- Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday, 19 July 2020


नांदेड ( उत्तम कानिंदे ) : शिक्षक संवर्गाची मोठी संख्या व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांच्या बदल्या करणे खूप जिकरीचे टास्क आहे, तरीही शासनादेशाप्रमाणे शिक्षकांच्या बदल्या करण्याची गरज भासल्यास अतिशय पारदर्शिपणे आणि इन कॅमेरा कौन्सिंलिंगव्दारेच शिक्षकांच्या बदल्या केल्या जातील असे स्पष्ट आश्वासन नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शरद कुलकर्णी व शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी दिले आहे.
          रविवारी ( ता. 19 ) शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्या 2020 संदर्भात चर्चा व धोरण ठरविण्यासाठी शिक्षक संघटनां पदाधिकारी व अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीच्या प्रसंगी मार्गदर्शन करताना नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी व शिक्षण सभापती संजय बेळगे बोलत होते. आज नांदेड जिल्हा परिषदेच्या  यशवंतराव चव्हाण सभागृहात शारीरिक आंतर बाळगून जिल्ह्यातील शिक्षक संघटना पदाधिकारी व अधिकारी यांची  विशेष बैठक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. याप्रसंगी नांदेड जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शरदजी कुलकर्णी, शिक्षण समिती सभापती संजय बेळगे, उप मुख्य कार्यकारी सुधीर ठोंबरे, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, उप शिक्षणाधिकारी बंडू आमदुरकर, उपशिक्षणाधिकारी मल्लीकार्जुन मठपती, अधिक्षक बळीराम येरपूलवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
          शिक्षणाधिकारी (प्रा.) प्रशांत दिग्रसकर यांनी शिक्षक संघटना व अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीच्या आयोजनाची भूमिका व शिक्षकांच्या बदल्यांच्या सर्व शासन निर्णयांबाबत व उचित कार्यवाही व कार्यप्रणालीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले तर उपशिक्षणाधिकारी बंडू अमदूरकर यांनी बैठकीचे सुत्रसंचालन केले.
       शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी आपापल्या संघटनेची भूमिका मांडली. याप्रसंगी संपूर्ण शिक्षण व शिक्षक संवर्गाच्या बदल्यांबाबत इंडियन बहुजन टीचर्स असोसिएशन (इब्टा) म.राज्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे केंद्रीय नांदेड   जिल्हाध्यक्ष बालासाहेब लोणे यांनी खालील व अन्य मुद्दे लिखित व मौखिक स्वरूपात सभागृहांपुढे मांडले,
1) सध्या अख्ख्या विश्वासह देश,राज्य व जिल्ह्यावर कोरोनाचे महासंकट घोंघावत असतांना शिक्षकांच्या बदल्या करणे हे अप्रासंगिक आहे. शिक्षक संवर्गाची व शिक्षक संवर्गात विशेषतः महिलांची ( शिक्षिकांची) मोठी संख्या पाहता बदल्यांसाठी महिला शिक्षिका त्यांचे लहान पाल्य व पती सोबत येणार त्यामुळे अधिकची संख्या वाढणार. कोरोनात शिक्षकांच्या बदल्या करणे हे एका मोठया संकटाला आमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे नांदेड जिपनेही इतर जिपप्रमाणे  कोरोनामुळे नांदेड जिपच्या शिक्षक व सर्व संवर्गाच्या बदल्या पुढे ढकलाव्यात.
2) कोरोनामुळे सध्या शिक्षणासाठी ऑनलाईन प्रणाली अवलंबली जात आहे. शिक्षण ऑनलाईन मात्र शिक्षकांच्या बदल्या ऑफलाईन ही शासनाची भूमिका अनाकलनीय आहे. शिक्षकांच्या बदल्यांसाठी ऑनलाईनच प्रक्रिया अवलंबावी.
3) नांदेड जिपला शिक्षकांच्या बदल्या पुढे ढकलने शक्यच नसेल तर बदल्या कौन्सिलिंगव्दारे संघटनांना विश्वासात घेवून पारदर्शिपणे करण्यात याव्यात.
4) बदल्यां अगोदर अतिरिक्त शिक्षक तथा प्रा.पदवीधर व मुअंच्या रिक्त पदांवर काम करणाऱ्या शिक्षकांचे बदल्यांपुर्वी समायोजन करण्यात यावे.
5) आदिवासी, दुर्गम किनवट व माहूर तालुक्यातील शिक्षक शिक्षिकां बदलीसाठी पात्र असतील तर त्यांच्या स्वेच्छेने विनंती बदली करावी. परंतू त्यांची इच्छा आहे त्या ठिकाणी राहवयाची असेल त्यांना प्रशासकीय बदलीच्या नावाखाली सक्तीने हलवू नये म्हणजे प्रशासकीय बदली करू नये व जे विनंतीने किनवट व माहूरला जाण्यास तयार असतील ह्या सर्व जागा यांच्या संमतीने प्राधान्याने भराव्यात.
 6) सर्व संवर्गाचा होकार/नकार बदल्यापुर्वीच  घेण्यात यावा व त्याप्रमाणे त्यांच्या जागा रिक्त दाखवाव्यात व संवर्ग 1,2 व 3 च्या व दिव्यांग प्रमाणपत्रांची  बदलीपुर्वीच खातरजमा करावी.
7) मागील बदल्यांतील विस्थापितांना न्याय दयावा. कौन्सिलींगमध्ये रिक्त व संभाव्य रिक्त जागां अगोदरच जाहीर कराव्यात
 या व इतर अन्य मागण्यांही प्रशासनापुढे ठेवण्यात आल्या यास अधिकारी व पदाधिकारी यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. बैठक खूपच सकारात्मक व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने निवेदन

यावेळी म.पुरोगामी प्रा.शि.संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष जी.एस.मंगनाळे यांनी बदल्यासंदर्भात मत मांडले. तसेच उपस्थित  विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकारी यांनी ही आपापल्या संघटनेची भूमिका मांडली. महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्यावतीने बदल्यासंदर्भात  राज्यकोषाध्यक्ष बालाजी पांडागळे, जिल्हाध्यक्ष जी.एस.मंगनाळे, विभागिय उपाध्यक्ष बाबुराव माडगे यांनी निवेदन दिले असल्याचे जिल्हाप्रसिध्दीप्रमुख तथा माहुर तालुकाध्यक्ष एस.एस.पाटील व जिल्हासंघटक  सुरेश मोकले यांनी कळविले.

No comments:

Post a Comment

Pages