वामनदादाच्या प्रबोधनाने आंबेडकरी चळवळ गतिमान झाली.. महेंद्र नरवाडे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 14 August 2020

वामनदादाच्या प्रबोधनाने आंबेडकरी चळवळ गतिमान झाली.. महेंद्र नरवाडे


१५ ऑगस्ट : महाकवी वामनदादा कर्डक जयंती निमित्त सांगावाकार महेंद्र नरवाडे यांचा लेख देत आहोत.. संपादक

वामनदादाच्या प्रबोधनाने आंबेडकरी चळवळ गतिमान झाली..


    लोककवी वामनदादा कर्डक यांचा जन्म १५ ॲागष्ट १९२२ साली नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील देशवंडी या गावी झाला. वडीलाचे नाव तबाजी व आईचे नाव सईबाई. वामनदादाचा आवाज गोड होता तमाशातील गाणे ऐकुन त्यांना गाणे गाण्याची आवड निर्माण झाली.आपल्या मोहल्यात फिरुन गाणे गात असत.अशातच शाहीर घेंगडे यांचा नाशिक सत्यागृहाचा पोवाडा ऐकला आणि त्यांच्यातील गीत लेखणाचे स्फुलिंग चेतले.१९४३पासुन ते गीतं लिहु लागले आणि गाऊ लागले.हे काम त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत चालुच होते.

     डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी१९२०नंतर सार्वजनिक जीवनाला सुरुवात केली होती.त्यांनी विषम व्यवस्थेच्या विरोधात समतेसाठी अनेक लढे उभारले होते.महाडचा चवदार तळे सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन,काळाराम मंदिर प्रवेश, इ.विद्वान डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना उचनिचता, जातियता, भेदभाव मान्य नव्हता.या विरोधात त्यांनी बंड पुकारले होते माणसाला माणुस म्हणुन जगु दिले जात नव्हते.या विरोधात लढा देण्यासाठी समता सैनिक दल स्थापन केले त्या समता सैनिक दलात वामन दादांनी काम केले.नंतर संविधान निर्मिती ,शिक्षण संस्थेचे कार्य व धर्मांतर .या दरम्यान बाबासाहेब आंबेडकर आणि वामनदादा यांच्या अनेक वेळा भेटी झाल्या.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला.त्यांचे एक एक कार्य वामनदादा कर्डक यांनी आपल्या गाण्याचा विषय बनवुन आपल्या प्रतिभेच्या जोरावर हजारो गाणे लिहले.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणा नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीला आपल्या प्रबोधनाने गतीमान केले.खेड्यापाड्यात समाज विखुरला होता रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट तयार झाले अशावेळी वामनदादा कर्डक आपल्या गीताच्या माध्यमातून समाजाला सांगत-

"तुम्हा सांगु किती दादा,एकतेने इथे नांदा".,
"भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते, तलवारीच्या तयांच्या न्यारेच टोक असते,"
"माणसा इथे मी, तुझे गीत गावे,असे गीत गावे,तुझे हीत व्हावे."
   "भीमा तुझ्या महुला , जाऊन काल आलो,
तु जन्मल्या ठिकाणी जाऊन काल आलो."

अशाप्रकारे वामनदादा यांनी गावोगावी,शहरोशहरी जाऊन  आंबेडकरी विचार पेरण्याचे काम केले.आपल्या पहाडी आवाजात वामनदादा कर्डक स्वतंत्र चालीवरची सहज सोप्या भाषेतील गीतं समाजासमोर गात असत.त्यांची गाणी खेडोपाडी आजही जुण्या व नव्या पिढीतील गायक कलावंत त्यांच्याच शैलीत गातांना दिसतात. असं एकही गाव नाही जीथं वामनचं नाव नाही.

"तुझे गीत वामन जिथे जात आहे, 
कुणी ते तिथे गात आहे."
वामनदादा च्या नंतर अनेक शाहीर गीतकार झाले पण सदाबहार वामनवाणी आजही लोकांच्या ओठांवर आहे.वामनदादा कर्डक बुद्ध, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा अखंड वाहता झरा झाले.वामनदादा जिथे गेले तिथे त्यांचे शिष्य तयार झाले.
लेखनीला वामनच्या
भीमस्फुरतीचे बळ होते|
वाणीतील त्या शब्दांचे
गीतांचे मोहोळ होते||

प्रा.रविचंद्र हडसनकर सरांनी त्यांची जीवनगाथा "माझ्या जीवनाचं गाणं" या चरीत्रातुन समाजासमोर ठेवली आहे.तर त्यांची अक्षरगाथा प्रा.सागर जाधव सर यांनी १०,०००च्या वर गीताच्या संग्रहातुन लोकांसमोर उजागर केली आहे.डाँ.यशवंत मनोहर यांनी आंबेडकरवादी महागीतकार वामनदादा कर्डक या नावाने लेख संग्रह,  प्रा.अशोककुमार दवने यांनीही वामनदादा कर्डक यांची गीते असलेला"मोहोळ"हा ७३गीतांचा संग्रह प्रकाशित केला.तसेच कवयित्री सुजाता पोपुलवार यांनी महाकवी वामनदादा कर्डक एक गाणं हा दिर्घ काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे.मी माझा "शब्दशिल्प"हा चारोळी संग्रह वामनदादा कर्डक यांच्या मधाळ वाणीतुन रसाळ गाण्यात प्रकट झालेल्या  विशाल काव्यप्रतिभेस अर्पण केला आहे.

वामनदादा कर्डक यांची गाणी  बुद्धाचा संदेश देतात तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची महती सांगतात.म्हणुन म्हणावेसे वाटते वामनदादाच्या प्रबोधनाने आंबेडकरी चळवळ गतिमान झाली.

आयु.महेंद्र नरवाडे, किनवट
जि.नांदेड.मो.न.९४२१७६८६५०

No comments:

Post a Comment

Pages