स्त्रीमुक्तीचे समर्थक बाबासाहेब आणि हिंदुकोडबील- अरविंद वाघमारे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 18 October 2020

स्त्रीमुक्तीचे समर्थक बाबासाहेब आणि हिंदुकोडबील- अरविंद वाघमारे

 अर्थतज्ञ डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे स्त्री मुक्तीचे समर्थक होते,त्यांच्यामते कोणत्याही समाजाचे मूल्यमापन करायचे झाल्यास,त्या समाजातील स्त्रियांची परिस्थिती कशी आहे यावरून करता येते,प्रत्येकाने आपल्या घरातील स्त्रियांना शिक्षणाची संधी द्यायला हवी, शिक्षणामुळे स्त्रिया बिघडतात हा विचार सगळ्यांनी मनातून बाद केला पाहिजे,ब्राह्मणांच्या मुली जितक्या शिकतील तितक्या इतर समाजाच्या मुली ही शिकल्या पाहिजेत, आई-वडिलांनी बालपणापासूनच मुलांच्या शिक्षणावर लक्ष द्यायला हवे,असे विचार ते नेहमी मांडत असत,बाबासाहेबानी औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करून,मुलींना ही प्रवेश दिला.


इथल्या व्यवस्थेसोबत दोन हात करताना बाबासाहेबांना स्त्रियांवरील अन्याय-अत्याचार व पितृसत्ताक संस्कृतीचा असलेला दबाव ही लक्षात येत होता,स्रियांच्या मनाविरुद्ध झालेले विवाह आणि सारखी लादली जाणारी बाळंतपणे याचा ही परिणाम लक्षात येत होता,ही परिस्थिती बदलण्याचे साधन म्हणजे "शिक्षण"च आहे,यावर बाबासाहेबांचा विश्वास होता.


बाबासाहेब मजुरमंत्री असताना त्यांनी स्त्रीसक्षमीकरणासाठी बरेच निर्णय घेतले,यात, खाण कामगार स्त्रीला प्रसूती भत्ता, तसेच  बहूपत्नीत्वाच्या प्रथेला पायबंद, मजूर व कष्टकरी स्त्रियांसाठी २१ दिवसांची किरकोळ रजा,एका महिन्याची हक्काची रजा,स्त्री खाण कामगारांना पुरुषांईतकीच मजुरी,दुखापत झाल्यास नुकसान भरपाई आणि महत्वाचं म्हणजे २० वर्षांची सेवा झाल्यावर निवृत्त वेतनाची तरतूदही बाबासाहेबानी केली होती, कामगार स्त्रीला प्रसुती रजा देणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे जगातील एकमेव व्यक्ती आहेत,त्यांच्या नंतर इतर देशातील महिलांना प्रसूती रजा मंजूर करण्यात आल्या.


कायदेमंत्री असताना बाबासाहेबानी १९४७ साली, हिंदू संहिता विधायक म्हणजेच  हिंदू कोडबीलाचा प्रस्ताव लोकसभेत मांडला, यात  लग्नसंबंधातील स्त्रीपुरुष  समानता, स्त्रियांना काडीमोड घेण्याचा अधिकार तसेच वारसाहक्कांचा_लाभ या तत्वाचा समावेश होता, त्यावेळचे प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांनी कायदामंत्री बाबासाहेब आंबेडकर यांना हिंदू वैयक्तिक कायद्यास एक समान नागरी कायद्याच्या दृष्टीने पहिले पाऊल म्हणून काम करण्याची जबाबदारी दिली,बाबासाहेबांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली,ज्यात जी.आर.राजगोपाल, के.के.भंडारकर,इस,व्ही, गुप्ते, के.वाय.भांडारकर होते.१९४७ ला विधानसभेत सादर केलेल्या मसुद्यात समितीने किरकोळ बदल केले,पण संविधान सभेसमोर विधेयक ठेवण्याअगोदर हिंदू जनजागृतीच्या नेत्यांनी "हिंदू धर्म धोक्यात आहे" अशी गरळ ओकणे सुरू केले, बाबासाहेबानी १९४७ पासून अविरत मेहनत घेत, सतत ४ वर्षे १ महिना व २६ दिवस कष्ट करून हिंदू कोडबील तयार केले, ५ फेब्रुवारी १९५१ ला ते संसदेत मांडले,पण काही हिंदू सदस्यांनी,लोकसभा सत्तेतील व विरोधी पक्षातील सनातन्यांकडून प्रचंड विरोध झाला,ज्यांनी पूर्वी मंत्रिमंडळात मंजुरी दिली होती ते ही विरोधात उतरले, यात भारताचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद,गृहमंत्री वल्लभभाई पटेल,श्याम प्रसाद मुखर्जी,हिंदू महासभेचे सदस्य मदन मोहन मालवीय यांनी या बिलाला जोरदार विरोध केला.


