धम्मचक्र प्रवर्तन दिन घरीच साधेपणाने साजरा करा.. - डॉ. नितीन राऊत - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday, 24 October 2020

धम्मचक्र प्रवर्तन दिन घरीच साधेपणाने साजरा करा.. - डॉ. नितीन राऊत

 


दीक्षाभूमी परिसरातील दक्षतेसंदर्भात प्रशासनासोबत आढावा


नागपूर, दि. 24: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगून यंदा अनुयायांनी धम्मचक्र प्रवर्तन दिन घरीच साधेपणाने साजरा करावा. घरातच तथागत गौतम बुध्द तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे केले. 

दीक्षाभूमी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या सभाकक्षात आज आढावा बैठक घेण्यात आली. केंद्र व राज्य शासनाच्या साथरोग प्रतिबंधक निर्णयानुसार दरवर्षी विजयादशमीला साजरा करण्यात येणाऱ्या ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’या वर्षी साजरा केला जाणार नाही. तथापि, या पार्श्वभूमीवर आवश्यक दक्षता घेण्यासाठी आज त्यांनी आढावा घेतला. 


यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव डॉ.सुधीर फुलझेले, समितीचे सदस्य एन.आर. सुटे, विलास गजघाटे तसेच  विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली, विक्रम साळी, नुरुल हसन आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

 पालकमंत्री डॉ. राऊत यांनी अनुयायांना आवाहन करताना आपल्या कुटुंबासोबत घराघरात अभिवादन करावे अशी विनंती केली आहे. यावर्षी कोरोना महामारीच्या प्रादुर्भावाची झळ देशासह संपूर्ण जगाला बसत आहे. यामुळे केंद्र व राज्य शासनाने नागरिकांनी कोणतेही सण, समारंभ सामुहिकरित्या साजरे करु नये, असे आवाहन केले आहे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी दीक्षाभूमी येथे बौध्द धम्माची दीक्षा घेतली होती. त्या दिवशी विजयादशमीचा सण होता. यामुळे विजयादशमीच्या दिवशी दीक्षाभूमी येथे  तथागत गौतम बुध्द तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना  करण्यासाठी देशभरातून अनुयायी येत असतात. मात्र यंदा कोरोना संक्रमणापासून बचावासाठी नागरिकांनी आपल्या घरीच धम्मचक्र प्रर्वतन दिन साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


    रेल्वे स्टेशन तसेच बस स्थानकावर अनुयायी आल्यास गर्दी होणार नाही, यासाठी प्रशासन लक्ष ठेवून आहे. दीक्षाभूमी परिसरात पिण्याच्या पाण्याची सुविधा, मोबाईल टॉयलेल्ट्स, रुग्णवाहीका, अग्नीशामक दलाचे पथक यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या बाबतही डॉ. राऊत यांनी यावेळी माहिती घेतली व आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेत.


No comments:

Post a Comment

Pages