मी नांदेड जिल्ह्यातल्या किनवटचा. हा भाग डोंगराच्या कुशीत व अरण्याच्या थंडगार वनराईने नटलेला. पण नक्षलवाद व दुर्लक्षाचा शाप कायम कपाळावर मारलेला. अवघ्या पन्नाससाठ घरांचं माझं गाव "भुलजा'. शिक्षणात मी कच्चा नसलो, तरी आत्मविश्वासाच्या अभावाने कायम बॅकबेंचर होतो. बारावीला कमी मार्क्स पडले. "डीएडला नंबर लागला नाही, की शैक्षणिक कारकीर्द संपली' असं काहीसं तत्त्वज्ञान खेड्यामध्ये रुजलेंलं असतं. घरच्यांना समजावून लाडीगोडी लावून कसाबसा बीएला प्रवेश घेतला, पण प्रथम वर्षाला फक्त ४४ टक्के गुण मिळाले आणि ऍग्रिकेट ५३.
"आता कामधंद्याला लागावं' हा वडीलधाऱ्यांचा सल्लाच योग्य वाटला आणि मी घर सोडलं. पुणे गाठलं, बीए पूर्ण केलेलं असलं तरी तिथं त्याची किंमत शून्य होती कारण विद्यापीठाच्या डिग्रींना आता कुठे किंमत राहिली आहे? एका कंपनीत हेल्पर म्हणून लागलो. मीही तिथलं एक यंत्रच झालो. अशा ठिकाणी भावना मारून जगावं लागतं. जगण्याला कुठलीही सुरक्षा नव्हती. या भयंकराच्या दरवाज्यातून आपल्याला बाहेर पडावे लागेल असे सातत्याने वाटत होते आणि बाहेर पडलो पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी औरंगाबादचं विद्यापीठ गाठलं
शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं बाबासाहेबांनी म्हटलं होतं. पण आज शिक्षणात भेसळ सुरू आहे. त्यामुळे हे दूध पिऊन वाघ तयार होत नाहीत तर मांजरं तयार होत असताना डोळ्याने पहात होतो. पण तरीही "शिक्षणाशिवाय पर्याय नाहीच' म्हणून मन लावून अभ्यास केला, उपाशी राहून दिवस काढले. अनेक निराशाजनक घटना घडल्या, पण जीवन हे एक चॅलेंज म्हणून मी स्वीकारलं, जिद्द सोडली नाही. इरेला पेटून एम.ए मराठीला प्रवेश घेतला. मराठी या विषयात विद्यापीठात सर्वप्रथम येत सुवर्णपदक पटकावलं. पुढे पहिल्याच प्रयत्नात "नेट' परीक्षाही पास झालो. पीएच.डीसाठी राजीव गांधी नॅशनल फेलोशिप मिळाली आणि या सर्व अकॅडमीक यशामुळे मला "युजीसी'ची पोस्ट डॉक्टरल रिसर्च फेलोशिप मिळाली आणि मी पोस्ट डॉक्टरलचे संशोधन कार्यही पूर्ण केले.
त्यादरम्यान अनेक महाविद्यालयांमध्ये मुलाखती देऊन आलो, पण पन्नास लाखांची मागणी केली जायची. तेवढे पैसे तर मी कधीच जमवू शकत नव्हतो. शेवटी ग्रांटेड नाही तर निदान कुठे सीएचबी तरी करावी म्हणून मी औरंगाबादच्या एका प्रसिद्ध महाविद्यालयात मुलाखतीला गेलो. मुलाखतातीत मला प्रश्न विचारला, सध्या काय करता? मी सांगितलं,"पोस्ट डॉक्टरल रिसर्च' केलयं... पोस्ट डॉक्टरल रिसर्च म्हणजे डबल पीएचडी का? पोस्ट डॉक्टरल म्हणजे डी लिट का? की एम फील? असे उपप्रश्न विचारण्यात आले. मी माझ्या पद्धतीने त्यांना पोस्ट डॉक्टरल म्हणजे काय हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु अशी कुठलीही अकॅडमीक डिग्री नसते यावर त्या सर्वांचं एकमत झाले आणि मी सीएचबीसाठीदेखील अपात्र ठरलो. मी खूप निराश झालो. एवढं शिकून आपण सीएचबीसाठीही पात्र ठरत नाही. एवढा संघर्ष, एवढं शिक्षण... सगळं वाया गेलं, असे एकवेळ वाटले खरे पण मी हे असेच वाया जाऊ देणार नाही. "अशक्य काहीच नाही' हा आत्मविश्वास आता माझ्याकडे आहे आणि तो मला याच शिक्षणाने दिला आहे.
No comments:
Post a Comment