सामाजिक न्याय विभागाने विद्यार्थ्यांवर अन्याय करू नये - सिद्धार्थ मोकळे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 21 September 2020

सामाजिक न्याय विभागाने विद्यार्थ्यांवर अन्याय करू नये - सिद्धार्थ मोकळे

मुंबई प्रतिनिधी:

'राजर्षि शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजनेच्या पात्र विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात दप्तर दिरंगाई करून सामाजिक न्याय विभागाने विद्यार्थ्यांवर अन्याय करू नये', अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी केली आहे. सरकारच्या या दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महाराष्ट्र सरकारने वर्ष २०२०-२१ साठी पहिल्यांदा या शिष्यवृत्तीची जाहिरात ५ मे २०२० रोजी काढली होती. परंतु आज दि. १९ सप्टेंबर २०२० येऊन सुद्धा निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध केलेली नाही. अनेक परदेशी विद्यापीठांचे अभ्यासक्रम सुरू झाले असून शासनाच्या या दप्तर दिरंगाईमुळे पात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणीक वर्ष वाया जाऊ शकते. यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना इमेलद्वारे निवेदन पाठवले असून तातडीने यादी प्रसिद्ध करण्याची मागणी केली आहे.

'पात्र विद्यार्थ्यांना यादी प्रसिद्ध झाल्यानंतर परदेशी विद्यापीठात प्रवेशासाठी करावी लागणारी प्रक्रिया आणि संबंधित देशात जाण्यासाठी व्हिसा मिळविण्यासाठी किमान एक ते दीड महिन्याचा कालावधी लागतो. हा पुढील प्रक्रियेसाठी लागणारा कालावधी माहीत असूनही सामाजिक न्याय विभागाकडून यादी प्रसिद्ध करण्यास हा अक्षम्य विलंब का लागत आहे?' असा सवाल सिद्धार्थ मोकळे यांनी विचारला आहे. एकप्रकारे या विद्यार्थ्यांना शेवटच्या क्षणी परदेशी विद्यापीठात प्रवेश घेण्यापासून वंचित ठेवण्याची शासनाची मानसिकता तर नाही ना अशी शंका आता उपस्थित होऊ लागल्याचा आरोपही त्यांनी सरकारवर केला आहे.

'पात्र विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यासाठी होणारी दिरंगाई बघता या योजनेचे कोर्सेस मधे, किंवा निकषांमध्ये शेवटच्या क्षणी बदल होण्याची शंकाही काही विद्यार्थ्यांनी उपस्थित केली आहे. यापूर्वीचा अनुभव पाहता विद्यार्थ्यांची शंका खरी ठरण्याचीच शक्यता अधिक वाटते. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही मागणी करतो की शासनाने आता आणखी वेळ न दवडता पात्र विद्यार्थ्यांची यादी कोणताही नवा घोळ न घालता तातडीने प्रकाशित करावी. प्रत्येकच गोष्टीसाठी विद्यार्थ्यांवर आंदोलनाची भूमिका घेण्याची वेळ आणू नये.' अशी भूमिका निवेदनात मांडण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Pages