"निसर्गाचं हे देणं मह्या मराठवाडीला, झाडी झुडित विसावला हा सावळा मावळा.." मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ऑनलाईन कवी संमेलन रंगले.. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday, 19 September 2020

"निसर्गाचं हे देणं मह्या मराठवाडीला, झाडी झुडित विसावला हा सावळा मावळा.." मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ऑनलाईन कवी संमेलन रंगले..


"निसर्गाचं हे देणं मह्या मराठवाडीला,
झाडी झुडित विसावला हा सावळा मावळा.."

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ऑनलाईन कवी संमेलन रंगले..

कविता मना मनातल्या : अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंचचा उपक्रम !

नांदेड ( प्रतिनिधी ) :
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंच महाराष्ट्र शाखा नांदेड च्या वतीने ऑनलाइन कवी संमेलन रंगले. कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक रमेश मुनेश्‍वर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध कवी वीरभद्र मिरेवाड, गझलकार चंद्रकांत कदम, विजय वाठोरे, स्तंभलेखक नासा येवतीकर, सांगावाकार महेंद्र नरवाडे, चित्रकार मिलिंद जाधव, भूमय्या इंदूरवार, रुपेश मुनेश्वर, सूर्यभान खंदारे, कवयत्री विजया तारु होते.

"निसर्गाचं हे देणं मह्या मराठवाडीला,
झाडी झुडित विसावला हा सावळा मावळा..
आमची आदीम जमात भटकंतीत बंजारा,
विविधतेत नटलेला आमचा परिसर सारा.."
कवीसंमेलनाध्यक्ष रमेश मुनेश्वर यांच्या या कवितेने कविसंमेलनात बहार आणली.

यानंतर प्रसिद्ध कवी विरभद्र मिरेवाड यांनी वास्तव कविता सादर करुन वाहवा मिळवली..
"आताशा....
  माझ्या दरवाजापर्यंत येऊन ठेपलंय विषमतेचे भूत....
 दरवाजा लावून घेतलं तरीही खो खो हसतंय..
 मी चित्कार केला तरी
 माझाही आवाज हवेत विरून जाईल ..
पलीकडच्या आळीत..."

यानंतर प्रसिद्ध गझलकार संमित्र चंद्रकांत कदम यांनी बहारदार गेय गझल सादर केली..
"आहे जसा अगोदर होता मराठवाडा,
अवघ्या गुणीजनांचा खोपा मराठवाडा..
जपतो इमानदारी अप्रूप ना कशाचे
आहे नभाहूनीही मोठा मराठवाडा.. "

सांगावाकार महेंद्र नरवाडे यांनी गेयरचना सादर करून संघटीत होण्याची साद घातली..
"रंग वेगळे, ढंग वेगळे
कुठवर आता रांदायचं
एकीनं सारे नांदायचं....
जाती अनेक, पंथ अनेक
कुठवर सांगत हिंडायचं
एकीनं सारे नांदायचं..."

विजया तारू या कवयित्रीने स्त्रीभ्रूण हत्या संदर्भात कविता सादर करून दाद मिळविली..
"स्त्रीच स्त्रीची हत्या करते
समाज आरोप लावत आहे,
त्यालाच फटकारण्याची वेळ
स्त्री शक्तीवर आली आहे.."

स्तंभलेखक नासा येवतीकर यांनी शिक्षक विद्यार्थी यांचं नातं सांगणारे कविता सादर केली..
"शाळेतल्या मुलांचा लागला होता असा लळा,
सोडून जातांना त्यांना भरून आलंय गळा..
डोळे होते त्यांचे ही पाण्याने डबडबलेले,
नकळत माझ्या ही डोळ्यातून अश्रू गळाले.."

रुपेश मुनेश्वर या कविनी शेतकऱ्याचं वास्तव चीत्र रेखाटणारी गेय कविता सादर करून दाद मिळवली..
"भल्या पहाटेच्या पारी,
जवा झुंजू मुंजू होई..
महा बाप शेतकरी,
शेत नांगराले जाई..''

भूमय्या इंदूरवार यांनी प्रेमाची गझल सादर करून वाहवा मिळवली..
"प्रेमात कुणाच्या मी, पडलो कधीच नाही
पायांत अडकूनि पाय, पडलो कधीच नाही..
आलेत कितीक संधी,  नि गेल्या तशाच निघूनी ,
पायांत घालूनि मुंडके, रडलो कधीच नाही.."

कविमित्र विजय वाठोरे, व सूर्यभान खंदारे यांनीही जबरदस्त रचना सादर केली. कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन मिलिंद जाधव यांनी केले, रुपेश मुनेश्वर या तंत्रस्नेही शिक्षकांनी प्रस्तावना केली तर विरभद्र मिरेवाड यांनी आभार मानले. गुगल मिट व्दारे झालेल्या या कार्यक्रमास बहूसंख्य श्रोते ऑनलाईन उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages