डॉ.बबाबासाहेब आंबेडकरांचा विनोदी स्वभाव-अरविंद वाघमारे - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 18 October 2020

डॉ.बबाबासाहेब आंबेडकरांचा विनोदी स्वभाव-अरविंद वाघमारे

 



वरचं शीर्षक वाचून थोडं गोंधळल्या सारख वाटलं असेल ना? कारण अर्थतज्ञ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जनमाणसात जी प्रतिमा आहे ती गंभीरपणाची आणि सतत अभ्यास करणारी आहे.पण बाबासाहेबांच्या जीवनाचा बारकाईने अभ्यास केला तर गंभीरपणा,गमतीदार व विनोदी स्वभावाचा संगम आपल्याला दिसून येईल,माईसाहेब आंबेडकरांनी त्यांच्या पुस्तकात बरेच किस्से सांगितले आहेत, बाबासाहेबांचे विनोद हे मार्मिक आणि त्यांच्या तत्पर बुद्धीचे दर्शन घडवायचे.


एकदा काँग्रेसला उद्देशून बाबासाहेब म्हणाले, ‘काँग्रेसच्या स्त्रिया महारवाड्यात जाऊन आमच्या स्त्रियांच्या डोक्यातील उवा काढतात, त्यांचे कपडे धुतात, त्यांच्या मुलांना न्हाऊ घालतात,नुकतेच काँग्रेसच्या स्त्रियांनी पुण्यातील मांग वाड्यात जाऊन मांगवाड्यातील मुलांना दूध पाजले,पण दुसर्‍या दिवशी त्या मुलांना हगवण लागली अशी बामती उठली.अर्थात सहजपणे विनोद निर्मिती करून त्यांनी विशिष्ट प्रवृत्तीचे दर्शन घडविले होते. तसेच बाबासाहेब हे राष्ट्रध्वज समितीचे सदस्य होते 10 जुलै 1947 रोजी बाबासाहेब समितीच्या मिटिंगला दिल्लीला जायला निघाले होते, ते विमानात बसतेवेळी हिंदू महासभेचे पुढारी तेथे आले व त्यांनी बाबासाहेबांना भगवा ध्वज दिला,व आपला राष्ट्रध्वज भगव्या रंगाचा असावा यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली. तेव्हा बाबासाहेब म्हणाले, एका महाराच्या मुलाकडून घटना समितीवर भगवा ध्वज लावण्याची अपेक्षा तुम्ही करता आहात नाही का? बाबासाहेबांच्या विनोदातले हे शब्द विचार करायला लावणारे होते.


गांधींनी गोमलेज परिषदेत अस्पृश्यांविषयी घेतलेली भूमिका सर्वांना माहीतच आहे, मुंबई येथे ६ मे १९३९ रोजी अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे अधिवेशन भरले होते. त्यात गांधीजींच्या धोरणांवर बोलताना बाबासाहेब म्हणाले, ‘1928 साली काँग्रेस सात कोटी

अस्पृश्याना शून्य समजत होती. दोन वर्षानंतर राऊंड टेबल परिषद भरली.तेथे अस्पृश्य लोकांनी शून्याचे दहा केले.एकावर पूज्य वाढवले पण गांधीजी दहाचे पुन्हा शून्य करण्याचा घाट घालत आहेत, पण त्यांना ते साधले नाही. असा चपखल विनोद बाबासाहेबानी केला, एकदा तर, बाबासाहेब शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाला गेले होते, थोडावेळ गाणी ऐकल्यानंतर बाबासाहेब गमतीने म्हणाले, ‘शास्त्रीय संगीत म्हणजे काय असते ते आत्ता समजलं, पुन्हा पुन्हा तेच तेच उगाळलं की, झालं शास्त्रीय संगीत.' बाबासाहेबांचे हे शब्द ऐकून उपस्थित सर्वजण हसू लागले. असेच,मुंबईच्या एका सभेत उपरोधिक शैलीत बोलताना बाबासाहेब म्हणाले, ‘हिंदूंनी आमच्यासाठी काय केले? तर त्यांनी एक सुधारणा केली. ती म्हणजे रेल्वेमध्ये जाताना ते आमच्या डब्यामध्ये असतात,आणि तेही त्यांना माहीत नसतं म्हणून. हसता हसता आपल्याला अंतर्मुख करायला लावणारे असे बाबासाहेबांचे विनोद असत.


२ एप्रिल १९३९ रोजी निवडून आलेल्या नगरसेवकांचा सत्कार ठेवला होता त्यावेळी बाबासाहेबांनी भाषण केले,ते म्हणाले, ‘आपण आजच्या मुंबई असेंब्लीमधील काँग्रेस सभासदांकडे चिकित्सक दृष्टीने पाहिले की, हा किंग एडवर्ड हॉस्पिटलमधील लुळे, पांगळे, आंधळे, बहिरे, म्हातारे वगैरे रोग्यांचा राखीव वॉर्ड आहे की काय असा भास होतो. आणि हशा पिकला, खरंतर नगरसेवक/आमदार/खासदार हे अभ्यासू व चिकित्सक वृत्तीचे असावेत त्यांनी समाजासाठी त्याग करण्याची तयारी ठेवायला हवी असे त्यांचे मत होते.बाबासाहेबांचे लेखन असो,भाषण असो की विनोद असो त्यांनी नेहमी त्यातून समाजाच्या डोळ्यात अंजन घालून दिशा दर्शविण्याचे काम केले आहे..असा हा बाबासाहेबांच्या स्वभावातला विनोदी पैलूही तितकाच अभ्यासपूर्ण आणि मार्मिक होता.

No comments:

Post a Comment

Pages