नागपूर, ता. ३ प्रतिनिधी : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकीकडे प्रशासनीक स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. तर दुसरीकडे वैद्यकीय चमू अहोरात्र सेवा देत आहे. नागपूर शहरात कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता शहरातील काही खाजगी रुग्णालयांमध्येही कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी नागपूर महानगरपालिकेतर्फे देण्यात आली आहे. यासंबंधी महापालिकेद्वारे दिशानिर्देशही जारी करण्यात आले आहेत. मात्र या खाजगी रुग्णालयांमध्ये सेवाकार्य बजावणाऱ्या वैद्यकीय कर्मचा-यांना प्रशासनाच्या नियमाप्रमाणे वेतन व इतर सुविधा देण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. मेडिकल चौकातील ऑरियस इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये कर्मचाऱ्यांना रूग्णालय प्रशासनाच्या अशा वागणूकीचा फटका बसत आहे. यासंबंधी दखल घेउन मनपाच्या दिशानिर्देशांचे उल्लंघन करण्यात येत असल्याच्या प्रकाराची चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी समता सैनिक दल दीक्षाभूमी मुख्यालय मार्फत मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केली आहे. समता सैनिक दलामार्फत अनिकेत कुत्तरमारे यांनी मनपा आयुक्तांना सदर मागणीचे निवेदन दिले.
शहरात कोरोनाशी लढा देताना शासकीय आणि खाजगी रुग्णालय अहोरात्र सेवा देत आहेत. खाजगी रुग्णालयांमधील वैद्यकीय कर्मचारी बजावत असलेल्या सेवेच्या तुलनेत त्यांना कोणत्याही प्रकारचे सुरक्षाकवच नाही. महानगरपालिकेतर्फे जारी करण्यात आलेल्या दिशानिर्देशामध्ये कर्मचा-यांच्या सुरक्षेचीही तरतूद करण्यात आली आहे. मात्र कर्मचा-यांना वेतन, विमा आणि इतर सुविधांपासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा प्रकार पुढे आला. शहरातील ऑरियस इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समधील यासंबंधी समता सैनिक दलाकडे माहिती मिळताच रुग्णालय प्रशासनाला सदर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सहिचे पत्रही देण्यात आले. त्या अर्जावर रुग्णालय प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही.
सदर प्रकाराची दखल घेउन मनपाद्वारे आवश्यक कार्यवाही करण्यात यावी व कर्मचा-यांना न्याय मिळवून देण्यात यावा, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदर कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी गरज पडल्यास न्यायालयीन मार्गानेही लढा देउ व लोकतांत्रिक मार्गाने आंदोलन करू, असा इशाराही समता सैनिक दल मार्फत रुग्णालय प्रशासनाला देण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment