●● न सरे ऐसे आ.हं.चे दान...! ●●
(ख्यातनाम प्राच्यविद्यापंडित डॉ.आ.ह.साळुंखे सरांच्या ७८ व्या वाढदिवसानिमित्ताने....)
"मूळ धर्मशास्त्राचं विवेचन करुन त्यांनी (आ.हं.नी) निर्माण केलेलं साहित्य महत्त्वाचं आहे. पां.वा.काण्यांचा अपवाद वगळता कोणीही त्या क्षमतेनं काम केलेलं नाही..."
--- सत्यशोधक कम्युनिस्ट कॉम्रेड शरद् पाटील.
संस्कृती, धर्म आणि भाषा या विविध क्षेत्रातील आ.हं.चा व्यासंग दांडगा आहे. बहुजनांना बौद्धिक आणि सांस्कृतिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी तथागत गौतम बुद्धांपासून ते फुले, शाहू, आंबेडकरांपर्यंतचा वारसा चालवण्यासाठी त्यांनी आपली उभी हयात आणि प्रतिभा पणाला लावली आणि सध्याच्या परिवर्तनवादी चळवळींना बौद्धिक रसद पुरवण्याचे महत्कार्य त्यांनी केले. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या जीवनकार्यावरील ग्रंथ लिहून विविध पैलूंचे दर्शन घडवले. मनुस्मृतीचे चिकित्सक विश्लेषण केले. भारताचा खरा #सांस्कृतिक_इतिहास समजून घेण्यासाठी भारतीय वाङमयाच्या इतिहासातील #प्रक्षेप दूर करणे किती महत्वाचे आहे हे त्यांनी त्यांच्या संशोधनातून अनेकदा दाखवून दिले आहे. हा सगळा लेखनप्रपंच करताना त्यांनी विवेक कधी ढळू दिला नाही हे त्यांचे विशेष आहे.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी संपादित केलेल्या विश्वकोशामध्ये धर्मशास्त्रावरती आ.हं.नी शंभरावरती लिहिलेले लेख त्यांच्या विद्वत्तेची साक्ष देतात. चार्वाकदर्शन त्यांनी ज्या पद्धतीने घडवून आणले त्याबद्दल भारतीय समाज त्यांचा कायम ऋणी राहिल. 'चांदण्यात भिजायचं राहून जाऊ नये म्हणुन!', 'त्यांना सावलीत वाढवू नका!', 'मन निरभ्र व्हावं' यांसारख्या त्यांच्या साहित्यकृतींनी जीवन अधिक उत्कटतेनं जगायला शिकवलं. त्यांचं सगळं लेखन हे शोषणाकडून शोषणरहित अवस्थेकडे परिवर्तन करायला लावणारे आहे...
२०१० साली डॉ.विद्याधर औटी संपादित 'मराठा जात आणि समाजपरिवर्तन' हे पुस्तक वाचायला मिळालं. त्यामध्ये आ.हं.नी लिहिलेला 'सत्ता गेली हीच मराठा समाजाला सुवर्णसंधी' या नावाचा लेख वाचला... पुन्हा पुन्हा वाचला... तेव्हा आत्मटीका काय करु शकते याचा प्रत्यय आला. मराठा समाजाने राजकारणाखेरीज इतर क्षेत्रांकडे वळून तेथे कर्तबगारी दाखवावी अशा आशयाचा तो लेख होता... या लेखाच्या वाचनानंतर मी आ.हं.च्या साहित्याकडे वळालो ते आजतागायत त्यांच्या समग्र साहित्याचे पुन्हा पुन्हा वाचन करतो आहे.
त्यांच्याकडून मी 'अनिष्ठाचा नकार आणि उत्तमाची नवनिर्मिती यांचे आपल्या जीवनात सहअस्तित्व असावे' हा धडा शिकलो...
मला सांगायला अत्यानंद होतो आहे की आ.हं.नी शिवधर्माची ज्याप्रमाणे मांडणी केली त्याप्रमाणे कवठेमहांकाळ तालुक्यातील #पहिला_शिवधर्म_विवाह हा माझ्या मोठ्या बहिनीचा आम्ही केला...
आक्षेपकांचा आदर राखून प्रतिवाद कसा मांडावा, याचा सर्वोच्च आदर्श आ.हं.नी निर्माण केलेला आहे. (उदाहरणादाखल पाहा- वादांची वादळे)
अशा या शांतपणे उत्पात घडवणाऱ्या आ.हं.ना त्यांच्या या ७८व्या वाढदिवासानिमित्त त्यांना आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो आणि सांस्कृतिक इतिहासाच्या पुनर्मांडणीचं काम असंच वाढत राहो इतकीच सदिच्छा व्यक्त करतो...
#HappyB'day_तात्या
- हरिप्रसाद पवार, कवठेमहांकाळ (सांगली)
(७०२०४८९७६४, ७०५७८४८०७०)
No comments:
Post a Comment