[प्रबोधन चळवळीत कवी गायक व शाहीराचे योगदान...
शाहीर अण्णाभाऊ साठे जयंती ते लोककवी वामनदादा कर्डक जयंती निमित्त क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचा विशेष उपक्रम देत आहोत.. संपादक]
भाग - ७.
गायिका मंगला विठ्ठलराव कावळे यांचा जन्म तिवसाळा (माहेर) या गावी ४जुलै १९७६ साली झाला. त्यांचे शिक्षण बी.ए. पर्यंत झाले. कोपरा (सासर)येथे त्या अंगणवाडी कार्यकर्ती म्हणून कार्यरत आहेत.
लहानपणी चौथ्या वर्गात असतांना त्याचे तत्कालिन शिक्षक श्री भोयर सर कविता म्हणायला लावत. ईतर मुलींबरोबर कविता सादर करतांना त्यांचा गोड आवाज ऐकून तु चांगली गायिका सिंगर होशील असे भाकीत केले होते. शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात गीतं गाता गाता गायणाची आवड निर्माण झाली. नंतर बुद्ध जयंती, भीम जयंती, धम्मचक्र प्रवर्तन दिन, महापरिनिर्वाण दिन साजरे होतांना महापुरुषांच्या विचारांची गाणी प्रसन्न मनाने कार्यक्रमात गायाला सुरुवात केली . रसिकांची दाद मिळाली त्यामुळे या गायण क्षेत्रात भरारी घ्यावी व समाज प्रबोधनाचे कार्य करावे असे मनाला वाटले.मग काय आवड निर्माण झाली व सवड मिळाली.
त्यांचे पती डॉ.विठ्ठलराव कावळे यांनाही गायणाची आवड असल्यांने त्यांचेही प्रोत्साहन मिळाले. वर्ष २००१पासुन प्रबोधनाच्या चळवळीत त्या काम करतात. महाराष्ट्रातील नांदेड, मुंबई,पुणे, नागपूर, भंडारा, गोंदिया ई .जिल्ह्यात तसेच उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश,छत्तीसगड या इतर राज्यातही जाऊन तथागत गौतम बुद्ध, माता रमाई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले संत कबीर, सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची पेरणी केली. किनवट व माहुर परिसरातील विहारातील वर्षावास कार्यक्रम असो की धम्म परीषद असो त्या ठिकाणी संचासह जाऊन निस्वार्थीपणे गीत गाऊन प्रबोधन केले. अनेक कार्यक्रमात संगीत साथ माधव मुनेश्वर, बँजो-उत्तम रावळे, तबला-सिद्धोधन कदम, तसेच चावरे गुरुजी व चिंतोरे याची साथ असायची.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक विष्णु शिंदे, दत्ता शिंदे, अशोक निकाळजे, सार्थक शिंदे, प्रकाशनाथ पाटनकर इत्यादी नामवंत गायकासमवेत गीत गायणाची संधी मंगला कावळे यांना मिळाली. प्रकाशनाथ पाटनकर किनवटला आले तेंव्हा मंगला कावळे यांनी त्यांची भेट घेतली. त्यांना कव्वाली, भक्तीगीत, ठुमका, सुगम गीत गाऊन दाखवले तेंव्हां त्यांनी तुमच्यात गायण कलेतील सर्व गुण आहेत अशी प्रशंसा करून गीत गायणाची संधी दिली.समाज प्रबोधनासाठी गायिकांनी पुढं आले पाहिजे,प्रभावी गायण कसे करायचे, शेर कसा सादर करायचा हे स्टेजवर शाहीर चंद्रकांत धोटे व गायक माधवराव मुनेश्वर यांच्या मार्गदर्शनाने शिकले.असे ते आवर्जून सांगतात.त्यांची 'दीपस्तंभ' ही व्हीडिओ सिडी ही प्रकाशित झाली.शिवाय 'समाजाचं काय ' या अनिरुद्ध शेवाळे यांच्या सिडीमध्ये ही गायण केले आहे.त्यांचा बुद्ध भीम गीते हा गीत संग्रह प्रकाशित आहे. प्रबोधनाच्या क्षेत्रात आज नामवंत गायिका म्हणुन नाव झाल्याचे समाधान त्या व्यक्त करतात.
मनपसंत गीते-
१)एक संध्या निळ्या पाखराची .
२)ऐसा है जबरदस्त मेरे भीम का संविधान.
३)कवी आशिष मंजूर यांची कव्वाली-एकता दिखावो,सुनो बहुजनो.
४)रमाई रमाई,माझे रमाई.
५)पत्रात लिहते मी रमा.
पुरस्कार-
१)स्वर्गीय इंदिरा गांधी पुरस्कार, नागपूर.
२)समाज प्रबोधन गौरव पुरस्कार, चंद्रपुर.निळु फुले यांच्या हस्ते.
३) वामनदादा कर्डक संगीत पुरस्कार इंद.रवेली.
४) सावित्रीबाई फुले पुरस्कार,दिल्ली.
संदेश-
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांने समाज चालावा,काळ कठिण आहे समाज सतर्क, जागृत झाला पाहिजे, संघटीत राहीले पाहिजे ,सत्ते शिवाय शहानपण नाही म्हणून समाज सत्तेत गेला पाहिजे असं.मंगला कावळे तळमळीने सांगतात.
गायिका मंगला विठ्ठलराव कावळे यांचे नाव या गायण क्षेत्रात आजुन चमकावं ,गाजावं ही मंगल कामना करुन हार्दिक शुभेच्छा देतो.
- आयु. महेंद्र नरवाडे
किनवट, नांदेड.
मो.न.९४२१७६८६५०.
No comments:
Post a Comment