस किलोमीटर रात्र आहे की दिवस आहे ,हे न पाहता पायी फिरण्याचा अनुभव घेतला.याच दरम्यान माझा वैचारिक पायाही त्यांच्यामुळेच मजबूत होत गेला.
पहिल्यांदा मी 1977 ला दलित पँथर च्या मोर्च्यासाठी सुरेशदादा गायकवाड सोबत मुंबईला गेलो,तेव्हा मी हाफ चड्डीवर होतो.वय होत चौदा वर्ष. मुंबईत मोर्च्यावर लाठीमार झाला.माझी व किनवट च्या पँथरची फाटाफूट झाली,तेंव्हा माझे काय होईल ? या काळजीने सबंध रात्रभर ते बेचैन झाले होते.एका पोलीस स्टेशन मधून अर्ध्यारात्रीनंतर माझी माहिती कळाल्यावर व माझी प्रत्यक्षात मनमाड रेल्वे स्टेशन भेटझाल्यावर वर त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.कार्यकर्त्यांची जीवापाड काळजी घेणारे हे त्यांचे रूप अजुनही मी विसरु शकत नाही.
तसा मी एक छोटासा कार्यकर्ता आहे.परंतु, आज जो काही आहे तो सुरेशदादा गायकवाड यांच्या मुळेच आहे.कार्यकर्ते निर्माण करण्याचे विद्यापीठ म्हणुन सुरेशदादा गायकवाड यांचे नाव घ्यावे लागेल. किनवट च्या पॅंथर चळवळीचे मंतरलेले ते दिवस आजही कार्यकर्ते विसरणार नाहीत.किनवटची आंबेडकरी चळवळ सुरेश गायकवाड यांच्या नावाशिवाय पुढे जाऊच शकत नाही.त्यांच्या 63 व्या वाढदिवसा निमित्य त्यांना दिर्घ आयुष्य चिंतीतो !
-ऍड. मिलिंद सर्पे,किनवट
No comments:
Post a Comment