हे बिल सात वेगवेगळ्या घटकांशी संबंधित होते व या घटकांशी निगडित कायद्यांचे कलमात रूपांतर होणार होते,ते खालील प्रमाणे आहेत

१) जो व्यक्ती मृत्यपत्र न करता  मृत पावली असेल अशा मृत हिंदूव्यक्तीच्या(स्त्री आणि पुरुष दोघेही) मालमत्तेच्या हक्काबाबाबत..

२) विवाह

३) दत्तक विधान

४) घटस्फोट

५) पोटगी

६) अज्ञानत्व व पालकत्व


या बिलातील घटस्फोट,द्वीपत्नी कलमाना प्रचंड विरोध झाला,बाबासाहेब एकटेच लढत होते,पण सत्र संपताना केवळ चार कलमेच मंजूर झाली.सती प्रतिबंधक कायदा आणि हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा असे कायद्याचे खिळखिळे स्वरूप झाले. या निर्णयाने बाबासाहेब दुःखी आणि व्यतिथ झाले,त्यांनी २७ सप्टेंबर १९५१ रोजी आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला..स्त्रियांनो मला असा एकतरी नेता किंवा पुढारी दाखवा ज्यांनी तुमच्या हक्कासाठी आपल्या मंत्रिपदाचा त्याग केला.


पुढे १९५५-५६ मध्ये नेहरूंनी हिंदुकोडबीलाचे चार वेगवेगळे भाग करून हे चार ही कायदे वेगवेगळ्या वेळी मंजूर करून घेतले ते खालील प्रमाणे..

१) हिंदू वारसाहक्क कायदा

२) हिंदू विवाह कायदा

३) हिंदू अज्ञान व पालकत्व कायदा

४) हिंदू दत्तक व पोटगी कायदा 

इथे एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की, बाबासाहेब कायदेमंत्री पदाचा राजीनामा देताना हिंदू कोडबीलाविषयी म्हणाले की,समाजातील वर्गा-वर्गातील व स्त्री-पुरुष यांच्यातील असमानता,तशीच अस्पर्शीत राहून देऊन,आर्थिक समस्यांशी निगडित कायदे संमत करीत जाणे, म्हणजे आमच्या संविधानाची चेष्टा करणे आणि शेणाच्या ढिगाऱ्यावर राजमहाल बांधण्यासारखे होय" 


उगाच आचार्य अत्रे हिंदू कोडबीला विषयी लिहीत नाहीत की,हे बिल मान्य झाले असते तर हिंदू समाजातील विषमता नष्ट होऊन हिंदू समाज बलशाली झाला असता,पण दुर्दैव भारताचे आणि हिंदुसमाजाचे की, डॉ.आंबेडकरांनी पुढे केलेला हात,हिंदू समाजाने झिडकारला,आणि स्वतःचा घात करून घेतला..


शेवटी एकच म्हणेन की,बाबासाहेब आंबेडकर हे नाव ऐकताच ज्या स्त्रियां नाकतोंड वाकडे करतात त्यांना बाबासाहेब त्याकाळात कोठे पहात होते व आज तुम्ही कोठे आहात याचा विचार सद्सदविवेकबुद्धीने करावा.

No comments:

Post a Comment

Pages