६५ वर्षीय जयवंत नगर नागपूर येथील रहिवासी "दयाराम राऊत लाकडात दीक्षाभूमीचा जीव पेरतात..
नववीपर्यंतचे जेमतेम शिक्षण,कलेचा गंध नाही, कुठे प्रशिक्षण नाही, रेल्वेत खलाशीचे काम.
दीक्षाभूमीची प्रतिकृती बाबासाहेबांच्या ऐतिहासिक स्थळांना भेट म्हणून देतात.
सलग 3 महिने मेहनत घेतल्यावर पूर्ण होणारी ही प्रतिकृती आतापर्यंत १४ ठिकाणी दिली.
एकदा मुलीच्या आग्रहाखातर लाकडापासून एक छोटे घर तयार करून दिले. या घराची खूप स्तुती झाली.
लाकडापासून आणखी काय करता येईल या विचारात असताना दीक्षाभूमी साकारता येईल का,
हा विचार आला त्यानंतर कित्येकदा दीक्षाभूमीला त्यांनी जवळून न्याहळले. तासन्तास दीक्षाभूमीवर बसून राहिले. बाबासाहेबांच्या महान कार्याच्या आठवणीने त्यांच्या डोळ्यात पाणी यायचे आणि एकदा दीक्षाभूमीवरून आल्या आल्या लाकडातून दीक्षाभूमी साकारायला सुरुवात केली.
१९९३ मध्ये दीक्षाभूमीची पहिली प्रतिकृती तयार केली. परंतु ती ओबडधोबड होती. 2-3दा प्रयत्न केला,प्रत्येक वेळी झालेली चूक दुरुस्त केली.
दयाराम राऊत लाकडातून दीक्षाभूमी साकारतोय म्हटल्यावर त्यांच्या, रेल्वेच्या काही मित्रांनी लाकूड विकत घेण्यास मदत केली.
पहिली प्रतिकृती त्यांनी चिंचोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वस्तू संग्रहालयाला भेट म्हणून दिली.
त्यावेळी वामनराव गोडबोले यांनी ही प्रतिकृती स्वीकारली.
त्यांच्या कौतुकामुळे राऊत यांचा आत्मविश्वास बळावला. चिंचोलीनंतर, मुंबई येथील चैत्यभूमी येथे ६ डिसेंबर १९९९ ला प्रतिकृती भेट दिली. त्यानंतर ते थांबले नाहीच.
रेल्वेतून निवृत्त झाल्यावर दीक्षाभूमीची प्रतिकृती बाबासाहेबांशी निगडित प्रत्येक ठिकाणी असावी, असा ध्यासच त्यांनी घेतला.
बाबासाहेबांचे जन्मस्थळ महू, महाबोधी महाविहार, समता सैनिक दलाच्या मदतीने महाड येथील समाजक्रांती भूमीत,
तळेगाव दाभाडे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंगल्याला, पुणे येथील सांस्कृतिक भवनात, बाबासाहेबांच्या पूर्वजांचे गाव रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील आंबडवे या गावात,
मातोश्री रमाबाई यांचे माहेर असलेल्या रत्नागरी जिल्ह्यातील वंणदगावात, केळझर, गोधनी फिटरी* येथील बुद्ध विहारात आणि दीक्षाभूमी येथे प्रतिकृती भेट म्हणून दिली.
बाबासाहेबांनी येवल्यातील ज्या मैदानवर धर्मांतराची ऐतिहासिक घोषणा केली, त्या 'मुक्तीभूमी' येथे लवकरच ते प्रतिकृती भेट म्हणून देणार आहेत. दरम्यानच्या काळात त्यांनी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाचीही प्रतिकृती तयार केली.
दीक्षाभूमीच्या स्तुपामध्ये आजही राऊत यांच्या प्रतिकृती प्रदर्शनास ठेवल्या आहेत.
चार बाय चार फुटामध्ये साकारत असलेल्या दीक्षाभूमीच्या काष्ठशिल्पाची इंचन्इंच माहिती राऊत यांनी कुठल्या कागदावर लिहिली नाही. प्रतिकृतीत किती खांब वापरायचे, त्याची उंची किती, घुमटाला लागणारे लाकडाचे ठोकळे, त्याच्या जाडीपासून त्याची उंची, रुंदी किती या सर्वांचे मोजमाप त्यांच्या डोक्यात फिट आहे.
त्यांना मात्र दीक्षाभूमीचीच प्रतिकृती का,या प्रश्नाला ते अडखळतात, हळवे होतात.
ते म्हणतात, माझ्या बाबाने आम्हाला खूप काही दिले जीवाचे रान केले.
या प्रतिकृतीमुळे कुणाला चेतना व नीतीमत्तेने जगण्याची प्रेरणा मिळत असेल तर माझे हे परिश्रम सार्थकी लागल्यासारखे होईल.
No comments:
Post a Comment